कुरकुटवाडीतील तरुणाच्या मृत्यूचे रहस्य अद्यापही उलगडेना! पाच महिन्यात ‘गुढ’ मृत्यूची दुसरी घटना; घारगावचे पोलीस निरीक्षक करतात काय?..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्याच्या पठारावरील कुरकुटवाडीतील बावीस वर्षीय तरुणाच्या संशयास्पद मृत्यूला चार दिवसांचा कालावधी लोटला आहे. या प्रकरणात मयत तरुणाच्या भावाने बिबट्याला पडवीतून बाहेर पळतांना पाहिल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी वनविभागाच्या अधिकार्‍यांनाही घटनास्थळी पाचारण केले, मात्र त्यांचीही अवस्था गोंधळलेली दिसून आली. घटनास्थळाजवळच आढळून आलेल्या पंज्याचे ठसेही बिबट्याचे नसून कुत्र्याच्या पायाचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. सदरील तरुणाच्या मृतदेहाचे विच्छेदन आळे ग्रामीण रुग्णालयात झाले होते, मात्र त्यांनीही अद्याप आपला अभिप्राय दिला नसल्याने कुटकुटवाडीच्या सचिन भानुदास कुरकुटे याचा मृत्यू अद्यापही रहस्यच असून तो कशाने मयत झाला याचा शोध घेण्यातच घारगाव पोलीस अपयशी ठरले आहेत. यापूर्वी एप्रिलमध्येही केळेवाडीत एका ज्येष्ठाचा खून झाला होता. त्याला पाच महिन्यांचा कालावधी उलटूनही पोलिसांना खुनामागील हेतूच स्पष्ट करता आला नाही, त्यामुळे घारगावचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर नेमकं करतात काय असा प्रश्‍न उपस्थित झाला असून पठारभागाने इतकी निष्क्रिय कारकीर्द यापूर्वी कधीही अनुभवली नसल्याची जोरदार चर्चाही सुरु झाली आहे.


गुरुवारी (ता.26) मध्यरात्रीच्या सुमारास कुरकुटवाडीतील भानुदास विष्णू कुरकुटे यांच्या घराच्या पडवीत सदरचा प्रकार घडला होता. नोकरीच्या निमित्ताने आळंदीत (जि.पुणे) असलेल्या कुरकुटे यांची पत्नी व दोन मुले हरीश व सचिन कुरकुटवाडीतीच राहतात. गुरुवारी रात्री नेहमीप्रमाणे रात्रीचे जेवण केल्यानंतर संगिता कुरकुटे घरात तर त्यांची दोन्ही मुलं बाहेरील पडवीत दोन स्वतंत्र बाजांवर झोपी गेली. मध्यरात्रीच्या सुमारास अचानक हरीश मोठमोठ्याने ओरडू लागल्याने त्याच्या आईसह आसपास राहणारे रहिवाशी पडवीच्या दिशेने धावले. यावेळी त्याने बिबट्याने आपला भाऊ सचिन याच्यावर हल्ला केल्याचे सांगितले. पडवीतील एका बाजावर झोपलेल्या सचिनच्या गळ्याला खेालवर जखमही दिसून आली व त्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असल्याचे पाहून मदतीसाठी धावलेल्या लोकांनी त्याला खासगी वाहनातून आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात नेले.


मात्र त्याच्यावर उपचार सुरु करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. त्यामुळे त्याचा मृतदेह आळ्याच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. शुक्रवारी (ता.27) सचिन भानुदास कुरकुटे याचे शवविच्छेदनही तेथेच करण्यात आले. मात्र त्या गोष्टीला आता तीन दिवस उलटलेले असतांनाही तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी आपला अभिप्राय दिलेला नाही. या दरम्यान घारगाव पोलिसांसह उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनीही घटनास्थळी धाव घेत मयत तरुणाच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार वनविभागाच्या अधिकार्‍यांना पाचारण करीत त्याचा मृत्यू कशाने झाला याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र वनाधिकार्‍यांची अवस्थाही गोंधळलेलीच दिसून आली असून त्यांनीही अद्याप ठोसपणे काहीच सांगितलेले नाही. त्यातच घटनास्थळाजवळच बिबट्याच्या पायाचे दोन ठसे उमटल्याचे बोलले गेल्याने वनाधिकार्‍यांनी त्याचीही तपासणी केली, मात्र त्यातून भलताच निष्कर्ष समोर येवून ‘ते’ ठसे कुत्र्याच्या पायाचे असल्याचेही स्पष्ट झाले. त्यामुळे या प्रकरणाचे गुढ आणखी वाढले आहे.


