दूध दरवाढीबाबत मुख्यमंत्र्यांवर मंत्र्यांचा दबाव ः विखे
दूध दरवाढीबाबत मुख्यमंत्र्यांवर मंत्र्यांचा दबाव ः विखे
नायक वृत्तसेवा, राहाता
दूध दरवाढीबाबत मुख्यमंत्र्यांवर मंत्र्यांचा दबाव असून महाविकास आघाडीमधील मंत्री दूधाचे भाव वाढू देत नाहीत. ज्या दूध संस्था मंत्र्यांनी निर्माण केल्या त्या शेतकरी हिताच्या की स्वत:च्या आणि बगलबच्यांच्या फायद्यासाठी? असा सवाल भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे यांनी उपस्थित करत राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

राहाता तालुक्यातील लोणी येथे भाजपच्यावतीने टपाल कार्यालयातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दूध दरवाढीबाबत पत्र पाठवा आंदोलन करण्यात आले. विखे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व आंदोलन केले. खासदार डॉ.सुजय विखे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर आदिंसह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी आमदार विखे यांनी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्रीच दूध दरवाढ करू देत नाहीत असा आरोप करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मंत्र्यांचा दबाव असल्याने दूध दरवाढीचा निर्णय होत नसल्याचा हल्ला केला. मंत्र्यांच्या दबावापेक्षा आता जनतेचा दबाव निर्माण व्हावा आणि झोपी गेलेल्या सरकारला जाग येण्यासाठी भाजपच्यावतीने दूध दरवाढीसाठी एल्गार आंदोलन करण्यात येत असून राज्यातून पाच लाख तर जिल्ह्यातून दहा हजार टपाल पत्र मुख्यमंत्र्यांना पाठविल्याचे विखे यांनी सांगितले.
