शेतकर्यांसाठी मदतीचे धोरण त्वरीत जाहीर करा ः थोरात विधानसभेत आमदार बाळासाहेब थोरातांनी सरकारला धरले धारेवर

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सध्या राज्यातील शेतकरी अडचणीत असून सोयाबीन, कापूस, भाजीपाला उत्पादकांसह कांदा उत्पादक शेतकरी अत्यंत अडचणीत आहे. ज्या ज्या वेळेस शेतकरी अडचणी आला आहे. त्यावेळेस सरकारने मदत करण्याची आपली परंपरा आहे. त्यामुळे शेतकर्यांना मदतीबाबतचे स्पष्ट धोरण सरकारने त्वरीत जाहीर करावे अशी आग्रही मागणी माजी कृषी व महसूल मंत्री आणि काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत केली.

मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकर्यांच्या विविध प्रश्नांवर बोलताना आमदार थोरात म्हणाले, भाजीपाला, कापूस, सोयाबीनसह कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे. नाशिकसह इतर तालुक्यांमध्येही कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाते. कांदा पिकाच्या उत्पादनासाठी खर्चही मोठा आहे. यामुळे सध्या मातीमोल परिस्थिती निर्माण झाली आहे.

राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आणि विधानसभेतील सदस्यांच्या मागणीवरून सरकारने एक समिती आश्वासित केली आहे. मात्र या समितीमध्ये शेतकरी, व्यापारी यांचा कोणताही प्रतिनिधी नाही. याशिवाय या समितीने अहवाल कधी द्यायचा याबाबतची स्पष्टता नाही. सरकारने नाफेडतर्फे कांदा खरेदी सुरू केली आहे अशी चर्चा सुरू झाली. मात्र, कांदा खरेदी कुठे सुरू आहे हे कळण्यास तयार नाही. सध्या राज्यातील शेतकरी अडचण अत्यंत अडचणीत असून ज्या ज्या वेळी शेतकरी अडचणीत आला आहे. त्या त्या वेळेस सरकारने शेतकर्याला मदत केली असा आपला इतिहास आहे. म्हणून सरकारने कोणतेही कारण न सांगता तातडीने शेतकर्यांना मदतीचे धोरण स्पष्टपणे जाहीर करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