सदरची घटना गुरुवारी घडल्यानंतर गेल्या चार दिवसांत घारगाव पोलिसांचा तपासही ठप्प असून त्यांची संपूर्ण भिस्त आता विच्छेदन अहवाल आणि वनविभागाच्या अभिप्रायावरच अडकल्याचे दिसत आहे. या कालावधीत पोलिसांनी या घटनेमागील सत्य शोधून काढण्याचा कोणताही प्रयत्न केल्याचे समोर आलेले नाही. त्यावरुन घारगाव पोलिसांची निष्क्रियता आणि कार्यशैली पुन्हा एकदा चर्चेत आली असून पोलीस निरीक्षक संतोष खेडकर नेमकं करतात काय? असे सवाल आता उपस्थित होवू लागले आहेत. विशेष म्हणजे गेल्या 22 एप्रिलरोजी घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दितील बोटा शिवारात असलेल्या वडदरा (केळेवाडी) येथील उत्तम बाळाजी कुर्‍हाडे (वय 63) यांचा खून झाला होता. त्यावेळी मारेकर्‍याने धारदार शस्त्राचा वापर करीत त्यांच्या छातीवर, पाठीवर व हातावर वार केल्याने त्यांचा बळी गेला. ती घटनाही त्यांच्या घराच्या पडवीतच घडली होती. त्या घटनेतील आरोपींचा मागमूस तर सोडा, त्यांच्या हत्येमागील कारणांचाही पोलिसांना अद्यापही तपास लागलेला नाही.


गुन्हेगारी कारवाया, अवैध व्यवसाय व हप्तेखोरीसारख्या विषयांमध्ये आघाडीवर असलेल्या घारगावमध्ये अवघ्या पाच महिन्यांच्या कालावधीत दोनजणांचा बळी जावूनही त्यांचा शोध न लागणे ही अतिशय गंभीर बाब असून त्यातून गुन्हेगारांचे मनोबल वाढण्याचीच अधिक शक्यता आहे. पोलीस अधीक्षकांनी पठारभागातील ही अनागोंदी संपवण्यासाठी आतातरी ठोस कृती करण्याची आवश्यकता आता नागरीकांमधून व्यक्त होत आहे. तूर्त आळे ग्रामीण रुग्णालयाकडून कुरकुटवाडीतील घटनेबाबत कोणताही निष्कर्ष समोर आलेला नसल्याने सध्या सदर प्रकरण ‘अकस्मात’ मृत्यूच्या रजिस्टरमध्येच कायम आहे.


घारगावचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांनी येथील पदभार घेतल्यापासून संपूर्ण पठारभागातील गुन्हेगारी घटना, अवैध व्यवसाय, चोर्‍या व खुनासारख्या गंभीर प्रकारांमध्ये मोठी वाढ झाली असून त्यातील एकाही प्रकरणाचा तपास लावण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. त्यातच निरीक्षक खेडकर यांची कार्यपद्धती मान्य नसल्याने घारगाव पोलीस ठाण्यातील काही कर्मचारी आजारपणाच्या रजेवर गेल्याने मनुष्यबळाचीही गरज निर्माण झाली आहे. इतके सगळे घडत असतांनाही घारगावच्या पोलीस निरीक्षकांना मिळणारे संरक्षण मात्र आश्‍चर्यजनक ठरले आहे.

Visits: 11 Today: 1 Total: 79543

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *