‘व्यापारी असोसिएशन’च्या निर्णया विरोधात ‘छोट्या’ व्यापार्‍यांचा एल्गार! ‘आम्ही संगमनेरकर’ व ‘संघर्ष टपरीधारक संघटने’चा तहसीलमध्ये ठिय्या; निवेदनही सोपविले..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोविड संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर स्थानिक प्रशासन आणि संगमनेर व्यापारी असोसिएशनच्या बैठकीत ठरल्यानुसार गुरुवारपासून शहरातील व्यवसायांना वेळेचे बंधन घालण्यात आले आहे. मात्र या निर्णयाला आता काही छोट्या व्यापार्‍यांसह टपरीधारकांनी विरोध करायला सुरुवात केली असून सदरचा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे. यासाठी ‘आम्ही संगमनेरकर’ व ‘संघर्ष टपरीधारक’ संघटनेच्या बॅनरखाली छोट्या व्यावसायिकांनी आज सकाळी संगमनेरच्या तहसीलदारांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले. यावेळी दोन्ही संघटनांच्यावतीने हा निर्णय मागे घेण्याबाबतचे निवेदन नायब तहसीलदार उमाकांत कडनोर यांना सोपविण्यात आले. त्यांनी हा निर्णय प्रशासकीय नसून कोविडच्या पार्श्‍वभूमीवर व्यापार्‍यांशी चर्चा करुन ‘ऐच्छिक’ पद्धतीने लागू करण्यात आल्याचे सांगीतले.


गेल्या काही कालावधीपासून जिल्ह्याच्या तुलनेत संगमनेर तालुक्यातील रुग्णगती काहीशी उंचावलेली आहे. एकीकडे संक्रमणाचा वेग मावळल्याने जिल्ह्यातील अपवाद वगळता सर्वच तालुक्यातील बाधितांचे आकडे नगण्य झाल्याचे दिसत असतांना संगमनेर तालुक्यातून मात्र अद्यापही दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण समोर येत आहेत. त्यातच पहिल्या लाटेनंतर संपूर्ण बाजार खुले झाल्याने परतलेल्या दुसर्‍या लाटेने संपूर्ण राज्यातील आरोग्य व्यवस्थाच उलथवली होती. तसाच प्रकार पुन्हा घडून कोविडची संभाव्य तिसरी लाटे सुरु होवू नये यासाठी स्थानिक प्रशासन आणि व्यापार्‍यांची शिखर संस्था समजल्या जाणार्‍या ‘संगमनेर व्यापारी असोसिएशन’मध्ये झालेल्या बुधवारी (ता.9) झालेल्या बैठकीतून औषधांची दुकाने वगळता शहरातील अन्य सर्व व्यवसाय सकाळी 7 ते 5 या वेळेतच सुरु ठेवण्याबाबत एकमत झाले, मात्र त्याबाबत अधिकृत आदेश काढण्यात अडचणी असल्याने हा निर्णय व्यापारी व नागरिकांनी ऐच्छिक पाळावा असे ठरले.


मात्र गुरुवारी (ता.10) संगमनेर नगर पालिका प्रशासनाने शहरात दवंडी देवून सर्व व्यवहार सायंकाळी पाच वाजता बंद करावेत असे जाहीर केल्याने मोठ्या व्यापार्‍यांसह छोटे दुकानदार, टपरीधारक, फेरीविक्रेते, भाजी व फळे विक्रेते तसेच हॉटेल व्यावसायिक यांच्यात संभ्रमण निर्माण झाला. त्यातच सायंकाळी पाच वाजता पोलीस प्रशासनाने शहरात फिरुन दुकाने बंद करण्याचे आवाहन केल्याने सर्वच स्तरातील व्यापारी व फेरीविक्रेत्यांना व्यवसाय बंद करणे भाग पडले. याबाबत काहींनी नाराजी व्यक्त केली, तर सोशल माध्यमातील काही समूहांमध्ये यावर साधकबाधक चर्चा होवून एकवटलेल्या छोट्या व्यापार्‍यांसह टपरीधारकांनी या निर्णयाला विरोध करण्यासाठी आज (ता.11) सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. तहसीलदार अमोल निकम तालुक्यातील पठारभागाच्या दौर्‍यावर असल्याने नायब तहसीलदार उमाकांत कडनोर यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेवून त्यांचे निवेदन स्वीकारले.


