येमेनच्या कैदेतून वीस जहाज कर्मचार्‍यांची सुटका मसालाकिंग डॉ.धनंजय दातारांच्या पाठपुराव्याला यश

मुंबई, वृत्तसंस्था
गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून येमेनमध्ये कैदेत अडकलेल्या 20 जहाज कर्मचार्‍यांची अखेर सुखरुप सुटका झाली आहे. यामध्ये 14 भारतीय, 5 बांगलादेशी व एका इजिप्शियन नागरिकाचा समावेश आहे. या सर्वांच्या सुटकेसाठी दुबईतील अल अदील ट्रेडिंग समूहाचे अध्यक्ष मसालाकिंग डॉ.धनंजय दातार यांनी सातत्याने पाठपुरावा केला. येमेनमध्ये सध्या भारताचा दूतावास नसल्याने शेजारच्या जिबोती देशातील भारतीय दूतावास या कर्मचार्‍यांना तात्पुरते पासपोर्ट तसेच येमेनी प्रशासनातर्फे व्हिसा मंजुरी मिळवून देण्याबाबत अखंड प्रयत्नशील आहेत.

ओमानस्थित एका परदेशी जहाज वाहतूक (शिपिंग) कंपनीत काम करण्यासाठी हे 20 जण गेल्या जानेवारीत मस्कतला गेले होते. कंपनीला सौदी अरेबिया देशाचे वाहतुकीचे कंत्राट मिळाल्याने ते दोन जहाजांतून 3 फेब्रुवारीला ओमानहून सौदी याम्बो बंदरापर्यंत प्रवासासाठी रवाना झाले. 12 फेब्रुवारीला वादळी हवामानामुळे खवळलेल्या समुद्राने यातील एका जहाजाचा घास घेतला. वाचलेल्या दुसर्‍या जहाजातून सर्वजण पुढे निघाले, परंतु लवकरच त्या जहाजालाही खराब हवामानामुळे नांगर टाकून एकाजागी थांबावे लागले. दुर्दैवाने त्यांनी जहाज नांगरलेली जागा येमेनच्या युद्धप्रवण क्षेत्रात होती. येमेन व सौदी अरेबियात संघर्ष व चकमकी सुरू असल्याने येमेनी तटरक्षकांनी जहाजावर इशारादर्शक गोळीबार केला आणि नंतर सर्व कर्मचार्‍यांना अटक करुन येमेनच्या साना शहरातील एका हॉटेलात स्थानबद्ध केले. त्यांचे पासपोर्ट, मोबाईल, कागदपत्रे व रोख रक्कम जप्त केले.

दरम्यान, डॉ.दातार यांनी त्वरित सक्रिय होऊन जिबोतीमधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधून अथक पाठपुरावा केला. याकामी त्यांना जिबोतीतील भारतीय राजदूत अशोक कुमार, पुण्यातील धनश्री पाटील व माजी ज्येष्ठ राजदूत ज्ञानेश्वर मुळे यांचे मोलाचे साह्य झाले. तसेच दुबईतील डॉ.सुनील मांजरेकर यांचेही प्रयत्न सफल झाले. अखेर गेल्या आठवड्यात या सर्व कर्मचार्‍यांची सुटका झाली असून ते आता जिबोतीमधील भारतीय दूतावासाच्या देखरेखीखाली आहेत. भारतीय दूतावासाच्या मदतीने व्हिसा व अन्य मंजुरी मिळताच ते लवकरच सानाहून एडनमार्गे मुंबईला परततील.

जहाज कर्मचार्‍यांतील भारतीयांमध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूरचे संदीप बाळू लोहार (खडकेवाडा, ता.कागल), नीलेश धनाजी लोहार (कौलव, ता.राधानगरी), फिरोज नसरुद्दीन झारी (रत्नागिरी), अहमद अब्दुल गफूर वाकणकर (दापोली), तन्मय राजेंद्र माने (मांडवा, अलिबाग), दाऊद महमूद जोवरक (दापोली, मंडणगड), गोव्यातील चेतन हरिश्चंद्र गवस, तमीळनाडूमधील मनिराज मरीप्पन, मोहनराज थानीगचलम व विल्लीयम निकामदेन, पुदुच्चेरीमधील प्रवीण थम्मकरनताविडा, केरळमधील अब्दुल वाहब मुस्तहबा व पश्चिम बंगालमधील हिरोन शेक, उत्तर प्रदेशमधील संजीव कुमार यांचा समावेश आहे.

Visits: 118 Today: 1 Total: 1113566

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *