दिलासादायक! तालुक्यातील रुग्ण बरे होण्याच्या सरासरीने ओलांडली नव्वदी!! 78 गावांमधील साडेसहाशे रुग्णांनी उपचार पूर्ण करीत आपले गांव केले कोविड शून्य!


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्यात दररोज सरासरी पन्नास रुग्णांची भर पडत असल्याने नागरिकांमध्ये कोविड विषयक भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र त्याचवेळी अत्यंत दिलासादायक आकडेवारी समोर आली असून एकुण रुग्णसंख्येतील 90 टक्क्याहून अधिक रुग्णांनी उपचार पूर्ण करीत घर गाठले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत शहरातील 46 जणांसह ग्रामीणभागातील अवघ्या 199 जणांवर विविध कोविड केअर सेंटर व कोविड हेल्थ सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. वाढत्या रुग्णसंख्येतही बरे होण्याचे प्रमाण दररोज उंचावत असल्याने कोविडचा पराभव टप्प्यात आला आहे, मात्र त्यासाठी अखंड सावधानता आणि नियमांचे सतत स्मरण ठेवण्याची नितांत गरज आहे.


संगमनेर तालुक्यात गेल्या दोन महिन्यात कोविडचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पसरला. दररोज नवनवीन भागातून व त्यातही तालुक्याच्या ग्रामीणक्षेत्रात या महामारीचा संसर्ग वाढल्याने अवघ्या काही दिवसांतच जेमतेम रुग्णसंख्या असलेल्या संगमनेरची रुग्णसंख्या तब्बल 2 हजार 806 वर जावून पोहोचली. एकीकडे फुगलेली रुग्णसंख्या दिसत असली तरीही प्रत्यक्षात मात्र त्यातील अवघे 245 रुग्ण आजच्या स्थितीत सक्रीय संक्रमित आहेत. त्यांच्यावर शहरातील विविध ठिकाणच्या कोविड केअर सेंटरसह कोविड केअर हेल्थ सेंटरमध्ये उपचार केले जात आहेत. आत्तापर्यंत संपूर्ण तालुक्यातील 2 हजार 526 रुग्णांनी उपचार पूर्ण करुन घर गाठले असून त्यात शहरातील 829 रुग्णांचा समावेश आहे.


ग्रामीणभागातील कुरणमध्ये 62, ढोलेवाडी व कौठे धांदरफळमध्ये प्रत्येकी 33, साकूरमध्ये 32 व कुरकुटवाडीत तब्बल 28 रुग्ण सापडले होते. आज या गावांसह अन्य चौदा गावांमधील मिळून आढळलेल्या तब्बल 643 रुग्णांनी वेळीच कोविडवरील उपचार घेवून घर गाठले आहे. त्यामुळे आजच्या स्थितीत आत्तापर्यंत बाधित आढळलेल्या 135 गावांतील 78 गावांमधल्या रुग्णांनी उपचार पूर्ण केल्याने या गावांमधील कोविड रुग्णांची संख्या शून्य झाली आहे. त्यामुळे शहरासह अवघ्या 57 गावांमधील 245 रुग्ण सध्या सक्रीय संक्रमित आहेत.


या 57 मधील 19 गावांतूनही संगमनेरकरांसाठी दिलासादायक वृत्त आहे. या गावांमध्ये एकुण 321 रुग्ण आढळले होते. मात्र त्यातील 302 रुग्णांनी कोविडवर मात केल्याने या एकोणावीस गावांमध्ये आज केवळ प्रत्येक एक याप्रमाणे एकुण एकोणावीस रुग्ण सक्रीय आहेत. येत्या दोन दिवसांत त्यांनाही घरी सोडले जाणार असल्याने कोविडशून्य झालेल्या गावांच्या संख्येत आणखी 19 गावांची भर पडणार आहे. कोविड प्रादुर्भावाच्या सुरुवातीच्या काळात उपचार पूर्ण करुन घरी परतणार्‍यांची संख्या 45 ते 50 टक्क्यांच्या आसपास होती. जसजसा कोविडचा संसर्ग वाढत गेला, तसतसा उपचार पूर्ण करुन घर गाठणार्‍यांचाही आकडा वाढला. गेल्या दोन महिन्यात रुग्णसंख्येने मोठे टप्पे ओलांडले हे खरे असले तरीही या दोन महिन्यात तितक्याच प्रमाणात रुग्णही बरे झाले हा देखील मोठा दिलासा आहे. सुरुवातील रुग्ण बरे होण्याची सरासरी अवघी 45 टक्के तर आज त्याच्या दुप्पट 90.02 टक्के आहे.


दुर्दैवाने या कालावधीत शहरातील बारा जणांसह तालुक्यातील 23 अशा एकुण 35 जणांना (शासकीय नोंदी नुसार) आपला बळी द्यावा लागला. यात तालुक्यातील निमोण तिन, घुलेवाडी व कासारा दुमाला येथील प्रत्येकी दोन, चंदनापूरी, चिखली, चिंचोली गुरव, धांदरफळ बु., डिग्रस, हिवरगाव पठार, जवळे कडलग, कर्‍हे, कुरण, मनोली, समनापूर व संगमनेर खुर्द येथील प्रत्येकी एकाचा बळी गेला. तर संगमनेर शहरातील मालदाड रोड आणि नायकवाडपूरा येथील प्रत्येकी दोन, मदिनानगर, मोमीनपूरा, राजवाडा, सय्यदबाबा चौक, श्रमिकनगर, मोगलपूरा, कुंभार आळा व पंपींग स्टेशन परिसरातील प्रत्येकी एकाचा मृत्यु झाला. तालुक्यातील एकुण मृत्यु झालेल्यांमध्ये 25 पुरुष तर 10 महिलांचा समावेश आहे.


आजच्या स्थितीत संगमनेर तालुक्यातील एकुण रुग्णसंख्या 2 हजार 806 असून त्यातील 2 हजार 526 रुग्णांनी यापूर्वीच उपचार पूर्ण करुन सामान्य जीवनाची सुरुवात केली आहे. सध्या तालुक्यातील केवळ 245 रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत शहरातील बारा जणांसह तालुक्यातील एकुण 35 जणांचा कोविडने बळी घेतला आहे. एकुण रुग्णसंख्येत शहरातील 887 रुग्णांचा समावेश असून त्यातील केवळ 46 रुग्ण सध्या सक्रीय संक्रमित आहेत. तर ग्रामीण भागातील 1 हजार 919 जणांना कोविडचे संक्रमण झाले होते, मात्र आज त्यातील अवघ्या 199 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. रुग्णसंख्या वाढीसोबतच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही नव्वद टक्क्यांच्या पुढे गेल्याने संगमनेरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Visits: 40 Today: 1 Total: 436107

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *