तनपुरे कुटुंब गुन्हेगारांना कधीच साथ देणार नाही ः तनपुरे पत्रकार दातीर कुटुंबियांचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंकडून सांत्वन

नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील पत्रकार रोहिदास दातीर यांच्या हत्येचा तपास पारदर्शक आणि कोणाच्याही दबावात होणार नाही. एखाद्या कुटुंबातील कर्त्या पुरुषाची निर्घृण हत्या होणे आणि गुन्हेगारांना साथ देणे म्हणजे मानवतेला काळिमा फासण्यासारखे आहे. त्यामुळे तनपुरे कुटुंब कधीच अशा गोष्टीला समर्थन करणार नाही. आम्ही वैयक्तिक लक्ष घालून दोषींना कठोरात कठोर शिक्षा होईल आणि दुःखांकित कुटुंबाला न्याय व आमचा सच्चा कार्यकर्ता दातीर यांना तीच खरी श्रद्धांजली ठरेल. दातीर कुटुंब हे माझे कुटुंब आहे हे मी कधीही विसरणार नाही अशी भावनिक प्रतिक्रिया राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांत्वनपर भेटीप्रसंगी दिली.

पत्रकार दातीर यांनी आपल्या लेखणीच्या जोरावर अनेक राजकीय नेत्यांना घाम फोडला आहे. परंतु त्यांची लेखणी कधीही तनपुरे कुटुंबाकडे वळली नाही. मुळात दातीर यांचेच तनपुरे कुटुंबावर नितांत निष्ठा आणि प्रेम होते. राज्यमंत्री तनपुरे हे मुंबईला असल्याने त्यांना दातीर कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी पहिले दोन-चार दिवस जाता आले नाही. याचेच भांडवल करुन विरोधकांनी आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी तनपुरे कुटुंबाची या खुनाच्या गुन्ह्यात बदनामी करण्याचा प्रयत्न झाला. आपण असल्या गुन्हेगार वृत्तीला खतपाणी घालणार नाही याची खात्री आहे. परंतु दातीर कुटुंबाला न्याय देणे, दहशतीखाली जगणार्‍या कुटुंबाचे मनोबल वाढवून न्यायासाठी शाश्वत करणे, गुन्हेगार कितीही मोठे असले तरी त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. नाही तर संपूर्ण धनगर समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, अशा तीव्र भावना तेथे उपस्थित असलेल्या धनगर समाजातील नेत्यांनी मांडल्या.

यावेळी यशवंत सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय तमनर, अहिल्यादेवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्ता खेडेकर, दादाभाऊ तमनर, भारत मतकर, श्रीकांत बाचकर, संतोष बोरुडे, कुरणवाडीचे सरपंच आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, एकंदरीत परिस्थिती बघता राहुरीसारख्या शांत आणि सुसंस्कृत तालुक्यात अशी दिवसाढवळ्या हत्या होणे म्हणजे गुन्हेगारांचे वाढते मनोबल आहे, अशी घटना पुन्हा होणार नाही यासाठी अशा पशुतुल्य गुन्हेगारांच्या मुसक्या आवळने तेवढेच महत्वाचे आहे. या अशा संवेदनशील विषयावर राजकारण करून हकनाक एखाद्याची बदनामी करून आपली राजकीय खुन्नस काढणे म्हणजे लोकांच्या घरावर जाळ फेकून शेकत बसण्यासारखे आहे. त्यामुळे खून कोणत्या कारणाने झाला? कोणी केला? अशा विविध प्रश्नांची उत्तरे मिळणे अपेक्षित आहे.

Visits: 19 Today: 1 Total: 116422

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *