रात्रभर पडलेल्या मुसळधारमुळे नेवासा शहर ‘जलमय’!
रात्रभर पडलेल्या मुसळधारमुळे नेवासा शहर ‘जलमय’!
नागरिकांचे अतोनात हाल; अख्खी रात्र काढली जागून
नायक वृत्तसेवा, नेवासा
रात्रभर सुरू असलेला मुसळधार पाऊस व त्यातच मुळा धरणातून वीस हजार क्युसेसने पाणी सोडण्यात आल्याने प्रवरानदी दुधडी भरून वाहत आहे. त्यामुळे प्रवरानदीला मिळणार्या ओढ्याचे पाणी उलट्या दिशेने नेवासा शहरातील मारुतीनगर व संत ज्ञानेश्वर महाराज मंदीर रस्ता परिसरात असलेल्या रामकृष्णनगर, चक्रनारायण वसाहत परिसर ‘जलमय’ झाल्याने नागरिकांनी अख्खी रात्र जागून काढली. यामुळे रहिवाशांचे अतोनात हाल झाले असून घरात पाणी शिरल्याने गृहपयोगी वस्तूंचेही मोठे नुकसान झाले.

गुरुवारी (ता.17) रात्रीच्या सुमारास मुळा धरणातून वीस हजार क्युसेसने पाणी सोडण्यात आले. याबाबत आधीच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्यावतीने समाज माध्यमांच्या माध्यमातून देण्यात आला होता. सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्यामुळे अचानक प्रवरा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे नेवासा पोलीस ठाणे हद्दीतील प्रवरा नदकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही पोलीस यंत्रणेमार्फत देण्यात आला होता. दरम्यान, प्रवरा नदीत सोडण्यात आलेले पाणी व मुसळधार सुरू असलेल्या पाण्यामुळे मारुतीनगर, रामकृष्णनगर व चक्रनारायण वसाहत भागात असणारे ओढे वाहते झाल्याने या भागात रात्रीच्या एक वाजण्याच्या सुमारास अचानक पाणी शिरले. यामुळे नागरिक भयभीत झाले. यामुळे काहींनी अख्खी रात्र घराच्या तळमजल्यावर बसून तर मारुतीनगर प्रभागातील रहिवाशांनी मंदीर व उंच जागेवर बसून जागून काढली. मात्र, कोणत्याही प्रकारची प्रशासकीय यंत्रणा मदतीसाठी धावून आली नाही अशा प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या.

संत ज्ञानेश्वर महाराज मंदीर रस्त्यावर असलेल्या चक्रनारायण वसाहतीमध्ये पाणी शिरल्याने घरातील कपडे, भांडे, गृहपयोगी वस्तू वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. शासनाने त्वरीत नुकसान झालेल्या भागाचे पंचनामे करावेत. तसेच या भागात असलेल्या ओढ्याचे रुंदीकरण व खोलीकरण करावे अशी मागणी या भागातील रहिवाशांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केली. मारुतीनगर परिसरात असलेला ओढा देखील पाणी पातळी सोडून वाहू लागल्याने सदरचे पाणी आजूबाजूला असलेल्या शेतात शिरले. यामुळे शेतपिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आम्हांला शासनाने पंचनामे करून मदत देऊन दिलासा द्यावा अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.

