अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा तरुण मुलीसह गोव्यातून ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; मोबाइल लोकेशनवरुन लावला शोध

नायक वृत्तसेवा, नेवासा
अल्पवयीन मुलीचे अपहरण केलेल्या अंतरवाली (ता.नेवासा) येथील तरुणास गोव्यातून मुलीसह ताब्यात घेण्यात पोलीस पथकाला यश आले आहे. त्यांना बुधवारी (ता.18) पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

6 मे रोजी अंतरवाली येथील अलीम राजू शेख (वय 22) या तरुणाने अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याचा गुन्हा 7 मे रोजी नेवासा पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. या अपहरण प्रकरणाच्या तपासात गांभीर्य दाखवले जात नसल्याचा आरोप करून तपास लावावा या मागणीसाठी काही नागरिक 9 मे रोजी पोलीस ठाण्यात आले होते. त्यांना पोलीस अधिकार्‍यांनी डांबून ठेवले. तसेच अर्वाच्च भाषा वापरल्याची तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली होती. पोलीस अधीक्षकांनीही तक्रारीची दखल घेतली होती. त्यानंतर पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांना सक्तीच्या रजेवर पाठविल्याची चर्चा होती.
पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशाने अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी तपास सुरू केला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे, दत्तात्रय गव्हाणे, मनोहर गोसावी, देवेंद्र शेलार, पोलीस नाईक शंकर चौधरी, सुरेश माळी, संदीप दरंदले, रवी सोनटक्के, फुरकान शेख, महिला पोलीस सारिका दरेकर, चालक संभाजी कोतकर यांनी मिळून नेवासा परिसरात आरोपींचा शोध घेतला असताना पोलिसांना गुप्त बातमीदारांमार्फत आरोपी वापरत असलेल्या मोबाईल क्रमांकाची माहिती मिळाली.

नमूद मोबाइल क्रमांकाच्या आधारे मोबाइल सेल विभाग व अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर येथील मोबाइल सेल यांच्या संयुक्त तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आरोपी गोव्यात असल्याचे समजले. पथकाने गोवा पोलिसांच्या मदतीने आरोपी व अपहृत अल्पवयीन मुलगी यांना कोलवा बिच (गोवा) येथून ताब्यात घेतले. त्यांना नेवासा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. नेवासा पोलीस व एलसीबी पथकाने संयुक्त कारवाई करुन आरोपीला ताब्यात घेतल्याचे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात यांनी सांगितले. आरोपीवर अपहरणाचा गुन्हा दाखल आहेच. अल्पवयीन मुलीच्या जबाबावरुन आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.

Visits: 11 Today: 2 Total: 79921

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *