आरोपींचे पूर्वीचे गुन्हे तपासून कडक कारवाई करू ः शेखर पाटील राहुरी गोळीबार प्रकरण; घरीच बनवले गावठी पिस्तूल
नायक वृत्तसेवा, राहुरी
राहुरी येथे सोममारी (ता.21) रात्री नाशिक परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांनी अचानक भेट दिली. गावठी पिस्तुलातून झालेल्या गोळीबाराच्या घटनास्थळाची, आरोपींच्या घरांची पाहणी केली. आरोपींची कसून चौकशी केली. आरोपींचे पूर्वीचे गुन्हे तपासून कडक कारवाई केली जाईल, असे शेखर पाटील यांनी सांगितले.
राहुरी येथे शुक्रवारी (ता.18) दुपारी एक वाजता ग्रामीण रुग्णालयासमोरील एकलव्य वसाहतीत महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे यांची कन्या माजी नगरसेविका सोनाली बर्डे-माळी यांच्यावर गावठी पिस्तुलातून गोळीबार झाला. त्यांच्या हाताच्या कोपराखाली गोळी घुसली. नगर येथे खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करून काढलेली गोळी पोलिसांनी ताब्यात घेतली. घटनेच्या दिवशी तीन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्या घरांची झडती घेतल्यावर पोलिसांना गावठी पिस्तूल तयार करण्याचा कारखाना आढळला. त्याचा स्वतंत्र गुन्हा नोंदविण्यात आला. घटनेची पोलीस उपमहानिरीक्षक शेखर पाटील यांनी गंभीर दखल घेतली. त्यांच्यासमवेत पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यासह मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. उपस्थित महिला व नागरिकांशी संवाद साधून आरोपींच्या घरात जाऊन पाहणी केली.
पत्रकारांशी बोलताना शेखर पाटील म्हणाले, अंकुश नामदेव पवार याने सोनाली बर्डे यांच्यावर गावठी पिस्तुलातून गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी अंकुशसह अन्य दोन जणांना अटक केली. आरोपींकडून वेगवेगळी माहिती मिळविली. आरोपीने स्वतःच्या घरीच गावठी पिस्तूल तयार केले. ते कसे तयार केले, याची उत्सुकता आम्हाला होती. गावठी पिस्तूल बनविण्यासाठी लागणारी उपकरणे, वापरलेले पिस्तूल जप्त केले आहे. घरगुती भांडणातून प्रकार घडला आहे. आरोपी गावठी पिस्तूल बनवून त्याची विक्री करतो की नाही, पिस्तुलाला लागणार्या गोळ्या कशी तयार करतो, याची सखोल माहिती घेण्यात आली. खंडणी वसूल करणे, जागा बळकावणे, अशा प्रकारची कृत्ये आरोपींकडून झाली असल्यास पीडित नागरिकांनी पोलीस ठाण्याशी संपर्क करून फिर्याद द्यावी, असे आवाहन शेखर पाटील यांनी केले.