अर्थसंकल्पीय अधिवेशनात तळेविहीर शिंदे पाणी पुरवठा योजनेवर लक्षवेधी! पाणी पुरवठा मंत्र्यांचे आमदार डॉ. किरण लहामटेंना प्रश्न सोडविण्याचे आश्वासन
नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यात माजी मंत्री मधुकर पिचड आमदार असताना तळेविहीर शिंदे येथे पाणी योजना राबविण्यात आली होती. ही पाणी योजना सदोष असल्याने या परिसरातील नागरिकांना ऐन उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासत असल्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. यावर राज्याचे सार्वजनिक पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी महत्त्वपूर्ण आश्वासन दिले.
मुंबईत सध्या विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यात आमदार डॉ. किरण लहामटे यांनी लक्षवेधी मांडली. ते म्हणाले, अकोले तळेविहीर शिंदे याठिकाणी जीवन प्राधिकरणातर्फे पिण्याच्या पाण्याची योजना 10 वर्षांपूर्वी मंजूर झाली. या योजनेचे सदोष व धिम्या गतीने काम सुरू झाले. आजही या गावांना 12 वर्षे झाली तरी पिण्याचे पाणी मिळत नाही. या आदिवासी वाड्या-पाड्यातील लोकांना लांबून पाणी आणावे लागते. या गावांना किती दिवसांत पाणी येणार? दिरंगाई करणार्या अधिकार्यांवर व ठेकेदारांवर किती दिवसांत कारवाई करणार असे प्रश्न आमदार लहामटे यांनी उपस्थित केले.
या प्रश्नाला उत्तर देताना पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, तळेविहीर शिंदे (ता. अकोले) येथे ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार 3 डिसेंबर, 2006 ला 59 लाख रुपयांची निविदा प्रसिद्ध केली होती. 2009 ला जे. जे. फड या एजन्सीला कार्यारंभ आदेश दिले. त्यानंतर कामाला सुरवात झाली. त्यावेळी आमदार लहामटे तेथे जिल्हा परिषद सदस्य होते. मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यात पाण्याचा तुटवडा होतो. जलजीवन मिशन योजना देशभरात सुरू आहे. यात 50 टक्के केंद्राकडून, 40 टक्के राज्याकडून व 10 टक्के लोकवर्गणीतून निधी उभा करावा लागतो. मात्र ही गावे आदिवासी पाडे असल्यामुळे त्यांच्याकडे सहानुभूतीने पाहणे ही सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे या गावाच्या पाणी योजनेचा तत्काळ विकास आराखड्यात समावेश करण्यात येईल. मागे काय झाले. यापेक्षा वर्षभरात या लोकांना पाणी कसे देता येईल याची उपाययोजना करण्यात येईल. नदीमधून या गावांना पाणी घेण्याचा आदेश मी दिला आहे. या योजनेला निधी जिल्हा परिषदेच्या मान्यतेने मिळेल, असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले.
यावर किरण लहामटे यांनी सांगितले की, या जिल्हा परिषद गटात मी आमदार होण्यापूर्वी केवळ अडीच वर्षेच सदस्य होतो. त्यापूर्वी मी सदस्य नव्हतो. परंतु तिथे जी योजना बनविली ती सदोष बनविली. त्या काळातील ती योजना केवळ ठेकेदारांच्या फायद्यासाठी बनविली गेली. योजना बनविल्यावर केवळ तीनच महिने या गावांना पाणी मिळाले. त्यानंतर पाणी मिळालेले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.