‘सिटू’च्या नेतृत्वाखाली अकोल्यात आशा कर्मचार्‍यांची निदर्शने ! सहा महिन्यांचे थकीत मानधन देण्याची मागणी; जिल्हाभर आंदोलन

नायक वृत्तसेवा, अकोले
कोविड महामारीमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या आशा कर्मचार्‍यांचे मानधन गेल्या सहा महिन्यांपासून थकविण्यात आले आहे. यामुळे कुटुंब चालविताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. आशा कर्मचार्‍यांवरील या अन्यायाच्या विरोधामध्ये सोमवारी (ता.14) संपूर्ण महाराष्ट्रभर सिटू कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलनाची हाक दिली होती. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत आज अहमदनगर जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी सिटू कर्मचारी संघटनेच्यावतीने आशा कर्मचारी संपावर गेल्या. अकोल्यातही आशा कर्मचार्‍यांनी तीव्र निदर्शने करून आपला संताप व्यक्त केला.

अकोले पंचायत समिती येथे शेकडो आशा कर्मचार्‍यांनी मोर्चा काढत तीव्र निदर्शने केली. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयामध्ये मोठ्या संख्येने आशा कर्मचारी एकत्र आल्या. थकित मानधन तातडीने जमा करा, वाढीव मानधन आशा कर्मचार्‍यांच्या खात्यावर वर्ग करा, वाढीव कामाचा बोजा देणे बंद करा या मागण्यांच्या घोषणा देत आशा कर्मचार्‍यांनी शहराचा परिसर दणाणून सोडला. आशा कर्मचार्यांच्या संपासाठी सिटू संघटनेने अकोले तालुक्यात व्यापक तयारी केली होती. येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात मोर्चाच्या तयारीसाठी मेळावा घेण्यात आला होता. त्यावेळी बेमुदत संपाचे हत्यार उपसले जाईल, असा इशारा देण्यात आला.

या निदर्शनात संगीता साळवे, अस्मिता कोते, वैशाली सुरसे, सुनीता गजे, अनिता शिंदे, फरीदा पठाण, अनिता वाकचौरे, स्वाती ताजणे, संजीवनी लगड, वर्षा बंदावने यांनी संप व आंदोलनाचे नेतृत्व केले. किसान सभेच्यावतीने डॉ. अजित नवले, माकपच्यावतीने एकनाथ मेंगाळ व ज्ञानेश्वर काकड यांनी आंदोलनास पाठिंबा दिला.

Visits: 52 Today: 1 Total: 410779

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *