शिर्डी विमानतळावर नोकरी लावून देण्याच्या नावाखाली फसवणूक अकरा तरुणांकडून 55 लाख रुपये घेतले; तिघांना पोलिसांनी केली अटक


नायक वृत्तसेवा, शिर्डी
शिर्डी विमानतळावर चांगल्या पदावर नोकरी लावून देतो असे सांगून डिसेंबर ते मे या सहा महिन्यांच्या काळात बीड, पाथर्डी या ग्रामीण भागातील 11 तरुणांकडून प्रत्येकी 5 लाख रुपये घेऊन जवळपास 55 लाख रुपये गोळा करून आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणातील तीन आरोपींना पोलिसांनी अटकही केली आहे.

बनावट नियुक्तीपत्र देऊन फसवणूक केली असल्याची फिर्याद चंद्रकांत विठ्ठलराव जाधवराव (रा. बीड) यांनी शिर्डी पोलिसांत दिली आहे. त्यात म्हटले की, माझ्या मुलासह 11 मुलांकडून प्रत्येकी पाच लाख रुपये घेऊन तुम्हाला शिर्डी विमानतळ येथे नोकरी लावून देतो, असे आश्वासन दिले. त्यावर पैसे देखील घेतले. लवकरच नियुक्तीपत्र देतो असे सांगत आज, उद्या देतो, असे आश्वासन दिले. मोठा पाठपुरावा केल्यानंतर शिर्डी विमानतळाच्या नावाने बनावट रंगीत नियुक्तीपत्र देखील या तरुणांना दिले. त्यानंतर सदर तरुणांनी याबाबत शिर्डी येथे येऊन विमानतळावर नोकरीवर हजर होण्यासाठी प्रयत्न केला असता आपली फसवणूक झाल्याचे या तरुणांच्या लक्षात आले. त्यामुळे झालेल्या फसवणुकीबाबत यातील एका उमेदवाराने हा प्रकार वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी याबाबत फसवणुकीची तक्रार शिर्डी पोलिसांत दाखल केली आहे. यावरुन पोलिसांनी आरोपींविरोधात गुरनं. 433/22 भादंवी 420, 465, 468, 471, प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकाराची गंभीर दखल शिर्डी भागाचे उपविभागीय अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक योगीता कोकाटे यांनी सुरू केला आहे. या तपासाच्या अनुषंगाने पोलिसांनी गोकुळ राजाराम कांदे (रा.तामसवाडी, ता.निफाड, जि.नाशिक), गोकुळ ठकाजी गोसावी, विलास रामचंद्र गोसावी (दोघेही रा. मलढोण, ता. सिन्नर) या तीन तरुणांना अटक केली आहे. त्यांना राहाता न्यायालयापुढे हजर केले असता नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Visits: 23 Today: 2 Total: 114785

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *