घारगावमध्ये मटका अड्ड्यावर पोलिसांचा छापा! थेट नियंत्रण कक्षाशी संपर्क साधल्यानंतर कारवाई
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्यातील घारगाव बसस्थानक परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवैधरित्या मटका अड्ड्यावर घारगाव पोलिसांनी छापा टाकला आहे. सदर कारवाई सोमवारी (ता.14) दुपारी दीड वाजता केली असून, अवैधरित्या चालू असलेल्या मटका चालकाला नेमका कोणाचा आशीर्वाद होता असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, घारगाव पोलीस ठाण्यापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या बसस्थानक परिसरातील राजश्री लॉटरीचे एका गाळ्याच्या पाठीमागे शेडनेटमध्ये मटका अड्डा सुरू होता. येथे नजाकतअली समशेरअली सय्यद (वय 40, रा.जहागिरदार वाडा सय्यदबाबा चौक, संगमनेर) हा लोकांकडून पैसे घेवून त्यांना कागदावर वेगवेगळे आकडे लिहून देत कल्याण मटका नावाचा हारजितीचा जुगार खेळत होता. याची खात्रीशीर माहिती गुप्त खबर्याने घारगाव पोलिसांना दिली. मात्र माहिती देवूनही घारगाव पोलीस कारवाई करण्यासाठी टाळाटाळ करत होते.
अखेर खबर्याने थेट अहमदनगर येथील पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर पोलीस शिपाई गणेश तळपाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नजाकतअली सय्यद याच्यावर गुरनं.31/2022 महा. जु. का. कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, सध्या घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक गावांमध्ये दिवसाढवळ्या अवैद्य धंदे सुरू आहेत, असे असतानाही पोलीस दुर्लक्ष का करत आहे? असा सवाल सूज्ञ नागरिकांनी केला आहे. त्यातच घारगाव पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेल्या मटका जुगार अड्ड्याला नेमका कोणाचा आशीर्वाद होता असा प्रश्नही यानिमित्ताने समोर आला आहे.