संगणक साहित्य चोरणार्या दोघांना पकडले श्रीरामपूर शहर पोलिसांची कामगिरी; साहित्य केले जप्त
नायक वृत्तसेवा, राहाता
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था लोणी संचलित नांदूर (ता.राहाता) येथील शाळेमधील डेल कंपनीचे 7 मॉनिटर, 7 सीपीयू व संगणक साहित्य चोरणार्या दोघा आरोपींना पकडण्यात श्रीरामपूर शहर पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून चोरीचे साहित्य जप्त करण्यात आले असून पकडलेले दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत.
नांदूर येथील शाळेमधील डेल कंपनीचे 7 मॉनिटर, 7 सीपीयू व संगणक साहित्य 5 जानेवारी, 2022 रोजी रात्री शाळेच्या संगणक कक्षाची पाठीमागील खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्यांनी चारून नेले होते. याप्रकरणी मधुकर सोपान वल्टे (रा. राजुरी, ता. राहाता) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुरनं. 123/2022 भादंवि कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता.
या गुन्ह्यातील चोरीस गेलेले मॉनिटर, सीपीयू व साहित्य रोहन विजय बोथक (वय 19) व रोहित शांताराम जाधव (वय 22 दोघेही रा. नांदूर, ता. राहाता) यांनी चोरले असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरिक्षक संजय सानप यांना मिळाली. त्यावरुन शहर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने नांदूर भागात सापळा रचून रोहन बोधक याला पकडले. त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले. तसेच गुन्ह्यातील 7 मॉनिटर, सीपीयू व संगणक साहित्यही मिळून आले. तसेच त्याचा साथीदार रोहित जाधव याला सोमवारी (ता.21) पाठलाग करून पकडले असून ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय सानप, सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे, पोलीस नाईक राशिनकर, रघुवीर कारखेले, पंकज गोसावी, पोलीस शिपाई राहुल नरवडे, गौतम लगड, गौरव दुर्गुळे, रमीजराजा अत्तार यांच्या पथकाने ही कामगिरी केली. पुढील तपास पोलीस नाईक रघुवीर कारखेले करीत आहेत.