शिर्डी पोलिसांनी तीन लाख रुपयांचा गांजा पकडला चौघांवर गुन्हा दाखल तर एकास पोलिसांनी घेतले ताब्यात

नायक वृत्तसेवा, शिर्डी
साईबाबांची नगरी असलेल्या शिर्डीमध्ये अवैध धंदे वाढत असून या अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी शिर्डी पोलीस पुढाकार घेताना दिसत आहे. शुक्रवारी (ता.21) रात्री शिर्डी पोलिसांनी धडक कारवाई करत तीन लाख रुपये किंमतीचा तब्बल 21 किलो गांजा जप्त केला आहे. शिर्डी पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध धंदे करणार्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

याबाबतची अधिक माहिती अशी की, शिर्डीचे पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, शिर्डी येथील हेलिपॅड रस्त्यावरील चांगदेव कोते यांच्या खोलीमध्ये अवैध विक्रीकरता आणलेला गांजाचा मोठ्या प्रमाणात साठा करण्यात आलेला आहे. प्राप्त माहितीच्या आधारे हेलिपॅड रस्त्यावरील चांगदेव कोते यांच्या खोलीमध्ये पोलीस पथकाने पंचासमक्ष छापा टाकला असता त्याठिकाणी 2 लाख 90 हजार रुपये किमतीचा 20 किलो 800 ग्रॅम गांजा मिळून आला. त्यासोबतच घटनास्थळावर वजन काटा, प्लास्टिकच्या पिशव्या, खाकी रंगाची चिकटटेप, कटर हे साहित्य देखील मिळून आले.

पोलिसांनी घटनास्थळावरून चांगदेव कोते यास ताब्यात घेण्यात आले असून दत्तात्रय बाबुराव करपे, अनिता दत्तात्रय करपे, शुभम दत्तात्रय करपे हे तीन आरोपी फरार आहेत. या आरोपिंविरुद्ध एनडीपीएस कायदा कलम 20 ब नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाइ पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे, पोलीस कॉन्स्टेबल बिरदवडे, गोंधे, भारमल, गोलवड यांच्या पथकाने केली आहे. पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांमधून कौतुक होत आहे. शिर्डीमध्ये आजही अवैध दारुविक्री, जुगार अड्डे, गुटखा विक्री असे अनेक अवैध धंदे सुरू असून तरुण पिढी यामध्ये बरबाद होत आहे. पोलिसांनी सातत्याने अशाप्रकारच्या कारवाया करून अवैध धंदे करणार्यांवर जरब बसविण्यासाठी कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
