संगमनेरातून मुंबईला जाणारा ‘भेसळ’ दुधाचा टँकर पकडला! कासारवाडी शिवारात दुधाचा प्लँट; अन्न व औषध प्रशासनाची संयुक्त कारवाई..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
पैसा कमावण्यासाठी कोण कोणत्या पातळीपर्यंत खाली घसरेल याचा भरवसा राहिला नसल्याचे असंख्य प्रकारांवरुन दररोज समोर येत असताना आता अशा उद्योगात संगमनेर तालुक्याचाही समावेश झाला आहे. एकीकडे राजहंस, एस. आर. थोरात आणि नवले दूध यांसारख्या दूध संघांनी आपला लौकिक कमावला असताना आता संगमनेरनजीकच्या कासारवाडी शिवारातील एका दूध उद्योगाकडून नियमितपणे मुंबईला पाठविण्यात येणार्‍या दुधात भेसळ असल्याचे समोर आले आहे. गुरुवारी नाशिकच्या अन्न व औषध प्रशासनासह जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी आणि अन्नचाचणी प्रयोगशाळा यांच्या संयुक्त पथकाने केलेल्या कारवाईत सदरचा गोरखधंदा उघड झाला असून भेसळीचे दूध असलेला टँकर ताब्यात घेण्यात आला आहे.


याबाबत नाशिकच्या अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त उल्हास लोहोकरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे. त्यानुसार विभागाने गुरुवारी (ता.6) मुंबईकडे जाणार्‍या विविध चार दुधाच्या टँकरमधील 66 हजार 763 लिटर दुधाची जागेवरच तपासणी केली. या कारवाईत संगमनेर तालुक्यातील कासारा दुमाला शिवारात असलेल्या ‘प्रवरा मिल्क प्रोसेसिंग’ या खासगी दूध डेअरीतून 3 हजार 20 लिटर दूध घेवून निघालेला टँकर (क्र.एम.एच.48/ए.जी.4692) सिन्नर-घोटी मार्गावरील भाटवाडी शिवारात अडवून त्यातील दुधाचे नमूने तपासले असता दुधात भेसळ असल्याची चाचणी सकारात्मक आली आहे.

त्यामुळे संयुक्त पथकांनी सदरील टँकरमधून सखोल तपासणीसाठी वेगवेगळे चार नमुने घेवून उर्वरीत तीन हजार लिटरहून अधिक दुधाची जागेवरच विल्हेवाट लावली आहे. नष्ट केलेल्या या दुधाची एकूण किंमत 1 लाख 13 हजार 250 इतकी आहे. सदरील नमुने अधिकच्या तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्याचा अहवाल प्राप्त होताच संबंधित खासगी दूध डेअरीवर अन्नसुरक्षा व मानके कायद्यान्वये पुढील कारवाई करण्यात येणार आहे. या कारवाईत अन्नसुरक्षा अधिकारी सु. दे. महाजन, योगेश देशमुख, अमित रासकर, गोपाल कासार, एस. के. पाटील, सहाय्यक आयुक्त (अन्न) मनीष सानप, उल्हास लोहकरे, योगेश नागरे, दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी वाहनचालक निवृत्ती साबळे, नमुना सहाय्यक विजय पगारे व संजय नारागुडे यांचा सहभाग होता.

संगमनेरातून महानगरांमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात भाजीपाला, फळे व दूध पाठविण्यात येते. तालुका सहकारी दूध संघाच्या राजहंस दुधासह संगमनेरातील एस. आर. थोरात दूध डेअरी, नवले दूध यांनी राज्यासह थेट गोव्यापर्यंत आपला दबदबा निर्माण केला आहे. मात्र आजवर मानवी आरोग्यावर परिणाम करणार्‍या अशा गोष्टींमध्ये संगमनेरचे नाव आल्याचे ऐकीवात नाही. बहुधा हा प्रकार पहिल्यांदाच समोर आला असून सामान्यांच्या जीवाशी खेळणार्‍या अशा उद्योगांचा सखोल तपास करण्याची मागणी होत आहे. विशेष म्हणजे या खासगी दूध डेअरीची कासारवाडी ग्रामपंचायत कार्यालयात नोंद नसल्याचीही माहिती मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *