महाविकास आघाडी सरकार सर्वच परीक्षांत नापास ः विखे बेलापूर येथे बैठक आयोजित करुन कार्यकर्त्यांची भेट घेत साधला संवाद

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
राज्यातील सरकारकडे इच्छाशक्ती नसल्याने महाराष्ट्र राज्य अधोगतीकडे चालले आहेत. निर्णय घेण्याची क्षमता नसल्याने महाविकास आघाडी सरकार सर्वच परीक्षांमध्ये नापास झाल्याची टीका माजी मंत्री तथा भाजपाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

आमदार विखे पाटील मंगळवारी (ता.24) श्रीरामपूर तालुका दौर्‍यावर आले होते. दरम्यान, त्यांनी तालुक्यातील ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांच्या भेटी घेवून संवाद साधला. गावपातळीवरचे प्रश्न जाणून घेत त्यांनी प्रश्न सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. तालुक्यातील बेलापूर येथे जिल्हा परिषदेचे सदस्य शरद नवले यांच्या निवासस्थानी आयोजित बैठकीत ते बोलत होते. कार्यकर्त्यांनी नैराश्य झटकून, नव्या विचाराने एकत्रित येवून काम सुरु करण्याचे आवाहन विखे पाटील यांनी केले. कोरोनाच्या संकटानंतर निर्माण झालेल्या समस्यांचा आढावा घेत महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याचे भाष्य त्यांनी केले.

पुढे विखे पाटील म्हणाले, सरकारमध्ये थोडीही इच्छाशक्ती नसल्याने कोणताही निर्णय घेवू शकत नाहीत. घेतलेले निर्णय मागे घेण्याची वेळ मंत्र्यावर येते. सरकारच्या आनास्थेमुळे सर्वाधिक नुकसान शिक्षण क्षेत्राचे झाले. शेवटपर्यंत परीक्षा घ्यायची की नाही. हा निर्णय सरकार अद्याप करू शकले नाहीत. सरकारला ऑनलाईन शिक्षण पद्धतीत येत असलेल्या अडचणीची जाणीव नाही. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांसाठी टॅब उपलब्ध करून दिले असते. तर गोरगरीबांच्या मुलांना शिक्षण घेता आले असते. परंतु सरकारला गोरगरीबांसाठी काहीही करायचे नसल्याचा आरोप विखे पाटील यांनी केला. याप्रसंगी माजी सभापती दीपक पठारे, भाजपचे पदाधिकारी प्रकाश चिते, नानासाहेब शिंदे, बाळासाहेब तोरणे, राधाकृष्ण आहेर, नितीन भागडे, भास्कर बंगाळ, प्रफुल्ल डावरे, रणजीत श्रीगोड, शंतनू फोपसे उपस्थित होते.


युवकांनी स्टार्टअपकडे लक्ष घालावे..
कोरोनाच्या संकटात राज्य सरकारने बाजार समित्या बंद ठेवल्यामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उत्पादित माल रस्त्यावर फेकून देण्याची नामुष्की शेतकर्‍यांवर ओढावली होती. सरकारकडे शेतकरी हिताच्या कुठल्याही ठोस उपाययोजना नाहीत. परिणामी, आगामी काळात रोजगार निर्मितीचे मोठे आव्हान आहे. युवकांनी स्टार्टअपमध्ये अधिक लक्ष ठेवून उद्योगांची माहिती जाणून घेत आपल्या भागातील युवकांच्या रोजगाराची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

Visits: 159 Today: 1 Total: 1098304

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *