चोवीस तासांत धरणांच्या पाणलोटात पावणेदोन टीएमसी पाऊस! मुळा, प्रवरा, म्हाळुंगी पुन्हा दुथडी; विसर्जनापासून पाणलोटात पावसाचा जोर

नायक वृत्तसेवा, संगमनेर
मागील आठवड्यापासून धरणांच्या पाणलोटात पुनरागमन करणार्या पावसाला पुन्हा एकदा जोर चढला असून तुडूंब भरलेल्या धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे भंडारदरा, निळवंडे व मुळा या तीनही मोठ्या धरणांसह भोजापूर व आढळा धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले असून तालुक्यातील सगळ्याच नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. भंडारदरा धरणाच्या पाणलोटात पावसाचा जोर अधिक असून गेल्या अवघ्या चोवीस तासांत अकोले तालुक्यातील धरणांच्या पाणलोटात तब्बल 1 हजार 742 दशलक्ष घनफूट पाणी कोसळले आहे. मात्र सद्यस्थितीत उत्तर नगर जिल्ह्यातील सर्व धरणांचे पाणीसाठे पूर्ण क्षमतेने भरलेले असल्याने आवक होणारे संपूर्ण पाणी नदीपात्रातून वाहत आहे. पावसाचा जोर वाढल्यास पात्रातील पाण्याचा जोरही वाढणार असल्याने नदीकाठांवरील मानवी वस्त्यांना अतिसावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

उत्तर नगर जिल्ह्यातील सर्वच लहान-मोठी धरणं भरल्यानंतर पाणलोटातून पाय काढणार्या पावसाचे गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला लाभक्षेत्रात पुनरागमन झाले. सुरुवातीला गणेशोत्सवातील दहाही दिवस दररोज कोसळणारा पाऊस विसर्जनाच्या पूर्वसंध्येला लाभक्षेत्रासह पाणलोटातही सक्रीय झाला. सध्या उत्तरेतील सर्व छोटी-मोठी धरणं, जलाशये व तलाव पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत. त्यामुळे पुनरागमन करणार्या पावसाचे पाणी थेट नदीपात्रात सोडले जावू लागले. त्याचा परिणाम मरगळलेल्या मुळा, प्रवरा, आढळा व म्हाळुंगी या नद्यांना पुन्हा एकदा आवेश चढला आणि बघताबघता अवघ्या चार दिवसांतच संपूर्ण जिल्हा पावसाने चिंब भिजला. गेल्या चोवीस तासांत पाणलोटातील पावसाचा जोर वाढला असून भंडारदरा व निळवंडे ही दोन्ही धरणं भरलेली असल्याने आवक होत असलेले संपूर्ण पाणी धरणांच्या सांडव्याद्वारे नदीपात्रात सोडले जात आहे.

गेल्या चोवीस तासांत भंडारदर्याच्या पाणलोटाला पावसाने झोडपून काढल्याने सायंकाळी सहा वाजता तुडूंब भरलेल्या भंडारदर्याच्या सांडव्यातून 14 हजार 117 क्यूसेक तर विद्युतगृहाच्या मोरद्वारे 814 क्यूसेक असा एकूण 14 हजार 931 क्यूसेकचा प्रवाह निळवंडे धरणात सोडण्यात आला. त्यावेळी निळवंडे धरणाचा पाणीसाठाही 96 टक्क्यांवर असल्याने सुरक्षिततेचा उपाय म्हणून निळवंडे धरणाच्या सांडव्यातूनही 14 हजार 850 क्यूसेक व विद्युतगृहाद्वारे 660 क्यूसेक असा एकूण 15 हजार 510 क्यूसेकचा विसर्ग प्रवरानदी पात्रात सोडण्यास सुरुवात झाली. पावसाचा जोर टिकून राहिल्यास विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता धरण व्यवस्थापनाकडून वर्तविली गेल्याने स्थानिक प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनाची टिम सज्ज ठेवली होती, रात्री नदीकाठावर दवंडी देवून सावधानतेचा इशाराही देण्यात आला होता.

मात्र सुदैवाने रात्रीपासून पाणलोटातील पावसाचा जोर काही प्रमाणात मंदावला असून धरणात होणारी पाण्याची आवकही कमी झाल्याने आज (ता.16) सकाळी सहा वाजता भंडारदर्याचा विसर्ग कमी करुन 12 हजार 98 क्यूसेकवर तर निळवंड्याचा विसर्ग 10 हजार 640 क्यूसेकपर्यंत कमी करण्यात आला होता. मात्र सकाळी निळवंडे धरणातील पाण्याची आवक वाढल्याने 9 वाजता त्यात बदल करुन निळवंड्यातून 12 हजार 745 क्यूसेक पाणी सोडले जात आहे. सकाळी नऊ वाजता संगमनेर तालुक्यातील ओझर बंधार्यावरुन प्रवरापात्रात 17 हजार 188 क्यूसेक, कोतुळनजीकच्या मुळा नदीपात्रात 8 हजार 28 क्यूसेक, मुळा धरणातून मुळानदी पात्रात 8 हजार क्यूसेक, भोजापूर जलाशयाच्या भिंतीवरुन म्हाळुंगी नदीपात्रात 990 क्यूसेक व आढळा धरणाच्या सांडव्याद्वारे आढळा नदीपात्रात 783 क्यूसेकचा प्रवाह सुरु आहे.
![]()
गेल्या चोवीस तासांत भंडारदरा धरणात 818 दशलक्ष घनफूट, निळवंडे 1 हजार 48 दशलक्ष घनफूट, मुळा 581 दशलक्ष घनफूट, भोजापूर 66 दशलक्ष घनफूट व आढळा धरणात 47 दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली. तर घाटघरमध्ये 196 मि.मी, रतनवाडी 164 मि.मी, भंडारदरा 155 मि.मी, वाकी 119 मि.मी, निळवंडे 33 मि.मी, कोतूळ 23 मि.मी, आढळा 11 मि.मी, अकोले 19 मि.मी, कोपरगाव 12 मि.मी. व संगमनेर येथे 08 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
