लव्ह जिहादचे जाळे घेवून दोघांचा दीड हजार किलोमीटर प्रवास! खांडगावची मुलगी पळविण्याची योजना; आंतरराज्य टोळी उघड होण्याची शक्यता..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोविड संक्रमणाने मानवातील अंतर वाढवल्याने दूरस्थ (ऑनलाईन) शिक्षणाची संकल्पना उदयास आली. त्यातून शाळेत न जाताही विद्यार्थ्यांना घरात बसूनच शिक्षण उपलब्ध झाल्याने जवळपास सर्वच पालकांनी सर्व वयोगटातील आपल्या पाल्यांच्या हाती मोबाईल सोपविले. संक्रमण संपले आणि ऑनलाईन शिक्षणही थांबले, मात्र मुलांच्या हातात गेलेले मोबाईल तसेच राहीले. त्याचे दुष्परिणाम आता दररोज समोर येत असून संगमनेरातून तर अतिशय धक्कादायक आणि पालकांना आत्मचिंतन करण्यास भाग पाडणारी घटना समोर आली आहे. या धक्कादायक घटनेत शिक्षणासोबतच ‘पब्जी’ (बीजीएमआय) या ऑनलाईन मोबाईल खेळात आकांत डुंबलेल्या खांडगावमधील एका विद्यार्थिनीची थेट बिहारमधील एकाशी ‘गट्टी’ जमली आणि एकमेकांना कधीही न पाहिलेल्या ‘त्या’ दोघांना भेटण्याची ओढ लागली. त्यातून त्याने थेट बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातून दीड हजार किलोमीटर अंतर कापून संगमनेर गाठलं, मात्र त्याची ‘ती’ भेट होण्यापूर्वीच पोलिसांशी गाठ पडली. आता त्याच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे होण्याची दाट शक्यता असून पोलिसांकडून सर्व बाजू पडताळल्या जात आहेत. न्यायालयाने अटक केलेल्या दोघांनाही मंगळवारपर्यंत (20 जून) पोलीस कोठडीत पाठवले आहे.

अतिशय धक्कादायक आणि प्रत्येक मुलीच्या पालकांना विचार करण्यास भाग पाडणार्‍या या घटनेत संगमनेर तालुक्यातील खांडगाव शिवारात राहणारी आणि औषध निर्माणशास्त्राचे शिक्षण घेणारी 22 वर्षीय विद्यार्थिनी 2020 मध्ये शिक्षणासोबतच ‘पब्जी’ (बीजीएमआय) हा मोबाईलवरील ऑनलाईन खेळही खेळू लागली. या खेळाच्या सुरुवातीलाच तिची ओळख बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर येथे राहणार्‍या अक्रम शहाबुद्दीन शेख याच्याशी झाली. त्यातून खेळाच्या दरम्यान एकमेकांशी चॅटींग करण्याच्या पर्यायाचा वापर करुन ते संपर्कात आले. परस्परांचा विश्वास संपादन झाल्यानंतर उभयतांनी आपापले मोबाईल क्रमांकही एकमेकांना दिल्याने त्याद्वारे त्यांच्यात चॅटींग आणि संवादही होवू लागला.

कोविड संक्रमणाने सगळे काही ठप्प असतानाही ऑनलाईन शिक्षण प्रणालीतून शिक्षणाची गंगोत्री वाहती ठेवली, मात्र संक्रमण संपून ऑफलाईन शिक्षण सुरु झाल्यानंतरही पालकांनी मोठ्या विश्वासाने आपल्या पाल्यांच्या हाती दिलेले मोबाईल तसेच राहिल्याने त्याचे दुष्परिणाम आता सातत्याने समोर येवू लागले असून शुक्रवारी घडलेली सदरची धक्कादायक घटनाही त्यातीलच एक आहे. गेल्या दोन-अडीच वर्षांपासून ‘पब्जी’च्या माध्यमातून एकमेकांच्या प्रदीर्घ संपर्कात आल्यानंतर बिहारच्या अक्रमने आपल्या मनातील हेतूचे जाळे पसरवण्यास सुरुवात केली आणि गेल्या 11 जून रोजी संबंधित विद्यार्थिनीकडे भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार दोघांनीही शुक्रवारी (ता.16) संगमनेरात भेटण्याचे ठरवले.

त्याप्रमाणे पूर्ण तयारीनिशी अक्रम आपला जोडीदार नेमतुल्ला याला सोबत घेवून दरभंग्याच्या अलीनगरमधून तब्बल दीड हजार किलोमीटरचा प्रवास करुन संगमनेरात पोहोचला. संगमनेर बसस्थानकावरुन त्याने पीडित विद्यार्थिनीशी संपर्क केल्यानंतर कासारवाडी शिवारातील एका रिसॉर्टजवळ त्यांनी भेटण्याचे ठरवले. त्यानुसार दोघे बिहारी तेथे पोहोचले आणि काही वेळातच पीडिताही आपल्या मोपेडवरुन त्यांना भेटायला आली. रस्त्याच्या बाजूला दोघांमध्ये संवाद सुरु असताना येणार्‍या-जाणार्‍यांचा त्रास होत असल्याचे सांगत अक्रमने तिला निर्मनुष्य ठिकाणी येण्याची गळ घातली. मात्र तिने नकार दिल्यानंतर ते कासारवाडीच्या दिशेने काही अंतर चालत गेले. यावेळी अक्रमने आपली योजना सांगत तिला आपल्यासोबत बिहारला येण्याची गळ घातली. ‘मला तू खूप आवडतेस, मी तुझ्याशी लग्न करील’ असे तो म्हणू लागल्याने पीडित मुलगी घाबरली आणि आपण केवळ मित्र आहोत, मी सोबत येणार नाही असे म्हणू लागली.

