यंदा श्रींचे विसर्जन कृत्रिम तलावातच ः पोलीस अधीक्षक
यंदा श्रींचे विसर्जन कृत्रिम तलावातच ः पोलीस अधीक्षक
सार्वजनिक गणेश मंडळांनी चार फुटापेक्षा मोठी मूर्ती स्थापन करु नये
नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या पाच महिन्यांपासून आपण सर्वांनीच अत्यंत संयमाचे दर्शन घडवताना या दरम्यान आलेले सर्व सण-उत्सव घरातच साजरे केले आहेत. दुर्दैवाने आपल्या जिल्ह्यातील रुग्णसंख्या खूप मोठी झाल्याने आपण प्रत्येकानेच स्वतःच आपले रक्षक बनून आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याची गरज आहे. तरुणाईचा जल्लोष असणार्या गणेश स्थापनेच्या मिरवणुकांसह यावर्षी विसर्जन मिरवणुकांनाही परवानगी दिली जाणार नाही. त्यामुळे संगमनेरकरांनी घरातच उत्सव साजरा करताना पालिकेकडून विसर्जनासाठी प्रभागनिहाय निर्माण केल्या जाणार्या कृत्रिम तलावातच श्रींचे विसर्जन करावे असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी केले.

सोमवारी (ता.17) संगमनेरच्या प्रशासकीय भवनात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षिका दीपाली काळे, संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे, प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे, पोलीस उपअधीक्षक रोशन पंडीत, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, मुख्याधिकारी डॉ.सचिन बांगर, पोलीस निरीक्षक अभय परमार, सुनील पाटील आदिंसह विविध विभागांचे अधिकारी, सार्वजनिक गणेश मंडळांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना सिंह म्हणाले की, देशात सध्या कोरोना महामारीचा प्रादुर्भाव सुरु असल्याने गेल्या पाच महिन्यांपासून आपण नियमांच्या अधीन राहूनच सार्वजनिक वावरत आहोत. त्या अनुषंगाने या दरम्यान येणार्या सर्वच उत्सवांना सार्वजनिक पातळीवर साजरे करण्यासही मर्यादा आल्या आहेत. आत्तापर्यंत सर्वांनीच संयम दाखविला आहे, पुढील काही काळापर्यंत हा संयम असाच टिकून राहण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. सार्वजनिक गणेश मंडळांनी चार फुटापेक्षा अधिक मोठी मूर्ती स्थापन करु नये असे आवाहनही त्यांनी केले.

आपल्याला काही होणार नाही हा विचार अत्यंत घातक असून एकामुळे अनेकांना त्रास होवू शकतो याचा प्रत्येकाने विचार करण्याची गरज आहे. श्रीरामपूरमध्ये तेथील सार्वजनिक मंडळांनी एकच गणपती स्थापन करण्याचे निश्चित केले आहे, कोपरगावमधूनही असाच सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. संगमनेरकरांनी नेहमीच प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे, यावर्षीही तो मिळणारच असल्याचा विश्वासही पोलीस अधीक्षक सिंह यांनी यावेळी व्यक्त केला.
अप्पर पोलीस अधीक्षिका दीपाली काळे यांनी पोलीस विभागाकडून केल्या जाणार्या सूचना अथवा कारवाई आपल्या परंपरेच्या विरोधात नसून कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी असल्याचे सांगितले. येथील सार्वजनिक गणेश मंडळांनी नेहमीच पोलिसांना सहकार्य केले आहे. ही परंपरा यावर्षीही कायम राहील असे सांगताना त्यांनी गणेशोत्सव व मोहरमचा सण घरातच साजरा करुन संगमनेरच्या सामाजिक एकोप्याची परंपरा पुढेही कायम राहील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी शासनाने सार्वजनिक उत्सवांसाठी लागू केलेल्या नियमांचे संगमनेरात तंतोतंत पालन होईल असा विश्वास व्यक्त केला. आपल्या परंपरेनुसार आपण एकीने वागलो, नियमांचे पालन केले तर कोविडच्या विषाणूंचा हमखास पराभव होईल असे सांगताना त्यांनी गणेशमूर्ती विसर्जनासाठी प्रभागनिहाय कृत्रिम तलाव निर्माण केले जाणार असल्याचे सांगितले. पालिकेच्यावतीने शहरातील गल्लोगल्ली जंतूनाशक औषधांची फवारणी सुरु असून उत्सवाच्या काळात त्यात आणखी वाढ केली जाईल असेही त्यांनी सांगितले.

नगरसेवक नूरमोहंमद शेख यांनी यंदा मुस्लिम समाजाचा मोहरम व सवार्यांचा कार्यक्रमही अत्यंत साधेपणाने साजरा केला जाणार असल्याचे सांगितले. मोहरमच्या मिरवणुका न काढता जागेवरच त्याचे विसर्जन केले जाईल. सवार्यांसाठीही अगदी दोन-चार जणांचीच उपस्थिती राहील. प्रशासन ज्या सूचना करील त्याचे तंतोतंत पालन केले जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

प्रांताधिकारी डॉ.मंगरुळे यांनी शासनाने सार्वजनिक उत्सवांसाठी लागू केलेल्या नियमावलीचे वाचन केले. यावेळी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक विश्वास मुर्तडक, किशोर टोकसे, किशोर पवार, शिवसेनेचे तुमसर संपर्क प्रमुख नरेश माळवे, राष्ट्रवादीचे प्रशांत वामन, शौकत जहागिरदार, नगरसेवक नूरमोहंमद शेख व भाजपाचे राजेंद्र देशमुख आदिंनी आपल्या सूचना मांडल्या. शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अभय परमार यांनी आभार मानले.

गणेश स्थापनेच्या मिरवणुकांसह यंदा विसर्जन मिरवणूक काढण्यावरही निर्बंध आहेत. घरगुती गणपतींचे विसर्जन करताना नदीपात्रालगत गर्दी होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने यावर्षी प्रभागनिहाय कृत्रिम तलाव निर्माण केले जाणार असून त्यातच श्रींचे विसर्जन करावे लागणार आहे. कोरोना महामारीचा मुकाबला करण्यासाठी शासन व प्रशासनाकडून सार्वजनिक उत्सवांच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नियमांचे सर्वांनी पालन करावे असाच सूर या बैठकीतून समोर आला.
