संगमनेर नगरपरिषदेच्या विविध विकासकामांचे शनिवारी उद्घाटन शिक्षणमंत्री गायकवाड, गृह राज्यमंत्री पाटील, महसूल मंत्री थोरातांसह आमदार तांबेंची उपस्थिती

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर शहरात नगरपरिषदेच्यावतीने शनिवारी (ता.25) सकाळी 10 वाजता महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड, गृह राज्यमंत्री सतेज पाटील व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यमार्ग क्रमांक 50 वरील संगमनेर ते समनापूर रस्ता चौपदरीकरण व सुशोभीकरण कामाचा भूमिपूजन व रमाई उद्यान उद्घाटन सोहळा यांसह विविध विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण आयोजित करण्यात आले आहे. सकाळी 11 वाजता नगरपालिकेच्या प्रांगणात प्रियदर्शनी इंदिरा गांधी प्रशासकीय भवनासमोर सभा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना नगराध्यक्षा दुर्गा तांबे म्हणाल्या, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर नगरपरिषदेने सातत्याने विविध विकासकामे राबवली आहेत. नागरिकांचा सहभाग व सततची विकास कामे यातून संगमनेर नगरपरिषदेच्या राज्य व राष्ट्रीय पातळीवर गौरव झाला आहे. शहरातील वैभवशाली इमारती, विविध रस्त्यांचे जाळे, नागरिकांना आरोग्याच्या सुविधा, मुबलक व स्वच्छ पाणी, विविध उद्यानां निर्मिती यांसह अनेक विकासकामे राज्यासाठी मार्गदर्शन ठरले आहेत. शनिवारी सकाळी 10 वाजता महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील विविध विकासकामांचे लोकार्पण, भूमिपूजन व रमाई उद्यान उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

यावेळी प्रतिथयश उद्योगपती राजेश मालपाणी, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, महानंदचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, इंद्रजीत थोरात यांच्यासह संगमनेर तालुका व शहरातील विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमासाठी संगमनेर शहरातील व तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन उपनगराध्यक्ष इब्राहिम देशमुख, विविध समित्यांचे सभापती, सर्व नगरसेवक, नगरसेविका व मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी केले आहे.

प्रभाग क्रमांक 1 ते 14 मधील विविध रस्त्यांचे ट्रिमिक्स काँक्रिटीकरण, डांबरीकरण, पेव्हिंग ब्लॉक बसवणे, ओपन जिम साहित्य, पथदिवे खांब उभारणे, खुल्या जागेमध्ये वृक्ष लागवड करणे, खुल्या जागेला चैन लिंक कंपाउंड करणे यांसह क्रीडा संकुलात लॉन बसविणे, स्प्रिंकलरची व्यवस्था करणे, क्रिकेट पिच बांधणे, गंगामाई घाट परिसरात घाट भिंतीचे बांधकाम करणे, कब्रस्तान सुशोभीकरण अशा विविध विकासकामांचा समावेश आहे.
