शुक्राचार्य मंदिरास तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळण्यास प्रयत्न करा ः ढाकणे
शुक्राचार्य मंदिरास तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळण्यास प्रयत्न करा ः ढाकणे
कोपरगाव पालिकेच्या मुख्याधिकार्यांकडे निवेदनातून मागणी
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
नगरपालिका हद्दीतील दैत्यगुरु शुक्राचार्य मंदीर बेट हे जगाच्या पाठीवर एकमेव ठिकाण आहे. म्हणून या भागास तीर्थक्षेत्र म्हणून जाहीर करण्यासाठी कोपरगाव नगरपालिकेने सर्वसाधारण सभेत विषय घेऊन चर्चा करावी, अशा आशयाचे निवेदन बुधवारी (ता.19) गोदामाई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांनी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना दिले आहे.

या निवेदनाद्वारे त्यांनी नगरपालिकेला विनंती केली आहे की, कोपरगाव शहरातून वाहत असलेल्या गोदावरी नदीच्या किनार्यालगत असलेले दैत्यगुरु शुक्राचार्य यांनी वास्तव्य करत तप केलेला परिसर म्हणून बेट भाग ओळखला जातो. आज या परिसरात गुरु शुक्राचार्य, कचेश्वर, विष्णू, संजीवनी विद्यापार ही मंदिरे असून अनेक इतिहासकालीन पौराणिक धर्म ग्रंथामध्ये या भागाचा उल्लेख सापडून येतो. याठिकाणी विवाह करण्यास कोणत्याही प्रकारचा मुहूर्त लागत नाही. याच ठिकाणी नारायण नागबळी, त्रिपिंडी, कालसर्प योग, सत्यनारायण महापुजा या धार्मिक पूजा करण्यासाठी दररोज भाविकांची वर्दळ असते. त्यामुळे या भागाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

वरील सर्व ऐतिहासिक व पौराणिक महत्त्वाचे स्थान कोपरगाव शहरात आहे. परंतु शौकांतिका अशी की, अजूनही शासन दरबारी हे क्षेत्र दुर्लक्षित असून या ठिकाणास तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा. या अनुषंगाने आपण येणार्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा विषय उपस्थित करत योग्य तो प्रस्ताव करुन सभेत मंजुरी घेत शासन दरबारी पाठवून हा भाग तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करावा. यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करावे. जेणेकरुन हे जर झाले तर बेट भागासोबत शहराचा कायापालट होऊ शकतो आणि आर्थिक, रोजगार संबंधी चालना मिळून विकास होऊ शकतो, असे ढाकणे यांनी निवेदनातून नमूद केले आहे.

