संगमनेरच्या साई मंदिरात सामूहिक पारायण सोहळा गुरुपोर्णिमा उत्सव; विविध धार्मिक कार्यक्रमांचीही रेलचेल..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
हजारों भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या संगमनेरातील श्रीसाई मंदिरात यंदाही गुरुपोर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे. त्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी मुख्य उत्सवाच्या आठवड्याभरापूर्वी सामुदायिक पारायण सोहळ्याचे आयोजन केले जाते. यंदाही हा सोहळा येत्या रविवारपासून (ता.14) सुरु होवून गुरुपोर्णिमेच्या दिनी त्याची सांगता होईल. शिवाय उत्सवाच्या दिवशी संतभेटीची शोभायात्रा आणि दुपारी महाप्रसादाचे (भंडारा) आयोजनही करण्यात आले आहे. संगमनेरातील अधिकाधिक भाविकांनी पारायणा सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष जसपाल डंग यांनी केले आहे.
सुमारे साडेतीन दशकांपूर्वी संगमनेरातून वाहणार्या अमृतवाहिनी प्रवरेच्याकाठी श्रीसाई मंदिराची उभारणी झाली. तेव्हापासून संगमनेरात गुरुपोर्णिमा उत्सवाचे महत्त्व वाढले असून साई मंदिरासह शहरातील स्वामीसमर्थ सेवाकेंद्र, गजानन महाराज मंदिर यासह अनेक ठिकाणी भजन-कीर्तन, प्रवचन व महाप्रसाद अशा स्वरुपात हा उत्सव साजरा केला जातो. श्रीसाई मंदिरात या उत्सवाची वेगळीच धूम असते. साईभक्तांनी मिळून निर्माण केलेल्या साई परिवाराच्यावतीने दरवर्षी या उत्सवापूर्वी सात दिवस सामुदायिकपणे श्रीसाई चरित्राचे पारायण केले जाते. या सोहळ्यात शहर व परिसरातील शेकडों साईभक्त सहभागी होतात. यावर्षीही रविवार 14 ते 21 जुलै या कालावधीत हा सोहळा होणार असून त्यासाठी नावनोंदणी करणं आवश्यक आहे.
रविवारी (ता.14) पारायणाच्या शुभारंभाप्रसंगी सायंकाळी साडेसहा वाजता पारायण करणार्यांकडून संकल्प सोडला जाणार आहे. सलग सात दिवस मंदिराच्या पारायण सभागृहात चालणार्या या सोहळ्याची सांगता उत्सवाच्या मुख्यदिवशी रविवार (ता.21) होईल. यावेळी पहाटे श्रींच्या पावन मूर्तीस लघुरुद्राभिषेक घालण्यात येवून सामुदायिक महाआरती होईल. त्यानंतर परंपरेनुसार श्रीसाईबाबांचा शेला आणि पादुका पालखीतून वाजतगाजत शोभायात्रेने श्रीस्वामी समर्थ मंदिरापर्यंत आणून संतभेटीचा दिव्य सोहळा पार पडेल.
संतभेटीच्या कार्यक्रमानंतर पारायणाला बसलेल्या भक्तांकडून श्रीसाई चरित्रातील शेवटच्या 53 व्या अध्यायाचे सामुदायिक वाचन करण्यात येईल. त्यानंतर संकल्पपूर्ती म्हणून यासर्व चरित्र पारायणकर्त्यांच्या हस्ते सकाळी 10 ते 11 या वेळेत सामुहिक सत्यनारायण महापूजा घालण्यात येईल. पहिल्यांदाच चरित्राचे पारायण करणार्या भाविकांना विश्वस्त मंडळाच्यावतीने चरित्राची प्रत आणि साईप्रतिमा भेट म्हणून दिली जाणार आहे.
दुपारी 12 वाजता श्रीसाईंची माध्यान्न आरती होईल व श्रींना नैवेद्य दाखवल्यानंतर महाप्रसादाचा (भंडारा) कार्यक्रम सुरु होईल. दरवर्षी मंदिर व्यवस्थापनाकडून होणार्या महाप्रसादाचा शहरातील 15 ते 20 हजार भाविक लाभ घेत असतात. पारायणास बसण्याची इच्छा असलेल्या भाविकांनी मंदिरात पूर्वनोंदणी करणं आवश्यक असून जास्तीतजास्त साईभक्तांनी या सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन श्रीसाई मंदिर विश्वस्त संस्था व साई परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे.
श्रीसाईबाबा हयात असताना लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व त्यांची शिर्डीत भेट झाली होती. त्यावेळी टिळकांनी बाबांना एक शेला (उपरणे) भेट म्हणून दिला होता. हा शेला बाबांनी काही दिवस वापरलाही होता. संगमनेरात श्रीसाई मंदिराची उभारणी झाल्यानंतर श्रीसाईबाबा संस्थान, शिर्डी यांच्याकडून हाच शेला संगमनेरच्या मंदिराला देण्यात आला. गुरुपोर्णिमा उत्सवाच्या दिनी हा शेला पालखीत ठेवून त्याची शोभायात्रा काढली जाते व वाजतगाजत जावून श्रीस्वामी समर्थ आणि श्री साईबाबा यांची भेट घडवली जाते. हा सोहळा भाविकांना वेगळीच अनुभूती देणारा असतो.