संगमनेरात आज पुन्हा आढळले विक्रमी रुग्ण! अवघ्या 24 तासांतच तालुक्याने गाठला 29 व्या शतकाचा उंबरठा
नायक वृत्तसेवा संगमनेर
गेल्या काही दिवसांपासून 50 च्या आसपास आढळणारी तालुक्यातील रुग्णसंख्या आज पुन्हा एकदा वाढल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाने रॅपिड एंटीजन चाचणीला गती दिल्याने आज एकाच दिवशी पुन्हा एकदा तब्बल 73 रुग्ण समोर आले आहेत. आज शहर व तालुक्यासह प्रशासकीय कार्यालयांमधील तपासणी अंतर्गत महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची स्राव चाचणी करण्यात आली. त्यातून पाच कर्मचाऱ्यांना कोविडची लागण झाल्याचे समोर आले. त्यासोबतच शहरातील पंधरा जणांसह तालुक्यातील एकूण त्र्याहत्तर जणांचे अहवाल पॉझिटिव आले आहेत. मंगळवारी रात्रीच तालुक्यातील बाधित संख्येने 28 वे शतकात ओलांडले होते. आता आज त्यात तब्बल त्यात 73 रुग्णांची भर पडल्याने तालुक्याची रुग्णसंख्या एकोणतिसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर 2 हजार 879 वर पोहोचली आहे.
स्थानिक प्रशासनाने कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी धाडसी पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रशासकीय कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या सरसकट रॅपिड एंटीजेन चाचण्या केल्या जाणार आहेत. त्या मोहिमेचा शुभारंभ आज महसूल विभागातील सर्वांच्या स्राव चाचणीने झाला. या चाचणीतून महसूल विभागातील पाच कर्मचाऱ्यांना कोविडची लागण झाली आहे. यात दोन महिलांचा समावेश आहे. आज प्राप्त झालेल्या अहवालातील 46 अहवाल रॅपिड एंटीजेन चाचणीतून तर 27 अहवाल खासगी प्रयोगशाळेकडून मिळाले आहेत.
आज प्राप्त झालेल्या अहवालातून शहरातील पंधरा जणांसह तालुक्यातील एकूण 73 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात मालदाड रोड परिसरातील 68 वर्षीय इसम व 31 वर्षीय तरुण, महात्मा फुले नगर मधील 62 वर्षीय महिला, मोतीनगर मधील 52 व 32 वर्षीय महिला, जनतानगर परिसरातील 33 वर्षीय तरुण व 32 वर्षीय महिला, बस स्थानकाच्या परिसरातील 63 व 60 वर्षीय इसम, घोडेकर मळा परिसरातील 53 वर्षीय इसम, इंदिरानगर मधील 47 वर्षीय महिला, चैतन्यनगर मधील 34 वर्षीय महिला, देवाचामळा भागातील 50 वर्षीय इसम, पंपिंग स्टेशन परिसरातील 55 वर्षीय महिला व जाणताराजा मैदान परिसरातील 47 वर्षीय इसम आदींचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत.
त्यासोबतच तालुक्यातील चिंचपूर येथील 65 व 40 वर्षीय महिलेसह वीस वर्षीय तरुण, कोकणगाव येथील 40 वर्षीय तरुण, प्रतापपूर येथील 51 वर्षीय महिला व 41 वर्षीय तरुण, चिखली येथील 39 वर्षीय महिला, निमगाव भोजापूर येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह साठ वर्षीय महिला, राजापूर येथील 65 वर्षीय महिलेसह 43 वर्षीय तरुण, नांदुरी दुमाला येथील 62 वर्षीय महिला, सावरगाव घुले येथील चाळीस वर्षीय महिला, पिंपळगाव कोंझिरा येथील तीस वर्षीय महिला, साकुर मधील तीस वर्षीय महिला, हिवरगाव पठार येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांसह 33 वर्षीय तरुण, सुकेवाडी येथील 47 वर्षीय महिला, हंगेवाडी येथील 70 वर्षीय महिला, घुलेवाडी येथील 82, 50, 50, 45 वर्षीय इसमासह 42 व 20 वर्षीय तरुण 73 व 35 वर्षीय महिला, जवळेकडलग येथील 47 वर्षीय इसम,
करुले येथील 26 वर्षीय तरुण, आश्वी बुद्रुक येथील 60 वर्षीय महिला, निमगाव पागा येथील 42 वर्षीय महिला, देवकौठे येथील 38 वर्षीय तरुण, मंगळापुर येथील 87 वर्षीय महिला व 52 वर्षीय इसम, चिखलीतील 48 वर्षीय इसमासह 44 वर्षीय महिला, कनकापूर येथील 43 वर्षीय तरुण, पळसखेडे येथील 61 व 57 वर्षीय इसम, 53 वर्षीय महिला व बारा वर्षीय बालिका, गुंजाळवाडी येथील 46 वर्षीय इसम, साकुर मधील 38 वर्षीय तरुण, कनोली मधील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 55 व 25 वर्षीय महिला तसेच 17 वर्षीय तरुण, राजापूरमधील 18 वर्षीय तरुणासह सहा वर्षीय बालिका, माळवाडी येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, संगमनेर खुर्द मधील 60 व 50 वर्षीय महिलेसह आठ व सात वर्षीय बालिका, नांदुरी दुमाला मधील 40 वर्षीय तरुण, निमोण मधील 23 वर्षीय तरुण, शेडगाव मधील 26 वर्षीय तरुण व आश्वी बुद्रुक मधील 55 वर्षीय महिला असे एकूण 76 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. तालुक्याच्या रुग्ण संख्येत आजही विक्रमी वाढ झाल्याने संगमनेर तालुक्यातील बाधितांच्या संख्येत अवघ्या चोवीस तासात 113 रुग्णांची भर पडून बाधितांची संख्या 2 हजार 879 वर पोहोचली आहे.
आजच्या स्थितीत संगमनेर तालुक्यातील एकुण रुग्णसंख्या 2 हजार 879 असून त्यातील 2 हजार 526 रुग्णांनी यापूर्वीच उपचार पूर्ण करुन सामान्य जीवनाची सुरुवात केली आहे. सध्या तालुक्यातील केवळ 318 रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत शहरातील बारा जणांसह तालुक्यातील एकुण 35 जणांचा कोविडने बळी घेतला आहे. एकुण रुग्णसंख्येत शहरातील 902 रुग्णांचा समावेश असून त्यातील केवळ 61 रुग्ण सध्या सक्रीय संक्रमित आहेत. तर ग्रामीण भागातील 1 हजार 967 जणांना कोविडचे संक्रमण झाले होते, मात्र आज त्यातील अवघ्या 257 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. रुग्णसंख्या वाढीसोबतच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही नव्वद टक्क्यांच्या पुढे गेल्याने संगमनेरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.