‘तो’ पिकअप पळविणार्‍यांविरोधात अखेर गुन्हा दाखल! तहसीलदारांच्या रखवालीत होते महिनाभर वाहन; मग दोषी अधिकार्‍यांवर कारवाई कधी?..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
बेकायदा वाळू वाहतूक करणार्‍या पिकअप टेम्पोला शनिवारी धांदरफळ शिवारात भीषण अपघात होवून त्यात चालकाचा बळी गेला होता. या घटनेनंतर एकीकडे तालुक्यातील वाळू तस्करी चर्चेत आली असतांना दुसरीकडे सदरचा टेम्पो अपघातापूर्वी संगमनेर तहसीलदारांच्या रखवालीतच असल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे. वास्तविक नोंदणी आणि चेसी क्रमांकही नसलेले सदरचे वाहन ताब्यात आल्यानंतर त्याच्यावर फौजदारी कारवाई होण्याची गरज होती. प्रत्यक्षात मात्र तहसीलदारांनी दंडात्मक कारवाईसाठी महिनाभर वाट पाहण्यात घालवल्याने सदरचे वाहन पळवून नेण्याची आयती संधीच तस्करांना मिळाली. त्यामुळे संगमनेर तहसीलदारांच्या भूमिकेबाबतही प्रश्न निर्माण झाले असून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची गरज आहे. अपघातग्रस्त पिकअप पोलीस वसाहतीतून गायब झाल्याचे वृत्त सर्वप्रथम दैनिक नायकने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर जाग आलेल्या महसूल विभागाने सोमवारी रात्री उशिराने शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला हे विशेष.

गेल्या शनिवारी (ता.२५) मंगळापूर शिवारातून बेकायदा वाळू वाहतूक करणार्‍या विना नोंदणी व विना चेसी क्रमांकाच्या पिकअप वाहनाला धांदरफळ शिवारात भीषण अपघात झाला होता. जवळपास शंभर फूट खोलीच्या विहिरीत कोसळल्याने या अपघातात चालक गोरख नाथा खेमनर (वय २३, रा. डिग्रस) याचा पाण्यात बुडून जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर ओझर ते अकोल्यापर्यंत सुरु असलेल्या वाळू तस्करीची जोरदार चर्चा सुरु असतानाच गेल्या महिन्यात २७ ऑक्टोबर रोजी मंगळापूरच्या ग्रामस्थांनी सदरचा टेम्पो पकडून संगमनेर तहसीलदारांच्या ताब्यात दिला होता. त्याचवेळी सदरच्या वाहनाला नोंदणी व चेसी दोन्ही क्रमांक नसल्याची बाबही ग्रामस्थांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती.

त्यामुळे सदरचे वाहन कायदेशीरदृष्ट्या बेकायदा असल्याने ते भंगारात जाणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र संगमनेरच्या तहसीलदारांनी सध्या सर्रासपणे केल्या जाणार्‍या दंडात्मक कारवायांच्या अनुषंगाने ‘त्या’ वाहनावरही कारवाई करण्यासाठी केवळ पंचनाम्याचे सोपस्कार उरकून प्रतीक्षा सुरु केली. पोलीस वसाहतीच्या प्रांगणात अन्य वाहनांसह उभे असलेले सदरचे वाहन काही दिवसांनी दुर्लक्षित झाले आणि त्याच संधीचा फायदा घेवून २३ नोव्हेंबर रोजी कासारवाडीतील एका वाळूतस्कराने ते सरकारी रखवालीतून परस्पर पळवून नेले. मात्र त्याची भणक कोणालाही लागली नाही हे विशेष.

त्यानंतर अवघ्या २४ तासांतच शनिवारी (ता.२५) पहाटे साडेचारच्या सुमारास सदरील वाहनाला धांदरफळ येथे अपघात घडला आणि त्यात चालकाचा बळी गेला. त्यानंतर सदरचा टेम्पो पुन्हा एकदा चर्चेत येवून तो महिनाभरापूर्वीच संगमनेरच्या तहसीलदारांकडे जमा केल्याची माहिती दैनिक नायकला मिळाल्यानंतर त्याची खातरजमा केली असता वरीलप्रमाणे ‘तो’ टेम्पो अपघातापूर्वी काही तास आधीच चोरीला गेल्याचे समोर आले. त्यातून महसूल विभागासह पोलिसांचाही हलगर्जीपणा समोर आला. दैनिक नायकने सोमवारी (ता. २७) याबाबतचे ठळक वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर महसूल विभागाला जाग आली आणि संगमनेर खुर्दचे मंडलाधिकारी बाबाजी जेडगुले यांनी सोमवारी रात्री उशिराने शहर पोलीस ठाणे गाठून कायदेशीर रखवालीतून जवळपास एक ब्रास वाळू भरलेला टेम्पो चोरुन नेल्याची तक्रार नोंदविली.

