आंतरजातीय विवाह केलेल्या आणखी एका नवविवाहितेची आत्महत्या! अवघ्या महिन्याभरातच घडलेल्या दुसर्या घटनेने पालकांवर आत्मचिंतन करण्याची वेळ
नायक वृत्तसेवा, संगमनेर
शालेय अथवा महाविद्यालयीन जीवनात शिक्षणासोबतच प्रेमात पडून व नंतर घरच्यांचा विरोध झुगारुन प्रेमविवाह करणार्यांच्या नशिबी सुखंच येतं हा विचार आता भ्रमविलास ठरत आहे. संगमनेर शहरात अवघ्या महिन्याभरातच झालेल्या दोन आत्महत्यांनी ही गोष्ट अधोरेखीतच केली आहे. एकीकडे प्रेमाच्या आणभाका घेवून जीवनभर सोबत जगण्यामरण्याची वचनं घेत पाहिलेली स्वप्नं वास्तवात क्वचितच खरी ठरतात असाच काहीसा संदेश या दोन्ही घटनांनी दिला आहे. अशावेळी आपल्या कुटुंबाच्या विरोधात जावून परस्पर केलेल्या कृत्याचा आजन्म पश्चाताप करतांना नैराश्याचा जन्म होवून इतकं टोकाचं पाऊल उचलण्याची वेळ येते असंच या घटना सांगत आहेत. मंगळवारी शहरातील अरगडे गल्ली परिसरात राहणार्या अवघ्या एकोणावीस वर्षीय कोवळ्या मुलीच्या आत्म्यानेही जणू हेच सांगितले आहे. या घटनेतून पालकांवर आता आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.
अवघ्या काही महिन्यांपूर्वीच घरच्या माणसांचा विरोध झुगारुन प्रेमविवाह करुन सुखीसंसाराचे स्वप्नं पाहणार्या लालतारा वसाहतीमधील एकवीस वर्षीय वैष्णवीने त्याच वसाहतीमधील राहुल पांडुरंग घोडेकर या तरुणावर विश्वास ठेवून त्याच्याशी प्रेमविवाह केला. लग्नापूर्वी राहुलने अगदी तिला चंद्र तोडून द्यायचे स्वप्नं दाखवले होते, विवाहानंतर चंद्रतर दूरच तो तिला आपल्या स्वतःच्या आई-वडिलांच्या शाब्दिक छळातूनही वाचवू शकला नाही. त्याला वैतागून ती अवघ्या 21 वर्षांची तरुणी पुन्हा नाईलाजाने आपल्या माहेरी परतली. मात्र तेथेही सासरकडच्या मंडळींचे शुक्लकाष्ठ संपले नाही. त्याला वैतागून, नैराश्य आलेल्या त्या नवविवाहितेने अखेर टोकाचा निर्णय घेतला आणि गेल्या महिन्यात 3 जानेवारी रोजी आत्महत्या करीत आपले जीवन संपविले. या घटनेने शहराला एक संदेशही दिला, मात्र त्याकडे कोणाचेच लक्ष गेले नाही.
मंगळवारीही काहीसा तसाच प्रकार अरगडे गल्लीतील अवघ्या 19 वर्षीय तरुणीच्या रुपाने घडला. कुटुंबाच्या विरोधाला न जुमानता प्रेमविवाह करणार्या आणि त्यानंतर काही दिवसांतच स्वप्नंभंग होवून पुन्हा माहेरी परतलेल्या अमिषा सागर आहेर (अमृतवाड) या तरुणीने सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पंख्याला दोरी बांधून आपली जीवनयात्रा संपविली. अवघ्या एकोणावीस वर्षांच्या मुलीने इतके टोकाचे पाऊल का उचलले? हा प्रश्न मात्र मागे राहिल्याने ही घटना प्रत्येकाच्या मुखातून हळहळ करीत बाहेर पडू लागली. त्यातूनच पालकांच्या आत्मचिंतनाचाही विषय समोर आला, त्यावर खरेतरं गांभिर्याने विचार व्हायला हवा.
गेल्या काही कालावधीमध्ये संगमनेर तालुक्यातून बेपत्ता होणार्या मुलींचा आकडा सातत्याने वाढत आहे, ही अत्यंत चिंतेची बाब आहे. विशेष म्हणजे बेपत्ता होणार्या मुलींमध्ये अल्पवयीन मुलींचीही मोठी संख्या असणं धोक्याचा आणि सावध होण्याचाच इशारा आहे. आधुनिक युगातील पालकांचे पालकत्त्व कोठेतरी कमी पडतंय असंच जणू या घटना वारंवार सांगत आहेत. त्याकडे होणार्या दुर्लक्षातूनच अवघ्या महिन्याभरातच वैष्णवी आणि अमिषा या दोन कोवळ्या मुलींना फुलण्यापूर्वीच खुडावं लागलं आहे. शिक्षणाच्या वयात शिक्षणच घेतलं पाहिजे. त्यातूनच आपण परिपक्व होतो, त्यानंतर जीवनाचा काय तो विचार करायला मोकळीकच असल्याचा विश्वास आजच्या विद्यार्थ्यांमध्ये भरण्याची गरज आहे.