ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे रंधा-वारंघुशी रस्त्यावर अपघात तत्काळ काम सुरू करुन सूचना फलक लावण्याची नागरिकांची मागणी

नायक वृत्तसेवा, भंडारदरा
अकोले तालुक्यातील रंधा ते वारंघुशी रस्त्यावर ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे अनेक अनेक वाहने अपघातग्रस्त होत आहेत. गेल्या तीन दिवसांत चार युवक गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने ह्या रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करुन दर्जेदार करावे आणि ठिकठिकाणी सूचना फलक लावावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

रंधा ते वारंघुशी रस्त्याचे काम अहमदनगर येथील एका कंपनीस दिलेले आहे. मात्र अतिशय संथ गतीने हे काम सुरू आहे. भंडारदरा धरणापासून काही अंतरावर रस्त्यावर मोर्‍या टाकण्याचे काम सुरू असून हे काम करणार्‍या ठेकेदाराने रस्ता खोदून ठेवला आहे. या रस्त्याचे काम सुरू असल्याबाबत कुठेही फलक लावला नसल्याने रात्रीच्या वेळेस भरधाव येणार्‍या वाहनचालकांना मोर्‍या बसविण्यासाठी केलेला खोल खड्डा दिसत नसल्याने अपघात होत आहे. गत तीन दिवसांमध्ये या रस्त्यावर एकाच ठिकाणी तीन दुचाकीस्वारांना रस्त्याचा अंदाज न आल्याने खड्ड्यात पडून गंभीर जखमी झाले आहेत.

यामध्ये गुहिरे येथील गणेश नवले व विजय नवले हे जखमी झाले तर भंडारदरा येथील किरण खाडे हाही रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे गंभीर जखमी झाला आहे. त्यास लोणी येथे उपचारार्थ हलविले आहे. तसेच या ठेकेदाराच्या निष्काळजीपणाचा फटका संगमनेजवळील सायखिंडी येथील एका तरुण पत्रकाराही बसला असून तो सोमवारी (ता.21) या खड्ड्यात भरधाव वेगात दुचाकीसह पडला. यात तो गंभीर जखमी झाला आहे. त्याही अवस्थेत त्याने स्वतःला सावरत जोपर्यंत संबंधित कामाचा ठेकेदार जोपर्यंत घटनास्थळावर येत नाही, तोपर्यंत घटनास्थळावरुन हलणार नसल्याची भूमिका घेतली. तसेच जवळच असलेल्या भंडारदरा गावातील सरंपच व ग्रामस्थांनी संबधित ठेकेदास घटनास्थळावर येण्यासाठी भ्रमणध्वनीवर संपर्क साधूनही त्याने भ्रमणध्वनी उचलला नाही. तर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांनीही आपण रजेवर असल्याचे उत्तर देत सावरासावर केली. त्यानंतर संबंधित तरुणाला त्याच्या मित्रांनी व भंडारदरा गावच्या ग्रामस्थांनी विनवणी केल्यानंतर राजूर येथे पुढील उपचारांसाठी हलविले. दरम्यान, संबधित ठेकेदरावर गुन्हा दाखल करणार असल्याचे जमखी पत्रकाराने सांगितले.

दरम्यान, सदर रस्त्याचे काम अतिशय संथ गतीने सुरू असून कामाचा ठेका घेतलेल्या कंपनीने ठिकठिकाणी रस्ता खोदून ठेवलेला आहे. सदर काम सुरू असून वाहने सावकाश चालवावी अशाप्रकारची कुठेही नामफलक लावलेले नाही. खोदून ठेवलेल्या रस्त्याच्या कडेला सुरक्षाकवच टाकलेले नसल्याने अनेकांना अपघातास सामोरे जावे लागत आहे. सदर काम लवकर सुरू करुन दर्जेदार करावे आणि ठिकठिकाणी सूचना फलक लावावे. अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भंडारदर्‍याचे सरपंच व ग्रामस्थांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *