जयहिंद लोकचळवळीच्यावतीने ‘व्हॅलेंटाईन डे वुईथ गांधीज थॉट’ संगमनेर तालुक्यात ठिकठिकाणी अभिनव उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

नायक वृत्तसेवा, संगमनेर
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणार्‍या जयहिंद लोकचळवळीच्यावतीने निरोगी व निकोप समाज निर्मितीचे कार्य सुरू असून तरुणाईमधून साजरे होणारे विविध डे ऐवजी व्हॅलेंटाईन डेनिमित्त गांधीजींच्या विचारावर प्रेम करण्याचा संदेश देत ‘व्हॅलेंटाईन डे विथ गांधीजी थॉट’ हा अभिनव उपक्रम सर्वत्र राबविण्यात आला.

संगमनेर तालुक्यातील नांदुरी दुमाला, पेमगिरी, वेल्हाळे, पारेगाव बु., बोटा, अकलापूर, खरशिंदे, घारगाव, कुरकुंडी, देवकौठे आदी ठिकाणी व्हॅलेंटाईन डे वीथ गांधीजी थॉट हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. यावेळी जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक आमदार डॉ. सुधीर तांबे, गांधी विचारांचे प्रचारक संकेत मुनोत, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, मिलिंद कानवडे, विलास कवडे, साहेबराव कवडे, साई संस्थानचे विश्वस्त अ‍ॅड. सुहास आहेर, सरपंच अर्चना शेळके, मीनानाथ शेळके, मिलिंद औटी, प्रा. बाबा खरात, प्रा. गणेश गुंजाळ, विरेश नवले यांसह जयहिंदचे विविध कार्यकर्ते उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना आमदार डॉ. तांबे म्हणाले, जगाला शांततेचा मंत्र देणारे महात्मा गांधी हे आंतरराष्ट्रीय राष्ट्रपुरुष होते. त्यांनी सत्य व अहिंसाच्या मंत्रातून संपूर्ण जगाला शांततेचा संदेश दिला. आज ज्यावेळेस जगामध्ये अशांतता निर्माण होते त्यावेळेस गांधीजींचे विचार हे शांतता व सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रेरणा देतात. त्यांच्या विचारांतून मार्टिन ल्युथर किंग, मलाला, नेल्सन मंडेला, बराक ओबामा आदिंनी जगभरात शांततेतून मोठी क्रांती केली आहे. सध्या तरुणाई सोशल मीडियामुळे वेगळ्या दिशेकडे जात आहे, हे अत्यंत चिंताजनक आहे. मुलांनी मोबाईल ऐवजी मैदानाकडे वळले पाहिजे. आणि अशा अस्थिर जगामध्ये गांधीजींचे विचार जोपासले पाहिजे. कुटुंबामध्ये, गावांमध्ये, राज्यांमध्ये आणि राष्ट्रांमध्ये शांतता निर्माण करण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे विचार हे मौलिक असल्याने जयहिंद लोकचळवळीच्यावतीने व्हॅलेंटाईन डे विथ गांधीजी थॉट हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला असून हा उपक्रम संपूर्ण राज्यभर राबवण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

तर गांधी विचारांचे प्रसारक संकेत मुनोत म्हणाले, अनेकजण अज्ञानातून गांधीजींवर टीका करतात. टीका करण्यापूर्वी त्यांनी गांधीजींचे विचार आणि आपली टीका ही समजून घेतली पाहिजे. जगाला शांततेचा संदेश देणार्‍या गांधीजींनी सत्य व अहिंसातून दाखवलेले धैर्य हे वीर पुरुषांचे आहे. अनेक जाती-धर्मांमध्ये विभागलेला भारत देश गांधीजींनी एका छत्राखाली आणला. लोकचळवळीतून बलाढ्य ब्रिटीश सरकारचा पराभव केला. गांधीजींच्या चळवळीत तळागाळातील माणूस सहभागी झाला म्हणून गांधीजींनी चळवळ ही संपूर्ण देशाची चळवळ झाली. आज पुन्हा या विचारांची गरज असल्याचे त्यांनी शेवटी नमूद केले.

Visits: 18 Today: 1 Total: 114966

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *