नगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजले! द्विसदस्यीय प्रभागरचनेमुळे उगवलेले भूछत्र मावळले..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
आगामी वर्ष अखेरीस मुदत संपणार्‍या राज्यातील महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. यंदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय झाला असून नगरपालिकांसाठी द्विसदस्यीय पद्धतीला मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी 2011 सालची लोकसंख्या गृहीत धरुन प्रभागांचे रेखांकन सुरु करण्यात आले आहे. मध्यंतरी शासनाने वॉर्ड रचनेचा पुरस्कार केल्याने गल्लीबोळातून अनेक भूछत्र उगवायला सुरुवात झाली होती. मात्र पक्षीय ताकद वाढवण्यासाठी बहुसदस्यीय प्रभाग रचनाच असावी असा घटकपक्षातील सगळ्यांचा सूर वाढत गेल्याने शासनाने आपल्या निर्णयात बदल करुन महापालिकांसाठी त्रिसदस्यीय तर नगरपालिकांसाठी द्विसदस्यीय प्रभागरचना जाहीर केली आहे. त्यामुळे दिड-दोन हजारांत बाजी मारण्याचे मनसुबे रचणार्‍यांचा स्वप्नभंग झाला आहे. शासकीय धोरणानुसार संगमनेरातील प्रत्येक प्रभाग साडेचार ते पाच हजार लोकसंख्येचा असेल. तर एकूण चौदा प्रभागातून 28 सदस्यांची निवड करावी लागणार आहे. यावेळी नगराध्यक्षांची निवडही नगरसेवकांमधूनच केली जाणार आहे.

येत्या वर्ष अखेरीपासून ते पुढीलवर्षी मार्चपर्यंत मुदत संपणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठरलेल्या वेळापत्रकानुसार घेण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. त्यामुळे या कालावधीत मुदत संपणार्‍या महापालिका व पालिकांच्या कार्यक्षेत्रातील राजकीय लगबग वाढली आहे. येत्या डिसेंबरच्या सुरुवातीलाच संगमनेर नगर पालिकेच्या पदाधिकार्‍यांची मुदतही संपत असल्याने संगमनेरातही निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. यापूर्वी ठाकरे सरकारने प्रभागरचना रद्द करुन पुन्हा जून्या वॉर्ड रचनेनुसार निवडणुका घेण्याच्या हालचाली सुरु केल्या होत्या. त्यामुळे शहरातील अनेक गल्ली नेत्यांना ‘जनसेवक’ होण्याची स्वप्नंही पडू लागली होती. वाढदिवस, सणवाराच्या शुभेच्छांच्या फ्लेक्समधून त्याची झलकही दिसू लागली होती. मात्र वॉर्ड रचनेपेक्षा प्रभागरचनेतून पक्षीय ताकद वाढवता येते या विचारावर हा निर्णय बदलण्यात आला व पुन्हा प्रभागरचना अस्तित्वात आली.

प्रत्येक निवडणुकीमध्ये वेगवेगळी भूमिका बजावणारा मतदार संघ अशी ओळख असलेल्या संगमनेरातील बहुतेक सर्वच राजकीय गडांवर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचाच झेंडा फडफडतोय. थोरात काँग्रेसचे मोठे नेते आहेत, मात्र संगमनेरात थोरात हाच पक्ष आहे. त्यामुळे विरोधकांमधील अनेकांची मतेही थोरातांच्या पारड्यात असतात. गेल्या तीन दशकांपासून संगमनेर नगरपालिकेवरही काँग्रेसचीच एकहाती सत्ता आहे. अपवाद वगळता मागील साडेबारा वर्षांपासून दुर्गा तांबे पालिकेची धुरा सांभाळीत आहेत. त्यांच्या कार्यकाळात निळवंड्यातून संगमनेरात थेट पाईपद्वारे पाण्याची महत्त्वकांक्षी योजना, कोट्यावधी रुपयांची सुधारित पाईपलाईन योजना, भुयारी गटार योजना, शहर सुशोभिकरणासाठी आलेला अफाट निधी यातून शहरात अनेक ठिकाणी उद्याने, स्वच्छतेच्या बाबतीत झालेले मोठे काम.

याशिवाय संगमनेर खुर्द येथील पालिकेचा कंपोस्ट डेपो म्हणजे आसपासच्या नागरिकांना अक्षरशः नकोसा झाला होता. काही क्षणांच्या प्रवासा दरम्यान येणारा येथील घाणेरड्या दुर्गंधीचा अनुभवही प्रवाशांना नकोसा वाटे. मात्र मागील काही कालावधीत पालिकेने या डेपोचा चेहरा-मोहराच बदलवून टाकला आहे. दररोज जमा होणार्‍या कचर्‍याचे वर्गीकरण, त्याच्यावर प्रक्रीया, त्यातून खतनिर्मितीसह बायोगॅससह विद्युत निर्मितीचा प्रकल्प पाहून येथे कधी दुर्गंधीयुक्त कचरा डेपो होता यावर कोणालाही विश्वास बसणार नाही. कौटुंबिक सहलीसाठी जावं इतक्या सुंदर पद्धतीने आतील भागात छोटेखानी उद्यानही तयार करण्यात आले आहे. याशिवाय हिंदु धर्मीयांच्या अमरधामचे नुतनीकरणासह शहरात सुशोभिकरणासाठी झालेली असंख्य कामे या त्यांच्या कार्यकाळातील जमेच्या बाजू आहेत. याच जोरावर गेल्या निवडणूकीत देशभर मोदी लाटेचा प्रभाव असतांनाही दुर्गा तांबे यांच्या नेतृत्त्वाखालील काँग्रेसने नगराध्यक्षपदासह 28 पैकी 23 जागा पटकावल्या होत्या. शिवसेनेला अवघ्या दोन, भाजपा, राष्ट्रवादी आणि अपक्षाला प्रत्येकी एक अशा जागा विरोधकांच्या पारड्यात पडल्या होत्या.

गेल्या निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी असे स्वतंत्र लढले होते. यात झालेल्या मतविभाजनाचा मोठा फायदा काँग्रेसला झाला. यावेळी मात्र राज्यातील राजकीय परिस्थिती वेगळी आहे. राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीची महाविकास आघाडी सत्तेत आहे. अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढाव्यात की स्वतंत्रपणे याबाबत राज्यपातळीवर कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे कार्यकर्ते भ्रमात असले, तरीही बहुतेक पक्षांच्या वरीष्ठांनी कामाला लागण्याचे आदेश दिलेले आहेत. संगमनेरात मात्र महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून कोणतीही हालचाल दिसून आली नाही. राज्यात याबाबत निर्णय होईल की नाही? आणि झालाच तरीही संगमनेरात त्याची अंमलबजावणी कशी होईल? याबाबतही तर्कवितर्क लावले जात असल्याने घटक पक्षातील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने आस्थेकदम चालण्याची भूमिका स्वीकारली आहे. वरीष्ठ पातळीवरुन निर्णय होण्यास विलंब झाल्यास या दोन्ही पक्षांची दमछाक होण्याचीही शक्यता आहे.

भारतीय जनता पक्षाने पालिकेच्या निवडणुकीची मात्र तयारी सुरु केली असून प्रत्येक प्रभागात अधिकृत उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने संघटनात्मक बांधणीलाही सुरुवात केली असून नवनवीन चेहर्‍यांना संधी देवून पक्षाकडे आकर्षित केले जात आहे. शहर भाजपाचे अध्यक्ष अ‍ॅड.श्रीराम गणपुले यांच्या नेतृत्वाखाली भाजप आपली राजकीय ताकद आजमावणार असून भाजपातील अंतर्गत गटबाजी त्यात अडसर ठरते का हा कळीचा मुद्दा असणार आहे. एकाच गटाकडे गेली तीन दशके एकहाती सत्ता असूनही आजवर विरोधकांना ठोस काही सिद्ध करता आलेले नाही. यावेळेची निवडणूक नेमकी कोणत्या मुद्द्यांवर केंद्रीत होते हे येत्या काळात समोर येणार आहे.

Visits: 22 Today: 1 Total: 115720

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *