श्रीरामपूरमध्ये महावितरण अधिकार्यांचे मोबाईल ‘स्वीच ऑफ’ विजेच्या खेळखंडोब्यामुळे ग्राहक त्रस्त तर अधिकारी-कर्मचारी सूस्त
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
शहरासह तालुक्यात ऐन सण-उत्सवाच्या काळातच तासनतास वीज गायब होण्याच्या प्रकारामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. या विभागातील अधिकारी ग्राहकांचा डोक्याला ताप नको म्हणून त्यांनी त्यांचे मोबाईल ‘स्वीच ऑफ’ करून बिनधास्त झाले आहेत. इकडे उष्णतेच्या उकाड्यामुळे नागरिक संतप्त झाले असून दुसरीकडे अधिकारी पळवाट शोधत असल्याने आता दाद कोणाकडे मागावी, अशी सवाल नागरिकांनी केला आहे.
सलग दुसर्या दिवशी तालुक्यासह शहरातील वीज दुपारपासून गायब होती. रात्री उशिरा कधीतरी वीज आली आणि गायबही झाली हे लोकांना कळलेच नाही. काही नागरिक उकाड्यामुळे इतके हैराण झाले आहेत की, रात्र रात्र जागून काढत आहेत. वीज कधी येणार अशी विचारणा कर्मचार्यांकडे केली तर कर्मचारी तर या विभागाचे प्रमुख आहेत असे समजून नागरिकांबरोबर अर्वाच्च भाषा वापरून उडावाउडवीची उत्तरे देत असतात. कधी काहीही न सांगता फोन ठेवून देत असतात. वरीष्ठ अधिकार्यांनी तर वीज गायब होण्याच्या प्रकारामुळे नागरिकांचा नाहक त्रास नको म्हणून त्यांनी त्यांचे मोबाईल स्वीच ऑफ करून ठेवले आहेत. एकीककडे नागरिकांची झोप उडवायची आणि दुसरीकडे अधिकारी व कर्मचारी आरामशीर झोपायचे असा प्रकार सध्या या विभागात सुरू आहे.
यामुळे शहरातील पालिकेच्या पिण्याच्या पाण्याचे नियोजनही कोलमडले आहे. गेली दोन दिवस शहराला पाणीप ुरवठा केला जाणार नाही हे अचानक जाहीर केल्यामुळे नागरिकांची मोठी धावपळ झाली. भर उन्हाळ्याच्या काळात पाणी पाणी अशी परिस्थिती झाली आहे. वीज कशामुळे गेली? का गेली? अशी चौकशी करण्याकरिता फोन केला असता कोणीही धड उत्तर दिले नाही. यावरुन महावितरण अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून कर्मचारी मनमानी पध्दतीने कामकाज करत असल्याचे उघड होत आहे.