यावेळी त्याचा जोडीदारही तेथे आला आणि त्यानेही तिला ‘तुला सोबत यावेच लागेल, नाही तर तुझ्या घरी येवून तुझ्या आई-वडीलांना सगळा प्रकार सांगू’ असा जणू तिला दमच भरला. जोडीदाराची साथ मिळाल्याने छाती फुगलेल्या अक्रमने त्यानंतर आपली अतिरेकी प्रवृत्ती दाखवत तिचा हात धरला आणि तिला जवळपास चाळीस फुटापर्यंत ओढीतच घेवून गेला. या दरम्यान ‘पब्जी’ने आपलाच ‘गेम’ केल्याचा साक्षात्कार झाल्याने पीडितेने मदतीच्या याचनेने ओरडा केला आणि देवासारखे चार-दोनजण तिच्या मदतीला धावले. त्यांनी त्या दोघांच्या तावडीतून मुलीची सुटका केल्यानंतर ‘त्या’ दोघांनाही पकडून ठेवले आणि पोलिसांना कळविले. पोलिसांनीही घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून तत्काळ कासारवाडी रस्त्यावर जात दोघांनाही ताब्यात घेवून पोलीस ठाणे गाठले.

यावेळी त्या दोघांचेही मोबाईल ताब्यात घेवून त्यांची प्राथमिक तपासणी केली असता पोलिसांनाही धक्का बसला. पब्जी या खेळाचा वापर करुन अक्रम शेख याने वेगवेगळ्या ठिकाणच्या काही मुलींशी संपर्क साधल्याचे त्याच्या मोबाईलवरुन समोर आल्याचे समजते. याप्रकरणी पीडितेने मैत्री म्हणून भेटण्यासाठी गेले असता प्रेमसंबंध असल्याचा गैरसमज करुन आपणास पळवून नेण्याचा प्रयत्न करणार्‍या त्या दोघाही बिहारींविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी भारतीय दंडसंहितेच्या कलम 354 (अ), 366, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करीत अक्रम शहाबुद्दीन शेख (वय 23) व नेमतुल्ला मोहंमद कैसर (वय 24, दोघेही रा.अलीनगर, जि.दरभंगा, बिहार) या दोघांना अटक केली आहे. आज त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता दोघांनाही चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्या चौकशीतून लव्ह जिहादची आंतरराज्य टोळी उघड होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

तालुक्यातील खांडगाव शिवारात राहणार्‍या शेतकरी कुटुंबातील ही 22 वर्षीय विद्यार्थिनी ‘ऑनलाईन’ शिक्षण पद्धती बंद झाल्यानंतरही मोबाईलचा पुरेपूर वापर करीत होती. त्यातूनच पब्जी या खेळातून ती अक्रम शेखच्या जाळ्यात अडकल्याने त्याने तिला संगमनेरातून पळवून नेण्याची पद्धतशीर योजना आखली होती. सुदैवाने पीडितेने त्याच्या आडमार्गाला भेटण्याचा प्रस्ताव फेटाळला आणि वेळीच तिने मदतीची याचना केल्यानंतर काहीजण तिच्या मदतीला धावल्याने ती बचावली. वरकरणी ही घटना गेमिंग अ‍ॅपमधून घडल्याचे भासत असले तरीही प्रत्यक्षात त्यामागे ‘लव्ह जिहाद’चे मोठे आंतरराज्य षडयंत्र आणि कार्यरत असलेले रॅकेट सापडण्याचीही दाट शक्यता असून पोलिसांनी गांभीर्याने तपास केल्यास अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा होवू शकतो.


ऑनलाईन गेमिंग अ‍ॅपमधून चारशे जणांचे धर्मांतरण केल्याचा ठपका ठेवून उत्तर प्रदेश पोलिसांनी मुंबईतून अटक केलेल्या शहानवाज उर्फ बद्दू याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत असताना मोबाईल गेममधून संगमनेरमधील विद्यार्थिनीलाही पळवून नेण्याचा प्रकार समोर आल्याने संगमनेर पोलिसांनी पकडलेल्या दोघांचा मुंबईतील बद्दूशी काही संबंध आहे का? याचाही शोध घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या चौकशीतून असा प्रकार समोर आल्यास या प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेची (एनआयए) एन्ट्री होण्याचीही शक्यता आहे. पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे या घटनेचा बारकाईने तपास करीत असून लवकरच यात स्थानिक गुन्हे शाखाही कार्यरत होणार आहे.

Visits: 6 Today: 2 Total: 27313

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *