‘मनसे’च्या गांधीगिरीनंतर महामार्गावरील खड्डे बुजविण्यास सुरूवात खड्ड्यांमुळे अपघातांचे वाढले प्रमाण; वाहनचालकांना मिळणार दिलासा

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्यातून जाणार्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. याबाबत संबंधित महामार्गाची निर्मिती करणार्या कंपनीच्या प्रशासनाला जाग यावी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर डोके यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांनी मोठ्या खड्ड्यांमध्ये गांधीगिरी करीत वृक्षारोपण आणि माती टाकून खड्डे बुजवले होते. त्यानंतर जाग आलेल्या कंपनीने आजपासून महामार्गावरील खड्डे बुजविण्यास सुरूवात केली असल्याने वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे.

पुणे व नाशिक या दोन महानगरांना जोडणार्या महामार्गावर अत्यंत वर्दळ असते. या महामार्गावरील बोटा ते रायतेवाडी फाटा दरम्यान ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमध्ये छोटी-मोठी वाहने आदळून अपघात होत आहेत. मात्र तरीही संबंधित विभाग याकडे लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे. संबंधित कंपनीला दररोज लाखो रुपयांचा टोल भरुनही वाहनचालकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. याची गंभीर दखल घेत मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर डोके, खंडू जाधव, संकेत लोंढे, अविनाश भोर, दर्शन वाकचौरे, संदीप आव्हाड, रामा कुरकुटे, सुजीत कुरकुटे, वसीम पटेल, बाबाजी मुके, जालिंदर मरभळ, सचिन बोडके आदी मनसैनिकांनी एकत्र येत माहुली घाट, मल्हारवाडी, बोटा येथील खड्ड्यांमध्ये गांधीगिरी करीत वृक्षारोपण केले आणि माती टाकून खड्डे बुजवत प्रशासनाचे लक्ष वेधले होते.

दरम्यान, या महामार्गावरून दररोज प्रवासी व मालवाहतूक वाहनांची ये-जा होत असते. मात्र खड्ड्यांमुळे वाहनांचे अपघात होत आहे. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही, परिणामी अपघात होत आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने तत्काळ हे खड्डे बुजवावेत. अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर डोके यांनी दिला होता. त्यानंतर महामार्ग बांधणार्या कंपनीला जाग आल्याने आजपासून महामार्गावरील खड्डे बुजविण्यास सुरूवात केली आहे. यामुळे मनसेने देखील समाधान व्यक्त केले आहे.