‘आम्ही संगमनेरकर’ व ‘संघर्ष टपरीधारक’ संघटनेच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात प्रशासनाने 1 एप्रिल ते 6 जून या कालावधीत जारी केलेले निर्बंध सहन करण्याची क्षमता नसतांनाही छोटे व्यापारी व टपरीधारकांनी तंतोतंत पाळले. गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या कोविड नियमांमूळे यासर्व घटकांसमोर मोठा प्रश्‍न उभा राहीला असून दुकानाचे भाडे, लाईट बिलं, कामगारांचे पगार, स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर भरावेच लागत असल्याने छोट्या व्यापार्‍यांची आर्थिक घडी विसकटण्यासह अनेकांचे मानसिक संतुलनही बिघडले आहे. दोनच दिवसांपूर्वी जिल्ह्यातील संक्रमणाचा वेग नियंत्रणात येवून जिल्हा ‘ग्रीन झोन’मध्ये आला व मोठ्या कालावधीनंतर व्यापारउदीम सुरु होईल अशी स्थिती निर्माण झाल्यानंतर पुन्हा मोठ्या व्यापार्‍यांच्या एका गटाशी चर्चा करुन परस्पर निर्णय घेवून त्याची सक्तिने अंमलबजावणी सुरु झाल्याने यासर्व घटकांसमोर मोठा गंभीर प्रश्‍न उभा राहीला आहे.


सदरच्या नियमांची सक्ति करता कामा नये, ज्या व्यापार्‍यांना सायंकाळी पाच वाजता दुकाने बंद करायची असतील त्यांना तो अधिकार आहे, मात्र ज्यांचे व्यवसाय सायंकाळच्या सुमारासच होतात त्यांचे मात्र या निर्णयाने मोठे हाल होत असल्याने हा अन्यायकारक निर्णय मागे घेवून सक्तिने दुकाने बंद करणे थांबवावे असे या निवेदनात म्हटले आहे. नायब तहसीलदार उमाकांत कडनोर यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेवून निवेदन स्वीकारले. यावेळी बोलतांना त्यांनी कोविड प्रादुर्भावाचा सरासरी वेग आणि संभाव्य तिसरी लाट यांचा विचार करुन व्यापारी आणि प्रशासनाच्या समन्वयातून हा निर्णय घेण्यात आला असून त्याचे पालन करणे पूर्णतः ऐच्छिक असल्याचे सांगीतले. आंदोलनकर्त्यांच्या भावना वरीष्ठांपर्यंत पोहोचवण्याचे आश्‍वासनही त्यांनी यावेळी दिले.


या ठिय्या आंदोलनात माजी उपनगराध्यक्ष जावेद जहागीरदार, सामाजिक कार्यकर्ते अमोल खताळ, अ‍ॅड.संग्राम जोंधळे, ज्येष्ठ पत्रकार किसनभाऊ हासे, ज्ञानेश्‍वर करपे, राहुल भोईर, दीपेश ताटकर, संतोष पठाडे, अक्षय थोरात, सोमनाथ परदेशी, विजय बेल्हेकर, विनोद वाडेकर, दीपक साळुंके, गुरुनाथ बाप्ते, जालिंदर लहामगे, केशव जाधव, भालचंद्र गायकवाड, अजय नाकील, नानासाहेब पर्बत, सुचिता ठाकूर, वेदांत मानवतकर, अजिंक्य उपासणी, माधुरी फटांगरे, संजय सुरजूसे, अ‍ॅड.श्रद्धा रहातेकर, अ‍ॅड.विशाल उनवणे, नुसरत अ.रहेमान सय्यद, बाबुराव पवार, अमित चव्हाण, मोहंमद अश्फाक अंसारी, सिकंदर शेख, श्रेयस करपे, शकर मुर्तडक, सागर कानकाटे, जिवन गोंगे, रविंद्र कानकाटे, सुनील खरे व मुकूंद उपरे आदी सहभागी झाले होते.


गेल्या मंगळवारी (ता.8) जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले संगमनेरात आले त्यावेळी त्यांनी तालुक्यातील संक्रमणाचा वेग अधिक असल्याचे सांगत व्यापार्‍यांना विश्‍वासात घेवून बाजारपेठांच्या वेळेत कपात करण्याची सूचना केली होती. त्यानुसार संगमनेरचे इन्सीडेंट कमांडर तथा तहसीलदार अमोल निकम यांनी ‘संगमनेर व्यापारी असोसिएशन’च्या सुमारे चाळीस जणांच्या शिष्टमंडळासमवेत बुधवारी (ता.9) बैठक घेतली. त्यातून संगमनेरातील दुकानांची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 5 अशी करावी यावर एकमत झाले व हा निर्णय व्यापार्‍यांनी स्वयंशिस्तीने पाळण्याचे ठरले. मात्र गुरुवारी (ता.10) पालिकेने दवंडी पिटवून शहरात या निर्णयाची माहिती दिली, तर पोलिसांनी सक्तिने दुकाने बंद केल्याने छोट्या व्यापार्‍यांनी त्या विरोधात आज ठिय्या आंदोलन पुकारुन सक्ति न करण्याबाबतचे निवेदन दिले.

Visits: 122 Today: 3 Total: 1103131

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *