तनपुरे कारखान्याच्या अध्यक्षपदी ढोकणे; उपाध्यक्षपदी ढूस
तनपुरे कारखान्याच्या अध्यक्षपदी ढोकणे; उपाध्यक्षपदी ढूस
नायक वृत्तसेवा, राहुरी
डॉ.बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी नामदेव पांडूरंग ढोकणे; तर उपाध्यक्षपदी दत्तात्रय आसाराम ढूस यांची बिनविरोध निवड झाली आहे. स्वीकृत संचालकपदी सुभाष आप्पासाहेब वराळे (राहुरी) यांची निवड करण्यात आली आहे. फटाक्यांची आतिषबाजी करून, समर्थकांनी आनंद व्यक्त केला.

अध्यक्षपदाच्या नावाची सूचना मावळते अध्यक्ष उदयसिंह पाटील यांनी मांडली. त्यास मावळते उपाध्यक्ष श्यामराव निमसे यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्ष पदाच्या नावाची सूचना महेश पाटील यांनी मांडली. त्यास अशोक खुरुद यांनी अनुमोदन दिले. सोमवारी (ता.17) दुपारी तनपुरे कारखान्याच्या सभागृहात संचालक मंडळाची बैठक झाली. अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक (साखर) रामेंद्रकुमार जोशी होते. या बैठकीस कारखान्याचे मार्गदर्शक व तज्ज्ञ संचालक खासदार डॉ.सुजय विखे, बाळकृष्ण कोळसे, मच्छिंद्र तांबे, केशव कोळसे, उत्तम आढाव, मधुकर पवार, रवींद्र म्हसे, भारत तारडे, नंदकुमार डोळस, हिराबाई चौधरी, शिवाजी गाडे, सूरसिंग पवार, अर्जुन बाचकर, पार्वतीबाई तारडे, विजय डौले, प्रभारी कार्यकारी संचालक भाऊसाहेब सरोदे उपस्थित होते. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाला. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी जोशी यांनी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. स्वीकृत संचालक पदाच्या एका जागेसाठी सुभाष वराळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

