जिल्ह्यातील कोविड रुग्णसंख्या सहा महिन्यातील उच्चांकी पातळीवर! चिंताजनक! अवघ्या एकाच आठवड्यात आढळले जिल्ह्यात सोळाशे रुग्ण..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संक्रमणाच्या दुसर्या लाटेत मानवाची अपरिमित हानी करणार्या कोविडची जिल्ह्यात तिसरी लाट उसळायला सुरुवात झाली असून गेल्या सात दिवसांत एकमेकांशी स्पर्धा करणार्या आकडेवारीने आज गेल्या सहा महिन्यातील उच्चांकी पातळी गाठली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सक्रीय रुग्णांच्या संख्येतही झपाट्याने वाढ झाली असून जिल्ह्याच्या चिंता वाढल्या आहेत. प्रशासनाकडून यापूर्वीच जिल्ह्यात निर्बंध लागू करण्यात आले असून आता सक्तिने त्याची अंमलबजावणी होण्याची प्रतीक्षा आहे. आजच्या अहवालातून अहमदनगर महापालिका क्षेत्रासह राहाता व नगर तालुक्यातून सर्वाधीक रुग्ण समोर आले असून जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता 3 लाख 60 हजार 805 झाली आहे. जिल्ह्यात सोळाशेहून अधिक सक्रीय रुग्ण आहेत.

जानेवारीचे सुरुवातीचे चार दिवस वगळता जिल्ह्यातील कोविड संक्रमणाने पुन्हा एकदा गती धारण केल्याचे दिसत आहे. 1 ते 4 जानेवारी या कालावधीत जिल्ह्यात सरासरी 54.75 रुग्ण दररोज या गतीने एकूण 219 रुग्ण आढळले. गेल्या काही महिन्यांपासून जवळपास याच गतीने जिल्ह्यात रुग्ण आढळत होते. मात्र 5 जानेवारी रोजी सरासरीत अचानक वाढ होवून तीन आकडी संख्येत रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाच्या चिंता वाढल्या. त्यानंतरच्या कालावधीत कोविड संक्रमणाला प्राप्त झालेली गती आजही कायम असून गेल्या अवघ्या सात दिवसांत जिल्ह्यात सरासरी 227 रुग्ण दररोज या गतीने तब्बल 1 हजार 590 रुग्णांची भर पडली आहे. तर आत्तापर्यंतच्या अकरा दिवसांत सरासरी 164 रुग्ण या गतीने 1 हजार 809 रुग्णांची भर पडली आहे. ही संख्या गतवर्षीच्या दुसर्या लाटेनंतरच्या सरासरीनुसार आहे.

गेल्या आठवड्याभरापासून उच्चांकाच्या दिशेने मार्गक्रमण करणार्या कोविडने आज सहा महिन्यानंतरचा पहिला उच्चांक नोंदविला. आज जिल्ह्यातून एकूण 408 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यात सर्वाधिक 126 रुग्ण अहमदनगर महापालिका क्षेत्रातून समोर आले आहेत. त्या खालोखाल राहाता 48, इतर जिल्ह्यातील 41, नगर तालुका 39, श्रीरामपूर 18, अकोले व पारनेर प्रत्येकी 17, कोपरगाव 16, संगमनेर व शेवगाव प्रत्येकी 15, जामखेड 10, श्रीगोंदा 9, लष्करी रुग्णालयासह पाथर्डी प्रत्येकी 8, कर्जत 5, राहुरी, नेवासा भिंगार लष्करी परिसर व इतर राज्यातील प्रत्येकी चार अशा एकूण 408 रुग्णांचा आजच्या बाधितांमध्ये समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या एकूण रुग्णसंख्येत मोठ्या कालावधीनंतर मोठी भर पडून ती आता 3 लाख 60 हजार 805 झाली असून सक्रीय रुग्णांच्या संख्येनही सोळाशेचा आकडा गाठला आहे.

आज संगमनेर तालुक्यातून अवघे 15 रुग्ण समोर आले असून त्यात शहरातील चौघांचा समावेश आहे. मालदाड रोड परिसरात राहणारे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे 37 वर्षीय स्वीय्य सहाय्यक, शहर पोलीस ठाण्यातील 52 वर्षीय पोलीस कर्मचारी, कॅप्टन लक्ष्मी चौकातील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक व जोर्वे नाक्यावरील 21 वर्षीय तरुणाचा त्यात समावेश आहे. त्यासोबतच ग्रामीणभागातील अकरा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यात वडगाव लांडगा येथील 74 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, चिंचोली गुरव येथील 70 वर्षीय महिला, विठ्ठलनगर (गुंजाळवाडी) येथील 54 वर्षीय इसम, पारेगाव बु. येथील 55 वर्षीय इसम, चिखली येथील 17 वर्षीय मुलगा, घुलेवाडीतील 52 वर्षीय महिला, जोर्वे येथील 48 वर्षीय इसम, साकूर येथील 45 वर्षीय इसम, वडगाव पान येथील 34 वर्षीय इसम, धांदरफळ येथील 50 वर्षीय महिला व जांबुत बु. येथील 68 वर्षीय महिलेचा आजच्या बाधितांमध्ये समावेश आहे.

मागील सात दिवसांत जिल्ह्यातील कोविड रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसत असून रुग्ण समोर येण्याच्या गतीत दररोज मोठी वाढ होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली असून मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतराचे पदोपदी पालन करण्याची आवश्यकता आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे अथवा लग्नकार्य व अंत्यविधीसारख्या कार्यक्रमांना गर्दी करणे संक्रमण होण्यास कारणीभूत ठरु शकते अशी परिस्थिती सध्या जिल्ह्यात निर्माण होवू लागली आहे.

राज्यातील अनेक मंत्री, आमदार व अधिकारी कोविड संक्रमित होण्याचा सिलसिला अजूनही कायम असून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यानंतर आता त्यांचे खासगी स्वीय्य सहाय्यक अभय निर्मळ कोविड बाधित झाले आहेत. गेल्या काही दिवसांत त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी आपली काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे. यासोबतच शहरातील एका नामांकित डॉक्टरांसह शहर पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचार्यालाही कोविडची लागण झाल्याचे समोर आले आहे.