त्यावरुन पोलिसांनी मंगळापूर येथील मोहन बारकू भोकनळ व शिवाजी राधाकिसन घुले यांच्यावर एक ब्रास वाळूसह सरकारी निगराणीतून टेम्पो चोरुन नेल्याप्रकरणी भारतीय दंडसंहितेच्या कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करीत पोलीस नाईक टोपे यांच्याकडे तपास सोपविला. विशेष म्हणजे चोरीला गेलेल्या टेम्पोचा ज्या दिवशी अपघात झाला, त्याच दिवशी सकाळी साडेसात ते २७ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेअकरा या कालावधीत सदरचा टेम्पो चोरीला गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे, प्रत्यक्षात मात्र या टेम्पोला शनिवारी पहाटे साडेचार वाजताच अपघात झाला होता. म्हणजेच अपघात घडला त्यावेळी सदरचा टेम्पो तहसीलदारांच्याच ताब्यात असल्याचेही तक्रारीवरुन दिसून येते. हा सगळा प्रकार महसूल विभागातील सावळा गोंधळ दर्शविण्यासाठी पुरेसा आहे.

खरेतर बेकायदा असलेले सदरचे वाहन सरकारच्या ताब्यात आल्यानंतर त्याची कायदेशीर विल्हेवाट लावण्याची गरज होती. मात्र वाळू वाहतूक करताना सापडला म्हणजे दंडात्मक कारवाई इतकेच सूत्र डोळ्यासमोर ठेवून जवळपास महिनाभर केवळ पंचनाम्यावर ते वाळूसह उभे ठेवण्यात आले. त्यावरुन संगमनेरच्या तहसीलदारांची संशयास्पद भूमिकाही आता ठळकपणे समोर आली असून प्रत्यक्षात सदरचे वाहन पळवून नेणारा आणि गुन्हा दाखल झालेले वेगवेगळे असल्याचीही जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. सदरचे वाहन पळवून नेणारा तस्कर कासारवाडी शिवारातील असल्याचे व त्याला वाचवण्यासाठी त्याच परिसरातील एक दुसरा वाळूतस्कर व एका पक्षाचा पदाधिकारी आपल्या जीवाचे रान करीत असल्याचेही कानावर आले आहे. एकूणच या प्रकरणात काहींचे हात ओले झाल्याचे स्पष्टपणे दिसत असून पोलीस वसाहतीतून टेम्पो चोरुन नेण्याचा प्रकार अतिशय धक्कादायक असून याप्रकरणाची सखोल चौकशी करुन चोरीचा खरा सूत्रधार आणि त्याला एकप्रकारे तशी संधी निर्माण करुन देणार्‍या अधिकार्‍यांवरही कारवाई होण्याची गरज आहे.

शनिवारी घडलेल्या या भीषण अपघातानंतर दैनिक नायकने तालुक्यातील वाळू तस्करीचा मागोवा घेतला असता शहरासह तालुक्यातील नदीकाठावरील गावागावात वाळूतस्करांच्या टोळ्या आजही सक्रीय असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यातूनच २७ ऑक्टोबर रोजी विना चेसी व नोंदणी क्रमांकाचा पिकअप मंगळापूरच्या ग्रामस्थांनी पकडून महसूलच्या ताब्यात दिल्याची व त्यावेळी दिलेल्या तक्रारीत मोहन बारकू भोकनळ व शिवाजी राधाकिसन घुले या दोघा वाळूतस्करांची नावेही कळविल्याची माहिती समोर आली. त्यानंतर तहसीलदारांनी सदरील वाहनावर फौजदारी दाखल करण्याची गरज होती, पण तसे काहीच घडले नाही. अपघातानंतर जेव्हा सदरचे वाहन महिन्यापासून तहसीलदारांच्या ताब्यात असल्याची माहिती दैनिक नायकला समजली व त्याबाबतचे ठळकवृत्त प्रसिद्ध झाले त्यानंतर घाईगडबडीत ‘त्या’ दोघांवर चोरीचा गुन्हा नोंदविला गेला. हा संपूर्ण प्रकार संशयास्पद असून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्याची गांभीर्याने दखल घेवून दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *