कोपरगाव पालिकेची सभा म्हणजे निव्वळ तमाशा ः अॅड.पोळ
कोपरगाव पालिकेची सभा म्हणजे निव्वळ तमाशा ः अॅड.पोळ
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
सहा महिन्यानंतर कोपरगाव नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये जनतेच्या काही प्रश्नांवर साधक-बाधक चर्चा होईल असे वाटले होते. मात्र जनतेच्या प्रश्नांवर चर्चा होण्याऐवजी ही सभा म्हणजे निव्वळ तमाशा झाला असून जिल्हाधिकार्यांनी शासकीय प्रतिनिधी नेमून सभा घ्यावी, अशी मागणी लोकस्वराज्य आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष अॅड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
अॅड.पोळ आपल्या पत्रकात पुढे म्हणाले की, शहर व आपल्या प्रभागातील समस्या मांडण्यासाठी व त्या सोडवून घेण्यासाठी मंजूर करण्यासाठी पालिकेची सर्वसाधारण सभा आयोजित केली जाते. मात्र निवडून आल्यापासून कोपरगाव शहरात नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या दरम्यान विकासकामांवर आरोप-प्रत्यारोपाचा कलगीतुरा सुरू असून केवळ भपकेबाज विकासाला जनता कंटाळली आहे असे असताना या सभेमध्ये जनतेच्या पाणी, रस्ते, स्वच्छता, अतिक्रमण प्रश्न आणि शासकीय जागा अधिग्रहित करण्यावर चर्चा होणे अपेक्षित होते. सहा महिन्यांच्या टाळेबंदीमुळे सर्वच प्रश्न प्रलंबित होते असे असताना आता बर्यापैकी टाळेबंदी शिथील असताना केवळ शासकीय आदेश म्हणून सदर सभा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. वास्तविक या काळात असे बरेच लग्नाचे कार्यक्रम 100 लोकांच्या उपस्थितीत संपन्न झाले असताना केवळ आगामी पालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन ही सभा केवळ 30-40 लोकांच्या उपस्थितीत प्रांगणात घेतली असती तरी चालली असती. निदान त्यामुळे सर्व सामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लागले असते. मात्र आपल्या सोयीच्या प्रश्नावर मत प्रदर्शन करता आले नाही व सोयीचे विषय मंजूर नामंजूर करता आले नाही म्हणून या सभेचा तमाशा झाला. जनतेचे प्रश्न मात्र तसेच राहिले. आता जिल्हाधिकार्यांनी या सभेचे प्रोसिडिंग व रेकॉर्डिंग पाहून नगरसेवकांच्या आरोपात तथ्य असेल तर शासकीय अधिकारी नेमून पुन्हा सभा घ्यावी असेही या पत्रकात म्हंटले आहे.