आता भुशाखाली दडवून होऊ लागली गोवंश मांसाची वाहतूक! उपअधीक्षकांच्या पथकाची कारवाई; 25 वासरांसह बाराशे किलो गोवंशाचे मांसही हस्तगत..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यातील सर्वात मोठी कारवाई झाल्यानंतर कंबरडे मोडलेल्या संगमनेरच्या बेकायदा गोवंश कत्तलखान्यांमधून अधुनमधून गोवंश जनावरांच्या रक्ताचे पाट वाहतच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. संगमनेरच्या उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांनी एकाच दिवशी केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवायांमधून ही गोष्ट अधोरेखीत झाली आहे. त्यांच्या पथकाने बुधवारी या कारवायांमधून बाराशे किलो गोवंशाचे मांस हस्तगत करण्यासह 25 जिवंत वासरांना अभय दिले आहे. या प्रकरणी संगमनेरातील तिघा कसायांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यातील एकाला अटक करण्यात आली आहे तर दोघे पसार झाले आहेत. या कारवाईत पोलिसांनी एकूण सव्वाचार लाखांचा मुद्देमालही हस्तगत केला आहे.

याबाबत उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांच्या कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरच्या दोन्ही कारवाया बुधवारी (ता.23) करण्यात आल्या आहेत. त्यातील पहिली कारवाई बुधवारी पहाटे पावणे दोन वाजण्याच्या सुमारास तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दितील वडगाव पान शिवारात करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांना याबाबत गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. त्याची खातरजमा केल्यानंतर त्यांनी आपल्या पथकाला आवश्यक त्या सूचना देत कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पो.ना.अण्णासाहेब दातीर, पो.कॉ.सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर, अमृत आढाव व तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार विष्णू आहेर यांनी वडगाव पान शिवारातील जनता विद्यालयासमोर सापळा लावला.

पोलिसांना मिळालेल्या वर्णनाच्या वाहनाचा शोध सुरु असतानाच पहाटे पावणे दोनच्या सुमारास संगमनेरकडून एक पांढर्‍या रंगाचा पिकअप (क्र.एम.एच.14/डी.एम.8375) येतांना दिसला. यावेळी पथकाने त्याला थांबण्याचा इशारा केला असता चालकाने काही अंतर पुढे जात रस्त्याच्या कडेला आपले वाहन उभे केले. यावेळी वाहनातून कशाची वाहतूक केली जात आहे या प्रश्नावर चालकाने लाकडाचा भुसा असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्याची खात्री करण्यासाठी सदर वाहनाची तपासणी केली असता वरकरणी भुशाच्या गोण्या भरुन त्याखाली मोठ्या प्रमाणात कापलेल्या गोवंश जनावरांचे मांस असल्याचे पोलीस पथकाला आढळून आले.

पोलीस उपअधीक्षकांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचे वाहन नाकाबंदीत अडकल्यानंतर व त्यात गोवंशाचे मांसही आढळल्यानंतर पोलिसांनी चालक मोसीन अन्वर कुरेशी (वय 31, रा.भारतनगर, संगमनेर) याला ताब्यात घेत त्याच्या वाहनातील गोवंशाच्या मांसाचे मोजमाप केले असता ते तब्बल 1 हजार 200 किलो भरले. याप्रकरणी सायंकाळी उशिराने तालुका पोलीस ठाण्यात पो.ना.दातीर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन चालकासह सदरील गोवंश मांसाचा मालक तौसिफ ताहीर कुरेशी ((पसार), रा.भारतनगर) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी 2 लाख 40 हजार रुपयांच्या गोवंश मांसासह दीड लाख रुपये किंमतीचे पिकअप वाहन असा एकूण 3 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त केला.

यातील दुसरी कारवाई बुधवारी (ता.23) दुपारी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास मदिनानगर येथील म्हसोबा मंदिराच्या लगत असलेल्या काटवनात करण्यात आली. याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार त्यांनी आपल्या वरील पथकासह शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव, पो.ना.सचिन उगले व होमगार्ड शुभम थोरात यांना कारवाईचे आदेश दिले होते. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी मदिनानगर परिसरात छापा घातला असता त्यांना म्हसोबा मंदिरालगत काटवनात मोठ्या संख्येने गोवंशाची नवजात वासरे अत्यंत निर्दयीपणाने अन्नपाण्यावाचून बांधून ठेवल्याचे दिसून आले.

या परिसरात विस्तृत प्रमाणात असलेल्या काटवनात अशाच पद्धतीने कत्तलीसाठीची जनावरे बांधून ठेवली जातात. त्यामुळे पथकाने संपूर्ण काटवनाचा परिसर पिंजून काढला असता वेगवेगळ्या ठिकाणी बांधलेली एकूण 25 वासरे पथकाच्या हाती लागली. त्या सर्वांची सुटका करीत पोलिसांनी खासगी वाहनातून त्यांची रवानगी सायखिंडीच्या जीवदया गोरक्षणात केली. सदरील वासरांच्या मालकाचा शोध घेतला असता ही वासरे तंज्जमुल निस्सार कुरेशी ((पसार), रा.मदिनानगर) याच्या मालकीची असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या प्रकरणी पो.कॉ.अमृत आढाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.

गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात केवळ अत्यावश्यक सेवांची वाहतूक करण्याची परवानगी मिळाल्यानंतर संगमनेरातील कसायांनी नामी शक्कल लढवतांना टरबूज, भाजीपाला या खाली दडवून गोवंशाचे मांस वाहून नेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांची ही शक्कल फोल ठरली. त्यानंतर गेल्या वर्षीच 2 ऑक्टोबर रोजी संगमनेरातील याच साखळी कत्तलखान्यांवर अहमदनगर पोलिसांनी छापा घातला. राज्यातील सर्वात मोठी कारवाई ठरलेल्या या छाप्यानंतर येथील बेकायदा कत्तलखान्यांचा विषय थेट राज्य पातळीवर पोहोचल्याने तेव्हापासून पोलिसांनी येथील कत्तलखाने पुन्हा सुरु होणार नाहीत असा चंग बांधला. मात्र त्या उपरांतही चोरुन लपून अशा पद्धतीने गोवंशाची कत्तल सुरुच असून त्याचे मांस वाहून नेण्यासाठी आता पुन्हा एकदा वेगवेगळे फंडे वापरण्यास सुरुवात झाली आहे. ही गोष्ट बुधवारी पोलिसांनी केलेल्या दोन कारवायांमधून स्पष्ट झाली आहे.


संगमनेरात गोवंशाची कत्तल करुन त्यांच्या मांस विक्रीतून आपला उदरनिर्वाह करणार्‍या कसायांची मोठी संख्या आहे. 2014 साली 1995 च्या कायद्यात सुधारणा करुन सरसकट गोवंशाच्या कत्तलीला मनाई करण्यात आली. त्यामुळे या व्यवसायावर पूर्णतः अवलंबून असलेल्या कसायांवर उपासमारीची वेळ आली. त्यातच जर्शी गाईच्या गोर्‍ह्यांचा शेतीसाठी कोणताही उपयोग नसल्याने शेतकरीही त्यांना सांभाळण्यास राजी नसतात. मात्र या कायद्यातील नव्या सुधारणांनी कसाई आणि शेतकरी दोघांच्याही अडचणी वाढल्या, शासनाने कायदा करतांना शेतकरी आणि कसाई या दोघांनाही पर्याय दिलेला नाही. त्यामुळे वारंवार कारवाया होवूनही येथील कत्तलखाने पूर्णतः बंद होत नाहीत हे वास्तव आहे. यासाठी या व्यवसायावर अवलंबून असलेल्या कसायांना पर्यायी उपजिविकेचे साधन उपलब्ध करुन देण्याची गरज आहे. अन्यथा कत्तल आणि कारवाया हे सूत्र कधीही थांबण्याची शक्यता धूसरच आहे.

Visits: 27 Today: 1 Total: 115644

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *