जमीनीच्या वादात शेतकर्‍याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न! वाघापूर शिवारातील खळबळजनक घटनेत तिघांविरोधात गुन्हा दाखल..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
इंचभर जमीनीसाठी दररोज कोठेना कोठे हाणामार्‍या होत असल्याचे समोर येत असतांना आता संगमनेर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वाघापूर शिवारातून अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आपल्याच भाऊबंदांशी सुरु असलेल्या जमीनीच्या वादाचे पर्यवसान चक्क एका तरुण शेतकर्‍याच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्याला त्याखाली चिरडण्याचा प्रकार घडला. या घटनेत जखमी झालेल्या अनिल भागवत शिंदे या 37 वर्षीय तरुणावर सध्या उपचार सुरु असून त्याच्या जवाबावरुन पोलिसांनी तिघांविरोधात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्यातील विक्रम ज्ञानदेव शिंदेे याला अटक करण्यात आली असून त्याला पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठविण्यात आले आहे.


याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संगमनेर शहरापासून जवळ असलेल्या वाघापूर शिवारात गेल्या 25 मे रोजी दुपारी अडिच वाजता सदरची घटली आहे. येथील भागवत शिंदे आणि ज्ञानदेव शिंदे यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून जमीनीवरुन वाद सुरु होते. त्यातच गेल्या बुधवारी विक्रम ज्ञानदेव शिंदे याने ट्रॅक्टरसह आपले दोन साथीदार अजित व राहुल संपत शिंदे यांना सोबत घेवून वादग्रस्त ठिकाणी प्रवेश करुन शेत नांगरण्याचा प्रयत्न केला. यावेळी फिर्यादी अनिल भागवत शिंदे (वय 37) याने त्याला विरोध करीत ट्रॅक्टर समोरच ठाण मांडले. यावेळी या चौघांमध्येही शाब्दीक चकमकी घडून शिवीगाळ व दमबाजीही झाली.


याच दरम्यान ट्रॅक्टर चालवित असलेल्या विक्रम शिंदे याने अनिल शिंदे याच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्याला चिरडून मारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचे दैवबलवत्तर होते म्हणून ट्रॅक्टरचा धक्का लागून तो खाली पडला आणि पुढच्या दोन टायरच्या मध्येच सापडल्याने चिरडण्यापासून वाचला, परंतु ट्रॅक्टरला नांगर जोडलेला असल्याने टायरखालून वाचूनही तो नांगरात अडकला आणि त्याच्या उजव्या गुडघ्याच्या बाजूने डाव्या मानेपर्यंत त्याला गंभीर दुखापत झाली. ट्रॅक्टरखालून जिवंत बाहेर पडल्याचे पाहून ट्रॅक्टर चालकाच्या उर्वरीत दोन्ही साथीदारांनी ‘हा तर वाचला रेऽ’ असे म्हणत त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.


या घटनेनंतर तिघेही तेथून ट्रॅक्टरसह पसार झाले. जखमी झालेल्या अनिल शिंदे याला त्याच्या नातेवाईकांनी संगमनेरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरु असतांना गुरुवारी रात्री पोलिसांनी त्याचा जवाब नोंदविला व त्यानुसार आरोपी नामे विक्रम ज्ञानदेव शिंदे, अजित संपत शिंदे व राहुल संपत शिंदे या तिघांविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या 307 कलमासह 323 अन्वये गुन्हा दाखल करुन या घटनेचा सूत्रधार विक्रम शिंदे याच्या मुसक्या आवळल्या. आज त्याला संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने पुढील 1 जूनपर्यंत त्याला पोलीस कोठडीत पाठविले आहे. उर्वरीत दोन्ही आरोपी पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Visits: 118 Today: 3 Total: 1104176

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *