चांदे येथे चोरट्यांच्या चाकू हल्ल्यात युवक ठार दोघे गंभीर जखमी; घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी पुकारला बंद
नायक वृत्तसेवा, नेवासा
चांदे (ता. नेवासा) येथील लोहारवाडी रस्त्यावर असलेल्या कर्डिले वस्तीवर दोन चोरट्यांनी केलेल्या चाकू हल्ल्यात बावीसवर्षीय युवक ठार झाला व दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी (ता. 1) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडली आहे. या घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी बुधवारी (ता. 2) गावात ‘बंद’ पाळला.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, मंगळवारी मध्यरात्री साडेबारा वाजता दोन चोरटे कर्डिले वस्तीवर आले. आवाज झाल्याने घराबाहेर झोपलेल्या नर्मदा कर्डिले यांनी ‘कोण आहे’ म्हणून हटकले असता, चोरट्यांनी त्यांचा गळा दाबला. यावेळी घरातून बाहेर आलेल्या अर्चना व बापू कर्डिले यांना चाकूचा धाक दाखवत दागिने हिसकावून घेतले. ही झटापट सुरू असताना मदतीसाठी आलेल्या गंगाधर नामदेव कर्डिले व त्यांचा मुलगा ओमकार याने एका चोरट्यास पकडून ठेवले. दुसर्या चोरट्याने साथीदार पकडला गेल्याचे पाहिले आणि पुन्हा मागे पळत येत कर्डिले पिता-पुत्रांवर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात ओमकार (वय 22) याचा मृत्यू झाला, तर गंगाधर व बापू कर्डिले गंभीर जखमी झाले.
या घटनेची माहिती समजताच मध्यरात्री एक वाजता सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागूल व पथकाने घटनास्थळी भेट दिली. बुधवारी दुपारी तीन वाजता ओमकारवर अंत्यविधी करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांसह मराठा महासंघाचे संपर्कप्रमुख संभाजी दहातोंडे यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढत निषेध केला. नवनाथ कर्डिले यांच्या फिर्यादीवरून, रेकॉर्डवरील आरोपीच्या छायाचित्रातून ओळख पटल्याने बाबाखान शिवाजी भोसले (रा. गोंडेगाव, ता. नेवासा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या शोधासाठी पथक तयार करण्यात आले आहे. दरम्यान, मृत्युमुखी पडलेला ओमकार चेन्नई येथील कृषी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. सुट्टी असल्याने तो आई-वडिलांना भेटण्यासाठी आला होता. त्याची ही भेट शेवटची ठरल्याने, वडील गंगाधर, आई वृषाली, बहीण सई व आजीस अश्रू अनावर झाले.
पोलीस अधीक्षकांची घटनास्थळाला भेट..
बुधवारी सकाळी पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपअधीक्षक अजित पाटील यांनी श्वानपथक व ठसेतज्ज्ञांसह घटनास्थळाला भेट देत पाहणी केली.