संगमनेरातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग ! जन्मदात्या आईसह एकावर गुन्हा; दोघांनाही अटक..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
आई-वडीलांच्या भांडणानंतर आईसह शहरातून जवळच्याच ग्रामीण भागात राहण्यास गेलेल्या एका सोळावर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या या घटनेबाबत गुरुवारी सायंकाळी शहर पोलीस ठाण्यात पोस्कोतंर्गत गुन्हा दाखल झाला असून पीडितेच्या फिर्यादीवरुन आईसह अन्य एका इसमाला पोलिसांनी गजाआड केले आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून मुलीच्या फिर्यादीवरुन चक्क जन्मदात्या आईवरच विनयभंगाचा गुन्हा दाखल होण्याची बहुधा ही पहिलीच घटना समोर आली आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील उपनगरात राहणार्‍या एका विवाहितेचे पतीशी भांडण झाल्यानंतर ती आपल्या सोळावर्षीय मुलीसह शहरानजीकच्या गुंजाळवाडी शिवारात आरोपी बाबासाहेब बाबुराव गुंजाळ याच्याकडे राहण्यास गेली. त्यानंतरच्या कालावधीत 5 ऑक्टोबर, 2021 रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सदरील अल्पवयीन मुलगी घरात एकटीच असल्याची संधी साधून आरोपी गुंजाळ याने तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.

या प्रकाराने घाबरलेल्या त्या मुलीने आरोपीला विरोध केला असता उलट त्यानेच तिला दमबाजी करीत तिच्या बहिणीला जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेबाबत पीडितेने आपल्या जन्मदात्या आईलाही सांगितले. त्यावर आरोपीला त्याचा जाब विचारण्याऐवजी त्या महिलेने उलट आपल्याच पोटच्या गोळ्याला झाला प्रकार कोणालाही न सांगण्यास आणि चूप बसण्यास बजावले. त्यामुळे घाबरलेली ती मुलगी तेथे वास्तव्यास असेपर्यंत शांत राहिली. गुरुवारी (ता.23) ती संगमनेरात आपल्या वडीलांच्या घरी आली असता तिने घडला प्रकार आपल्या पित्याच्या कानावर घातला. सदरचा प्रकार ऐकून त्यांचा पारा चढला आणि त्यांनी थेट आपल्या मुलीसह शहर पोलीस गाठून पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना घडला प्रकार सांगितला. त्यानुसार त्यांनी पीडितेच्या तक्रारीवरुन तिच्या जन्मदात्या आईसह गुंजाळवाडी शिवारात राहणारा आरोपी बाबासाहेब बाबुराव गुंजाळ याच्यावर भा.दं.वि. कलम 354 (अ), 506 सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणार्‍या कायद्याचे (पोस्को) कलम 7, 17 नुसार दोघांवरही गुन्हा दाखल करुन गुरुवारी सायंकाळी सहा वाजता त्यांना अटक केली आहे. या प्रकरणाचा पुुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.


जन्मदात्या पित्याकडून आपल्याच पोटच्या गोळ्यावर अत्याचार अथवा विनयभंगाचे प्रकार आजच्या समाजात घडत असतात. मात्र एखाद्या प्रकरणात जन्मदात्या आईकडूनच अशा प्रकरणांना पाठबळ दिले जाण्याची अथवा ते दडपून टाकण्याची संगमनेर तालुक्यातील बहुधा ही पहिलीच घटना असावी. या प्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात पीडितेच्या आईला पहिल्या क्रमांकाचे आरोपी करण्यात आले आहे.

Visits: 28 Today: 1 Total: 255776

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *