संगमनेरातील थोरात नावाचा पक्ष आघाडी करणार का? चार दशकांत तालुक्यावर गाजवले एकहाती वर्चस्व..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या तीन दशकांपासून एकहाती वर्चस्व असलेल्या पालिकेत राज्यातील नवे सत्ता समीकरण लागू होणार का? या प्रश्नाभोवती सध्या संगमनेरातील राजकीय चर्चा रंगल्या आहेत. पालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने आघाडी केल्यास त्याचा त्यांना कितपत राजकीय फायदा होईल यावरही सध्या चर्चा सुरु आहेत. शहराच्या गावठाण भागात काहीशा प्रबळ असलेल्या शिवसेनेला आघाडीतून पुन्हा गतवैभव मिळण्याची आशा आहे, तर आपले राजकीय अस्तित्त्व कायम ठेवण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. मागील पंचवार्षिकमध्ये जवळपास नगण्य ठरलेल्या या दोन्ही पक्षांचा संभाव्य आघाडीतून एकप्रकारे पुन्हा जन्मच होणार असल्याने या दोन्ही पक्षांकडून स्थानिक पातळीवर आघाडीसाठी आटोकाट प्रयत्न सुरु आहेत. मात्र त्यासाठी काँग्रेसला आपल्या विजयी जागांचे बलिदान द्यावे लागणार असल्याने विद्यमान नगरसेवकांसह कार्यकर्त्यांचा विचारही महत्त्वाचा ठरणार आहे.
2016 सालच्या निवडणुकीत शिवसेनेचे दोन तर राष्ट्रवादीचा एक उमेदवार निवडून आला होता. मात्र नंतरच्या काळात घडलेल्या राजकीय घडामोडीतून शिवसेनेची जागा काँग्रेसने पटकाविली, तर राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने सत्तेचा झेंडा हाती घेतल्याने पालिका सभागृहात शिवसेना आणि भाजपाचा प्रत्येकी एकच सदस्य शिल्लक राहीला. त्यामुळे नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसचे पालिकेवर एकहाती वर्चस्व स्थापित झाले. सभागृहातील विरोधच मावळल्याने गेल्या पाच वर्षात सत्ताधारी गटाला आपल्या ध्येय व उद्दिष्टांना पूर्ण करण्याची पूर्ण मोकळीक मिळाली. या दरम्यान राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला सत्तास्थानापासून रोखण्यासाठी शिवसेनेसोबत ‘महाविकास आघाडी’ निर्माण केली. गेल्या दोन वर्षांपासून हिच आघाडी राज्याच्या सत्तेवर आहे.
राज्यात राबविलेले सूत्र स्थानिक पातळीवरील निवडणुकांमध्येही वापरले जावे असा राज्याच्या राजकारणातील एक मतप्रवाह आहे. त्याचाच ओघळ संगमनेरपर्यंत येवून पोहोचल्याने येथील स्थानिक शिवसेना व राष्ट्रवादीला सत्ताधारी काँग्रेससोबत आगामी पालिकेच्या निवडणुकीत आघाडी होण्याची आशा आहे. त्यासाठी या दोन्ही पक्षातील स्थानिक पदाधिकार्यांचा एक गट प्रचंड आग्रही आहे. विशेष म्हणजे तीन दशकांपूर्वी पालिकेच्या राजकारणाची संपूर्ण सूत्रे हाती घेणार्या काँग्रेसने राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करुनही स्थानिक पातळीवर कधीही त्यांच्याशी हातमिळवणी केलेली नाही. त्यामुळे यावेळी अशी आघाडी होईल याबाबत अनुकूल ऐवजी प्रतिकूल चर्चाच कानी येत आहेत. मात्र राजकारण हा अनिश्चिततेचा खेळ आहे, त्यात अशक्य ते शक्य, आणि शक्य ते अशक्य होण्याची नेहमी शक्यता असते.
गेल्या महिन्यात शिवसेनेच्या स्थानिक रचनेत काहीसे बदल करण्यात आले आहेत. त्यातून शहरासाठी पुन्हा दोन प्रमुखांच्या निवडीसह नव्याने समन्वयक व उपजिल्हा प्रमुखांची नेमणूक झाली आहे. कधीकाळी सेनेचे जिल्हाप्रमुख राहिलेल्या जयवंत पवार यांच्या मुलाला दक्षिण शहराची, तर सेनेला विजयाचा गुलाल दाखवणार्या आप्पा केसेकर यांना विधानसभा समन्वयकाची जबाबदारी देत या दोन्ही ज्येष्ठ शिवसैनिकांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आले आहे. जयवंत पवार यांच्या कुटुंबातून आजच्या स्थितीत दोन नगरसेवक असून ते दोन्हीही काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आले आहेत. मात्र त्यांच्या विजयामागे पक्षापेक्षा ‘पवार’ हे चिन्हच अधिक प्रबळ असल्याचे सर्वश्रृत असल्याने पवार यांना पद देवून सेनेने एकप्रकारे दोन नगरसेवकच आपल्या पदरात पाडून घेतले आहेत असे म्हणण्यास मोठा वाव आहे.
त्यासोबतच पालिकेच्या गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्यावतीने प्रियंका भरीतकर व लखन घोरपडे हे दोन उमेदवार निवडून आले होते. नंतरच्या काळात जातप्रमाणपत्राच्या कारणास्तव घोरपडे यांचे नगरसेवकपद रद्द झाले. सध्या सुरु असलेल्या आघाडीबाबतच्या चर्चेतही शिवसेनेकडून चार जागा मिळविण्याचे प्रयत्न असल्याचे समजते. त्यामुळे आघाडी झाली तरीही काँग्रेसला फारकाही गमवावे लागेल असे चित्र सध्याच्या कथीत चर्चेत तरी दिसत नाही. मात्र गेल्या काही वर्षात पक्षाची धोरणं आणि स्थानिक राजकारण यातून खर्या शिवसैनिकांनाच फारकत घेण्याची अथवा अज्ञातवासात जाण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शहरातील पक्षाची ताकदही क्षीण झाली असून लखन घोरपडे यांच्यावरील अपात्रतेच्या कारवाईनंतर झालेल्या पोटनिवडणूकीतून ते सिद्धही झाले आहे. त्यातच मागील निवडणुकीतही सर्व प्रभागात उमेदवार देण्यात अपयशी ठरलेल्या सेनेला यावेळीही तशाच प्रसंगाचा सामना करावा लागण्याची भीती असल्याने त्यांच्याकडून आघाडीसाठी देव पाण्यात ठेवण्यात आल्याचे दिसत आहे.
दुसरीकडे तालुक्यातील राजकारणात फारसा दबदबा नसलेल्या मात्र ज्येष्ठनेते शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग असलेल्या राष्ट्रवादीलाही आघाडीशिवाय पर्याय नसल्याने त्यांच्याकडूनही आघाडीसाठी मोठा आग्रह सुरु असल्याचे दिसते. राष्ट्रवादीची आजची पालिका सभागृहातील स्थिती पाहता त्यांच्याकडे गमावण्यासारखे काहीच नसल्याने पदरी पडेल ते पवित्र ठरणार आहे. यापूर्वीच्या पालिका निवडणुकांचा विचार करता मुस्लीमबहुल भागातील एखाद्या काँग्रेस उमेदवाराच्या नाराजीला पर्याय म्हणून राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढणार्या उमेदवाराला मते पडल्याचे सर्वश्रृत आहे. त्यामुळे आघाडीतून जे मिळेल ते या पक्षाच्या फायद्याचेच ठरणार आहे. मात्र सभागृहातील शून्य संख्या विचारात घेता आघाडीच्या बोलणीत हा पक्ष नेमकं आपल्या पदरात काय पाडण्यात यश्सवी ठरतो हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार सध्या सुरु असलेल्या कथीत चर्चेतून मुस्लीमबहुल भागातील एका माजी नगरसेवकाला पुन्हा प्रवाहात आणण्यासाठीचे प्रयत्न सुरु असून या एका जागेवरच त्यांना समाधान मानावे लागण्याची चर्चा आहे.
खरेतर विद्यमान सभागृह जरी काँग्रेसच्या नगरसेवकांनी व्यापलेले असले तरीही त्यातील काही सदस्यच स्वकर्तृत्त्वावर तेथे पोहोचले आहेत. बहुतेक सदस्य ‘थोरात-तांबे’ यांच्याच करिष्म्यावर विजयी होतात हे वास्तवही नाकारता येणार नाही. पालिकेतील सदस्य संख्येचा परिणाम विधानसभेच्या मतदानावरही होत असतो. त्यामुळेच गेल्या चार दशकांपासून बाळासाहेब थोरात यांनी ग्रामपंचायतीपासून ते विधानसभेपर्यंत सर्वत्र आपला दबदबा कायम ठेवला आहे. आज राज्यातील सत्ता समीकरणं बदलली असतील तरीही संगमनेरात आजही थोरात हाच पक्ष मानला जातो. त्यामुळे आपला एकहाती दबदबा असतांना आणि मोदी लाटेतही विक्रमी मतांची घोडदौड कायम असतांना थोरात नावाचा पक्ष राज्यातील महाविकास आघाडीचे सूत्र संगमनेरात रुजविणार किंवा कसे हे येणारा काळच सांगेल. मात्र यासाठी शिवसेना व राष्ट्रवादीतील एका गटाचा आग्रह पाहता प्रत्यक्ष निवडणूक जाहीर होईस्तोवर संगमनेरातील आघाडीचा विषय सुरुच राहणार आहे हे मात्र खरे. (समाप्त)