वर्षभरापूर्वी रुग्णवाहिकांचे भाडेदर निश्‍चित होवूनही रुग्णांची लुट सुरुच! उच्च न्यायालयाच्या आदेशाचा प्रादेशिक परिवहन विभागासह स्थानिक अधिकार्‍यांनाही विसर..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोविड रुग्णांसाठी वापरल्या जाणार्‍या रुग्णवाहिकांच्या बाबतीत वाहनांच्या श्रेणीनुसार दर निश्‍चिती करुन त्याबाबतचे पत्रक प्रादेशिक परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावे, सदरचे भाडेदर पत्रक प्रत्येक रुग्णवाहिकेच्या आतील व बाह्य बाजूस ठळकपणे लावावे या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा जिल्ह्याच्या प्रादेशिक परिवहन विभागासह स्थानिक अधिकार्‍यांनाही विसर पडल्याने अवघ्या पाच किलोमीटर परिघाच्या संगमनेर शहरात रुग्णांच्या अंतर्गत वाहतुकीसाठी रुग्णवाहिका चालकांकडून तब्बल दहा-दहा हजारांपर्यंत रकमा घेवून रुग्णांची लुट सुरु आहे. विशेष म्हणजे तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी प्रादेशिक परिवहन सचिवांसह गेल्यावर्षी जुलैमध्येच याबाबतचे परिपत्रक काढले होते, मात्र जिल्ह्यातील सर्वच अधिकार्‍यांना त्याचा विसर पडल्याने मागील तीन महिन्यांपासून बिनबोभाटपणे रुग्णांची आर्थिक पिळवणूक सुरुच आहे.


मागील वर्षी देशासह राज्यात कोविडचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर रुग्ण, रुग्णालय आणि रुग्णवाहिका याबाबतच्या विविध बातम्यांनी दररोज वातावरण ढवळून निघत होते. अव्वाच्या सव्वा बिलं उकळणार्‍या रुग्णालयांचा आदर्श रुग्णवाहिकांच्या चालकांनीही स्विकारल्याने घरातून रुग्णालयात, रुग्णालयातून घरात अथवा रुग्णालयातून स्मशानात नेण्यासाठी रुग्णवाहिकांच्या चालकांकडून रुग्णांच्या नातेवाईकांची आर्थिक अडवणूक होवू लागल्याने गेल्या जूनमध्ये मुंबई उच्च न्यायालयात जनहितार्थ याचिका दाखल झाली होती. त्यावर सुनावणी घेताना मुंबई उच्च न्यायालयाने परिवहन विभागाला आदेशित करतांना 9 जून 2020 रोजी वाहनांच्या श्रेणीनुसार रुग्णवाहिकांचे भाडेदर निश्‍चित करावेत, त्याबाबतचे भाडेदर पत्रक प्रादेशिक परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावे असे स्पष्ट आदेश दिले होते.


त्या अनुषंगाने राज्याच्या प्रादेशिक परिवहन उपायुक्तांनी 24 जून 2020 रोजी राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन प्राधिकरणांना आदेश बजावून रुग्णवाहिकांचे भाडेदर सुधारणेबाबत बैठक घेवून परिचालन पद्धतीने ठराव मांडून घेतलेल्या निर्णयाची माहिती त्वरीत सादर करण्यास सांगतिले होते. त्यासोबतच माहितीसाठी म्हणून अन्य ठिकाणच्या परिवहन प्राधिकरणांनी ठरविलेल्या सुधारित दरांचा तुलनात्मक तक्ताही जोडण्यात आला होता. त्यानुसार तत्कालीन जिल्हाधिकारी तथा अहमदनगरच्या प्रादेशिक परिवहन समितीचे अध्यक्ष राहुल द्विवेदी, समितीचे सचिव तथा अहमनगरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील, श्रीरामपूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ए.ए.खान आणि समितीचे सदस्य तथा तत्कालीन जिल्हा पोलीस प्रमुख अखिलेशकुमार सिंह यांच्या बैठकीत सुधारित भाडेदर निश्‍चितीचा प्रस्ताव ठेवण्यात आला व त्यावर साधकबाधक चर्चा होवून जिल्ह्यातील रुग्णवाहिकांचे भाडेदर निश्‍चित करण्यात आले होते.


त्यानुसार रुग्णवाहिकांची श्रेणी ठरवितांना समितीने मारुती व्हॅनसाठी 25 किलोमीटर अथवा दोन तासाच्या वापरासाठी सातशे रुपये, किमान वापराच्या मर्यादे पालिकडे 14 रुपये प्रति किलोमीटर, टाटा सुमो व मॅटेडोर सारख्या वाहनातील रुग्णवाहिकांसाठी 25 किलोमीटर अथवा दोन तासाच्या वापरासाठी 840 रुपये, किमान वापराच्या मर्यादे पालिकडे 14 रुपये प्रति किलोमीटर, टाटा 407 अथवा स्वराज माझदा या वाहनांच्या साठ्यावरील बांधणी असलेल्या रुग्णवाहिकांच्या 25 किलोमीटर अथवा दोन तासाच्या वापरासाठी 980 रुपये, किमान वापराच्या मर्यादे पालिकडे 20 रुपये प्रति किलोमीटर आणि अतिदक्षता विभागातील सुविधा असलेल्या अथवा वातानुकूलीत सोय असलेल्या रुग्णवाहिकांसाठी 25 किलोमीटर अथवा दोन तासाच्या वापरासाठी 1 हजार 190 रुपये, किमान वापराच्या मर्यादे पालिकडे 24 रुपये प्रति किलोमीटर याप्रमाणे दरनिश्‍चिती करण्यात आली होती.


या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी निश्‍चित केलेल्या अटी व शर्तीनुसार रुग्णवाहिकेच्या किमान वापरासाठी 25 किलोमीटर अथवा दोन तास निश्‍चित करण्यात आले होते. किमान वापरापेक्षा पुढील अतिरीक्त वापराच्या भाड्यापोटी समितीने प्रति किलोमीटर प्रमाणे ठरविलेल्या दरानुसारच भाडे आकारणी करावी याबाबत ‘त्या’ आदेशात स्पष्ट लिहीले आहे. रुग्णांच्या वाहतुकीसाठी कार्यान्वीत असलेल्या जिल्ह्यातील सर्व रुग्णवाहिकांनी आपल्या वाहनाच्या आतील व बाह्य बाजूस स्पष्ट दिसेल अशा पद्धतीने भाडेदर पत्रक लावण्याचे बंधनही समितीने रुग्णवाहिकेच्या मालक व चालकांना घातले आहे. या भाडेदराचे पुनर्विलोकन दर दोन वर्षांनी करण्यात येईल असेही 3 जुलै 2020 रोजीच्या आदेशातून स्पष्ट करण्यात आले आहे. याचा अर्थ समितीने निश्‍चित केलेले रुग्णवाहिकांचे भाडेदर हा 2 जुलै 2022 पर्यंत लागू राहणार आहे हे निश्‍चित आहे.


असे असतांनाही गेल्या दोन महिन्यांपासून केवळ संगमनेरच नव्हेतर संपूर्ण जिल्ह्यातील रुग्णवाहिका चालकांनी (अपवाद वगळता) रुग्णांची अक्षरशः आर्थिक पिळवणूक चालविली आहे. संगमनेर शहरातील रुग्णालयातून शहरातीलच घरापर्यंत, घरापासून रुग्णालयापर्यंत अथवा रुग्णालयातून स्मशानापर्यंत नेण्यासाठी काही रुग्णवाहिका चालकांनी पाच हजार रुपयांपासून 20 हजार रुपयांपर्यंतच्या रकमा वसुल केल्या. शहरातील एका रुग्णाच्या आईला संगमनेरातून नाशिकला नेण्यासाठी तब्बल 35 हजार रुपये भाडे द्यावे लागले होते. गेल्यावर्षी जुलैमध्येच रुग्णवाहिकांची भाडेदर निश्‍चिती झालेली असतांनाही सध्याची प्रादेशिक परिवहन प्राधिकरण समिती आणि स्थानिक अधिकार्‍यांना त्याचा विसर पडल्याने आजही जिल्ह्यातील रुग्णांची लुट अशीच बिनबोभाटपणे सुरु आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये जिल्हा प्रादेशिक परिवहन प्राधिकरण समितीने 3 जुलै 2020 रोजी जिल्ह्यातील रुग्णवाहिकांचे वाहनांच्या श्रेणीनुसार भाडेदर निश्‍चित केलेले आहेत. संगमनेर उपविभागातील सर्व रुग्णवाहिकांच्या मालक व चालकांनी त्यानुसारच भाडे आकारणी करावी. मा.उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार प्रत्येक रुग्णवाहिकेच्या आंत व बाहेर भाडेदर पत्रक स्पष्टपणे लावावे.रुग्ण अथवा त्यांच्या नातेवाईकांकडून ठरवून दिलेल्या भाडेदरापेक्षा अधिक रक्कम घेतल्याचे निदर्शनास आल्यास अथवा तशी कोणाची तक्रार आल्यास अशा रुग्णवाहिकांच्या मालक व चालकांवर उपप्रादेशिक परिवहन प्राधिकरणाद्वारा कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
डॉ.शशीकांत मंगरुळे
उपविभागीय अधिकारी, संगमनेर उपविभाग

Visits: 9 Today: 1 Total: 118791

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *