दोन महिन्यांपूर्वी आढळलेल्या बेवारस व्यक्तीचा खूनच! संगमनेर पोलिसांकडून खूनाचा गुन्हा दाखल; मात्र ओळख पटविण्याचे आव्हान कायम
नायक वृत्तसेवा, संगमनेर
दोन महिन्यांपूर्वी घुलेवाडी शिवारातील पुणे-नाशिक महामार्गालगतच्या उपरस्त्यावर एका 20 ते 25 वर्षीय अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. सदरचा मृतदेह रस्त्याच्या कडेला झुडूपात असल्याने त्याचा मृत्यू एखाद्या वाहनाच्या धडकेत झाल्याचा प्राथमिक अंदाज नोंदवून पोलिसांनी कायदेशीर सोपस्कार उरकीत वेल्हाळे शिवारात त्याचा दफनविधी केला होता. त्यावेळी मृतदेहावरील जखमा अपघाताने झाल्या असण्याची शक्यता वर्तविली गेल्याने पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र आता दोन महिन्यानंतर सदर मृतदेहाच्या शवविच्छेदनाचा सविस्तर अहवाल पोलिसांना प्राप्त झाला असून त्यातून सदर व्यक्तीचा खून झाल्याची शक्यता वर्तविली गेल्याने पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात भा.दं.वि. 302 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन महिन्यांपूर्वी 12 नोव्हेंबर रोजी घुलेवाडी शिवारातील पुणे-नाशिक महामार्गालगतच्या सर्व्हिस रस्त्यावर एका अज्ञात इसमाचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना समजली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जात परिसराची पाहणी करुन पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी त्यांना काहीही आढळून आले नव्हते. त्यामुळे सदर व्यक्तिचा मृत्यू एखाद्या वाहनाच्या धडकेत झाला असण्याची वर्तविली गेल्याने सुरुवातीला पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. सदर मृतदेहाची उत्तरीय तपासणी करताना ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकार्यांनीही अपघाताने मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करीत व्हिसेरा राखून ठेवला होता. आता दोन महिन्यांनंतर पोलिसांना रासायनिक प्रयोगशाळेचा सविस्तर अहवाल प्राप्त झाला असून त्यातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. त्यानुसार सदर व्यक्तीच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा झालेल्या असून त्या मारहाणीमुळे अथवा अपघाताने झाल्याची शक्यता वर्तविली आहे. तसेच मृत्यू होण्याचे कारणही हृदयक्रिया बंद पडल्याने व डोक्याला गंभीर इजा झाल्याने घडला असल्याचे नमूद करण्यात आले आहे. सदर व्यक्तीची उत्तरीय तपासणी करण्यापूर्वी पा ते सहा तासांपूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचेही अहवालातून समोर आले आहे.
त्यावरुन कोणीतरी अज्ञाताने कोणत्यातरी कारणाने सदर व्यक्तिचा मृतदेह सापडला तेथे अथवा अन्य कोठेतरी जबर मारहाण करुन खून केला व पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्याचा मृतदेह महामार्गालगतच्या उपरस्त्यावर आणून टाकला असण्याची शक्यता निर्माण झाल्याने शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक पंकज शिंदे यांनी याबाबत फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात भा.दं.वि. कलम 302, 201 नुसार गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. विशेष म्हणजे ही घटना समोर येवून दोन महिन्यांचा काळ लोटला असून अद्याप ‘त्या’ ठसमाची ओळख पटलेली नाही.