सावधान! तुमच्या घरावर भुतांची छाया आहे!! काळजी करु नका म्हणत गंडवले; घोडेकर मळ्यातील प्रकार..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
तुमच्या घरावर भुताची छाया आहे, त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या अडीअडचणी आणि आजारपणाचा सामना करावा लागतोय. मी भाजीविक्रेता असून यापूर्वी तुम्ही माझ्याकडून भाजीही घेतली आहे. तुम्ही काळजी करु नका, सगळ्या संकटातून सुटका करुन देतो. दोन-पाच मिनिटांचा विधी आहे असे म्हणतं एका भोंदूने घोडेकर मळ्यातील वृद्ध दाम्पत्याला लुटण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील वृद्धांना हेरुन घडत असलेल्या अशा घटनांमुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून कारवाई होण्यासह नागरीकांनीही अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.
याबाबत दैनिक नायकच्या हाती आलेल्या विश्वसनीय माहितीनुसार सदरचा धक्कादायक प्रकार शहरातील गजबजलेल्या लोकवस्तीच्या घोडेकर मळ्यात घडला. अकोले रस्त्यावरुन कासारवाडीकडे जाणार्या मार्गावर भररस्त्यात असलेले घर हेरुन भोंदूच्या वेशातील भामट्याने आपला कावा साधला. या घरात 89 वर्षीय आजोबांसह 75 वर्षीय आजी एकत्र राहतात. शनिवारी एकजण दुचाकीवरुन आला आणि सकाळच्या कोवळ्या उन्हात पाय मोडलेल्या अवस्थेत खुर्चीवर बसलेल्या आजोबांशी संवाद साधू लागला.
आजोबा, तुमच्या घरावर भुतांची छाया आहे, मला या क्षेत्राचे ज्ञान असल्याने मला ते स्पष्टपणे जाणवत आहे. त्यामुळेच तुमच्यामागे साडेसाती लागली असून एक अडचण संपली की दुसरी उभी राहते. सारख्या आजारपणामुळे घरातील वातावरणही दुषित झाले आहे. असे म्हणत त्या भामट्याने आजोबांचा विश्वास संपादीत केला. मला तुमच्याकडून काही नको, कारण मी भाजीविक्रेता असून रोज गावातील वेगवेगळ्या भागात जावून भाजी विकून त्यांवर प्रपंच चालवत असल्याचे सांगून त्याने आजोबांचा विश्वासच जिंकला. आजींनी यापूर्वी आपल्याकडून भाजीही घेतल्याचे सांगत त्याने थेट या दाम्पत्याशी आपले संबंध निर्माण केले.
त्यानंतर घरावरील भुताची छाया आणि त्यामुळे ग्रासलेली साडेसाती दूर करण्यासाठी किरकोळ विधी करण्याची सूचना त्याने केली. आजोबांशी मारलेल्या गप्पा, त्याच्या तोंडातून वारंवार झालेला अडचणींचा उल्लेख आणि त्यावर सांगितलेल्या उपायांमुळे त्याच्यावर विश्वास बसल्याने आजोबांनीही विधी करुन घेण्याची तयारी दाखवली. त्याप्रमाणे तांब्याच्या गडव्यात दूध मिश्रीत पाणी मागवण्यात आले. त्यात काहीतरी किंमती ऐवज टाकावा अशी सूचनाही त्या भामट्याने केली. त्यानुसार आजोबांनी सुरुवातीला पुडीत बांधून ठेवलेले सोन्याचे चार मणी गडव्यात टाकले, मात्र ‘त्या’ भामट्याची नजर आजींच्या सोन्याच्या पोतंवर असल्याने त्याने एव्हढ्याने भागणार नाही, थोडं जड हवंय असे सांगत आजींच्या गळ्यातील पोतं गडव्यात टाकण्यास सांगितले.
आजींनीही लागलीच आपली पोतं काढून गडव्यात टाकली. त्यानंतर भामट्याने काहीतरी मंत्र पुटपुटत असल्याची बतावणी करुन अंगरबत्ती पेटवली व काही क्षणातच हा गडवा देवघरासमोर ठेवा व सव्वा महिन्याने त्यातीतल तुमचा ऐवज काढून बाकीचे पाणी पिंपळाच्या झाडाला घालण्यास सांगून ‘मी सव्वा महिन्याने परत तुमच्याकडे येतो’ असे सांगत त्या भामट्याने आपल्या गाडीला किक मारली. त्यानंतर बराचवेळी पाय मोडलेले आजोबा आणि हात मोडलेली आजी सुन्न अवस्थेत होते. तासाभराने भानावर आल्यानंतर आपल्यासोबत काहीतरी आक्रित घडल्याचा संशय आल्याने त्यांनी ताब्यांच्या गडव्यात हात घालून पाहिले असता त्यात दूध मिश्रीत पाण्याशिवाय काहीच नसल्याचे आणि आपली फसवणूक झाल्याचे त्यांना दिसून आले.
त्यानंतर त्यांनी याबाबत आसपासच्या काहींना सांगितले, मात्र तोपर्यंत बराच उशिर झाला होता. भाजीविक्रेता म्हणून ओळख काढून घरात घुसलेला आणि विश्वास संपादन करणारा चोरटा होता याचाही त्यांना साक्षात्कार झाला. सदरील दाम्पत्य वयोवृद्ध आणि त्यातही आजारी असल्याने त्यांच्याकडून अद्याप तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. मात्र या घटनेची वाच्चता संपूर्ण घोडेकर मळ्यासह प्रवरा परिसरात झाल्याने नागरीकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. गेल्याकाही दिवसांत संगमनेर शहरातील बसस्थानकासह अन्य काही ठिकाणी अशा घटना घडल्या असून पोलिसांनी त्याचा शोध घेण्याची मागणी होत आहे.
संगमनेरात अशी अनेक कुटुंब आहेत ज्यांच्या घरात दिवसभर केवळ वृद्ध आई-वडिलच असतात किंवा काहींची मुले दुसर्या शहरात अथवा देशांमध्ये नोकरी करतात. अशा कुटुंबांना हेरुन चोरट्यांकडून त्यांची फसवणूक करण्याच्या घटनांमध्ये सध्या वाढ होत असून त्यातून अशा प्रकारचे एकाकी जीवन जगणार्या वृद्धांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. पोलिसांनी या घटनांची गांभीर्याने नोंद घेवून त्याचा तपास लावण्याची व अशा घटनांना पायबंद घालण्याची गरज आहे. मात्र शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्यांची कार्यपद्धती विचारात घेता असे काहीही घडण्याची शक्यता धुसरच आहे.