जैन धर्मियांच्या पवित्र ‘सम्मेद शिखरा’चे संरक्षण करा! संगमनेरच्या मुस्लिम स्वयंसेवक संघाचे पंतप्रधानांना पत्राद्वारे आवाहन..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
देशातील अल्पसंख्याक समुदायात मोडणार्‍या जैन धर्मियांचे अत्यंत पवित्र धार्मिकस्थळ म्हणून झारखंडमधील सम्मेद शिखरजी ओळखले जाते. जैन धर्मियातील श्वेतांबर आणि दिगंबर अशा दोन्ही सुमदायांमध्ये ते अत्यंत पूजनीय मानले जाते. 24 जैन तीर्थकरांपैकी 20 तीर्थकरांनी या शिखरावरुन मोक्षप्राप्ती केल्याचे त्यांचे अनुयायी मानतात, त्यामुळे या स्थानाला जागतिक महत्त्व आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या अत्यंत पवित्र असलेल्या जैन धर्मस्थळाच्या परिसरात गुन्हेगारी आणि संस्कृती विरोधी शक्तिंचा वावर वाढल्याने या स्थळाचे पावित्र्य धोक्यात आले आहे. त्यामुळे हे पवित्रस्थान अशा शक्तींपासून मुक्त करावे व त्याचे पावित्र्य अबाधित रहावे यासाठी संगमनेरातील मुस्लिम स्वयंसेवक संघाने (एम.एस.एस.) देशाच्या पंतप्रधानांना पत्र लिहिले असून या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात मुस्लिम स्वयंसेवक संघाच्यावतीने झारखंडमधील या पवित्र धार्मिकस्थळाचे महत्त्व विशद् करण्यात आले आहे. देशातील जैन समुदाय अल्पसंख्याक श्रेणीत आहे. या सुमदायाच्या श्वेतांबर आणि दिगंबर अशा दोन्ही सुदायांसाठी या स्थानाचे वेगळे महत्त्व आहे. जैन धर्मियांची काशी समजल्या जाणार्‍या या शिखरांवर आणि तेथील परिसरावर केवळ जैन अनुयायांचाच अधिकार आहे. मात्र गेल्या काही कालावधीपासून या भागात संस्कृती विरोधी, समाजकंटक आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तिंचा वावर वाढला असून त्यांच्याकडून विविध बेकायदा कृत्य सुरु आहेत. त्याचा फटका जगभरातून या पवित्रस्थानी येणार्‍या भाविकांना बसत आहे.

विविध धर्म, पंथ, जाती व भाषांनी नटलेल्या आपल्या देशातील कोणत्याही नागरिकाला आपापल्या पद्धतीने आपल्या धार्मिक आस्था पाळण्याचे स्वातंत्र्य आहे. मात्र झारखंडमधील सम्मेद शिखर परिसरात समाज विघातक प्रवृत्तींमुळे या स्वातंत्र्यात बाधा उत्पन्न होत असल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. या तत्त्वांविरोधात कठोर कारवाई करुन हा परिसर दहशतमुक्त करण्यात झारखंड सरकार अपयशी ठरले आहे, त्यामुळे केंद्र सरकारनेच आता त्यासाठी पुढाकार घ्यावा असा आग्रह या पत्रातून मुस्लिम स्वयंसेवक संघाने पंतप्रधानांकडे केला आहे. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगालाही याबाबत कारवाईचे आदेश द्यावेत असेही या पत्रात म्हंटले आहे.

विविध जाती-धर्मांना सोबत घेवून चालणार्‍या भारतीय संस्कृतीत अशा प्रकारची कृत्ये होवू नयेत यासाठी झारखंडमधील सम्मेद शिखरजीचा पावन परिसर अशा अधार्मिक आणि गुन्हेगारी प्रवृत्तींपासून मुक्त करावा अशी विनवणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे. त्यावर मुस्लिम स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहसीन मणियार, शौकत पठाण, शफीक तांबोळी, जैन श्वेतांबर व दिगंबर समाजाचे सदस्य आनंद गांधी, नीलेश पाटणी आदिंच्या सह्या आहेत.


सम्मेद शिखरजी अर्थात पारसनाथ पहाड हे झारखंडमधील जैन धर्मियांचे अत्यंत पवित्रस्थान समजले जाते. जैन धर्मातील 24 तीर्थकरांपैकी 20 तीर्थकरांनी याच शिखरावरुन मोक्षाचा मार्ग प्राप्त केला आहे. त्यामुळे जगभरातील जैन धर्मियांची या पवित्रस्थळी वर्षभर मांदीयाळी असते.

जैन धर्मातील श्वेतांबर आणि दिगंबर या दोन्ही पंथांमध्ये या स्थानाचे महत्त्व असून सन 1933 सालापासून त्याच्या मालकी हक्काबाबत न्यायालयीन वाद सुरु आहेत. सध्या हा विषय सर्वोच्च न्यायालयात असून निकालापूर्वीच परस्पर तडजोडीतून हा वाद मिटवण्याचे यशस्वी प्रयत्न सुरु आहेत. त्यातच आता या परिसरात संस्कृती विरोधी व गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींचा वावर वाढू लागल्याने त्याचे महत्त्व व पावित्र्य जतनासाठी पंतप्रधानांनाच साकडे घालण्यात आले आहे.

Visits: 80 Today: 2 Total: 1107793

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *