भाजपनेते किरीट सोमय्या यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा! आयएनएस विक्रांत प्रकरण; शिवसेनेचे शुक्रवारी संगमनेर बसस्थानकावर आंदोलन..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
सन 1971 च्या भारत-पाक युद्धात महत्त्वाची कामगिरी बजावणार्‍या आयएनएस विक्रांत या विमानवाहू युद्धनौकेवरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. या युद्धनौकेला वाचवण्याच्या मोहीमेत भाजपनेते किरीट सोमय्या यांनी नागरीकांकडून मोठ्या प्रमाणात निधी गोळा केला होता. मात्र त्यानंतरही आयएनएस विक्रांत भंगारात काढली गेल्याने सोमय्या यांनी या निधीचे काय केले असा सवाल उपस्थित करीत शिवसेनेचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी विक्रांतच्या नावावर कोट्यावधीचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करीत किरीट सोमय्या यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तर या प्रकरणी माजी सैनिक बबन भोसले यांच्या फिर्यादीवरुन ट्रॉम्बे पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हाही दाखल केला आहे. हाच धागा पकडून शिवसेनेने सोमय्यांविरोधात राज्यभर एल्गार पुकारला असून शुक्रवारी संगमनेरातही त्यांच्याविरोधात आंदोलन होणार आहे.


मागील अनेक महिन्यांपासून भाजपनेते किरीट सोमय्या महाविकास आघाडीतील विविध मंत्री, नेते यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करीत आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण गढुळ झालेले असतांना ईडीने पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या भ्रष्टाचारातील पैशातून मालमत्ता खरेदी केल्याचा संशय व्यक्त करीत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या दादरमधील सदनिकेसह अलिबागमधील त्यांचे काही भूखंडही जप्त करण्याची कारवाई केली. त्यामुळे राऊत यांच्यासह शिवसेना आता अधिक आक्रमक झाली असून दहा वर्षांपूर्वी सोमय्या यांनी आयएनएस विक्रांत ही युद्धनौका वाचवण्याचे भावनिक आवाहन करीत लोकांकडून जमवलेला कोट्यावधीचा निधी गिळल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच सोमय्या यांनी केलेला हा केवळ भ्रष्टाचार नसून देशासोबत केलेली गद्दारी असल्याचा घणाघात करीत खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचीही मागणी केली आहे.


गेल्या अडीच वर्षांपासून केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा मागे लागलेला असतांना पहिल्यांदाच शिवसेनेला भाजप विरोधातील मुद्दा हाती लागला आहे. त्यामुळे तो भाजत ठेवण्याचा निर्णय एकप्रकारे महाविकास आघाडीने घेतला असून आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने या मुद्द्यावरुन राज्यभर राळ उठवण्याचा निर्णय घेतला आहे. काल सायंकाळपासूनच राज्यात विविध ठिकाणी शिवसेनेची आंदोलने सुरु झाली असून संगमनेरात बुधवारी सायंकाळी खासदार राऊत यांच्या विरोधातील जप्तीच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी आंदोलन झालेले असतांना आता शुक्रवारी सकाळी 10 वाजता भाजपनेते किरीट सोमय्या यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आंदोलन पुकारण्यात आले आहे.


या आंदोलनात शिवसेनेचे उत्तर नगरजिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, संगमनेर-अकोले विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक आप्पा केसेकर, उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब हासे, तालुका प्रमुख जनार्दन आहेर, शहरप्रमुख अमर कतारी व प्रसाद पवार यांच्यासह शहर व तालुक्यातील शिवसैनिक, युवासेनेचे कार्यकर्ते, महिला आघाडी, अपंग सेना, कामगार सेना, ग्राहक संरक्षण कक्ष व सेनेच्या सर्व अंगीकृत संघटना सहभागी होणार आहेत. शुक्रवारी (ता.8) सकाळी 10 वाजता संगमनेर बसस्थानकाजवळ होणार्‍या या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शहर शिवसेनेच्यावतीने करण्यात आले आहे.

आयएनएस विक्रांतचा इतिहास..
राजकीय आरोप-प्रत्यारोपात आलेल्या आयएनएस विक्रांत या युद्धनौकेला मोठा पराक्रमी इतिहास आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात सन 1945 साली पहिल्यांदा ही युद्धनौका ब्रिटीश नौदलात सामील होवून दुसर्‍या महायुद्धासाठी सज्ज झाली होती, मात्र त्याचवेळी दुसरे महायुद्ध संपुष्टात आले. त्यानंतर ब्रिटीश नौदलातून ही युद्धनौका निवृत्त करण्यात आली. सन 1957 साली भारतीय संरक्षण खात्याने तिची खरेदी करुन 1961 साली तिचा समावेश भारतीय नौदलात केला. याच आयएनएस विक्रांतने 1971 सालच्या भारत-पाकीस्तान युद्धात मोठी कामगिरी बजावली. या युद्धनौकेने पाकीस्तानला दिवसा काजवे दाखवण्यास सुरुवात केल्यानंतर पाकीस्तानी नौदलाने तिचा खात्मा करण्यासाठी पीएनएस गाझी ही पाणबुडी पाठवली होती, मात्र भारतीय नौदलाने पाकीस्तानचे मनसुबे उधळून लावले.


सन 1997 साली भारतीय नौदलाने आयएनएस विक्रांतला डी कमिशनिंग म्हणजे सेवामुक्त केले. तेव्हापासून 2012 पर्यंत ही युद्धनौका युद्ध संग्रहालय म्हणून नागरीकांना पाहता येत होती. मात्र त्यानंतर ही युद्धनौका विकण्याच्या हालचाली सुरु झाल्याने त्या विरोधात 2013 साली मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल झाली. मात्र महाराष्ट्र सरकारने त्याची देखभाल करण्यास असमर्थता दर्शविण्यासह भारतीय संरक्षण विभागाने अशाप्रकारच्या जहाजात समुद्री संग्रहालय चालवणे अव्यवहार्य असल्याची बाब न्यायालयात मांडल्याने ती याचिका निकाली निघण्यासह तिच्या लीलावाचा मार्गही मोकळा झाला. सन 2014 साली आयबी कमर्शिअल प्रायव्हेट लिमिटेड या खासगी कंपनीने तिची खरेदी केली. नंतर दोन वर्षांनी याच युद्धनौकेच्या लोखंडापासून बजाज कंपनीने ‘व्ही’ नावाच्या दुचाक्या तयार करुन 1 फेब्रुवारी 2016 रोजी त्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केल्या.

Visits: 6 Today: 1 Total: 30762

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *