घुलेवाडी शिवारात अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला

नायक वृत्तसेवा, संगमनेर
आज शुक्रवारी सकाळी संगमनेर शहरालगतच्या घुलेवाडी शिवारात 25 ते 30 वयोगटातील अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. याबाबतची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेत मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात अद्याप यश आलेले नाही. याबाबत पोलिसांकडून सदर मयताचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले असून मृत तरुणाबाबत कोणास काही माहिती असल्यास पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शुक्रवारी (ता.12) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास संगमनेर शहरानजीकच्या घुलेवाडी शिवारात पुणे-नाशिक महामार्गालगतच्या सर्व्हिस रस्त्यावर सदरचा मृतदेह आढळला आहे. अंदाजे 25 ते 30 वय असलेल्या या तरुणाच्या चेहर्यासह शरीरावर जखमा असून अंगात शर्टही नाही. परिसरातील नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर शहर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी जावून त्याची ओळख पटविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. सध्या सदरचा मृतदेह पालिकेच्या शवविच्छेदन गृहात ठेवण्यात आला असून पोलिसांनी त्याचे छायाचित्र प्रसिद्ध करुन मयताची ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे.
