दोन ठिकाणी झालेल्या रस्ता अपघातात तिघांचा बळी! रक्षाबंधनाला वेदनेची किनार; सणासाठी माहेरी आलेल्या बहिणीचा दुर्दैवी अंत..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
ऐन रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला तालुक्यातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या भीषण अपघातात तिघांचा बळी गेला आहे. यातील पहिली घटना डेरेवाडी फाट्याजवळ घडली असून त्यात दुचाकीवरील दोघांचा तर दुसर्‍या घटनेत चारच महिन्यांपूर्वी लग्न होवून रक्षाबंधनासाठी माहेरी येत असलेल्या तरुणीचा रायतेवाडी फाट्यावर अपघात होवून त्यात ती जागीच ठार होण्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. यातील पहिल्या घटनेला कारणीभूत ठरलेल्या पिकअप चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून रायतेवाडी फाट्यावरील घटनेतील मालट्रकचा चालक मात्र अपघातानंतर वाहनासह पसार झाला आहे. ऐन सणाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या दुर्दैवी घटनांमध्ये तिघांचा बळी गेल्याने संगमनेर तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार यातील पहिली घटना बुधवारी (ता.10) सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास चिखली जवळील डेरेवाडी फाट्यावर घडली. या घटनेत दुचाकीवरुन (क्र.एम.एच.17/बी.एच.2240) अकोल्याच्या दिशेने जात असलेल्या संदीप खंडू माने (वय 38) व भरत बाबुराव कराळे (वय 56, रा.दोघेही तांभोळ) यांच्या दुचाकीला अकोल्याकडून संगमनेरकडे येत असलेल्या महिंद्रा पिकअप (क्र.एम.एच.15/एफ.व्ही.9434) या वाहनाची समोरासमोर धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की त्यात मोटारसायकलचा अक्षरशः चेंदामेंद झाला. या घटनेत दुचाकीवरील दोघांचाही जागीच मृत्यू झाला. याबाबत देवराम बाबुराव माने यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी पिकअपचा चालक कैलास नामदेव सदगीर (वय 25, रा.मुथाळणे, ता.अकोले) याच्या विरोधात सदोष मनुष्यवधासह मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली आहे.

यातील दुसरी घटना पुणे रस्त्यावरील रायतेवाडी फाट्यावर घडली. या घटनेत चारच महिन्यांपूर्वी लग्न होवून सासरी गेलेली रुपाली बाळासाहेब कुडेकर (वय 29, रा.पुणे, मूळ मोधळवाडी, ता.संगमनेर) ही तरुणी रक्षाबंधनाच्या सणासाठी माहेरी येण्यासाठी निघाली होती. रायतेवाडी फाट्यावर आल्यानंतर रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ती बसमधून उतरली. तिला घेण्यासाठी तिचे वडील दुचाकी घेवून आले होते. मुलगी रायतेवाडी फाट्यावर पोहोचताच त्यांनी तिला आपल्या दुचाकीवर (क्र.एम.एच.03/एक्स.5334) सोबत घेवून जुन्या पुणे-नाशिक महामार्गावरील रायतेवाडी फाट्यावरुन नवीन महामार्गावर चंदनापुरीकडे वळण घेतले.

नेमके त्याचवेळी नाशिककडून पुण्याकडे अतिशय भरधाव वेगाने जाणार्‍या एका सोळा टायरच्या मालट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात दुचाकीवर पाठीमागे बसलेली रुपाली उडून खाली पडली व तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रक्तबंभाळ झाली. या अपघातानंतर मालट्रकचा चालक न थांबता भरधाव वेगाने पुण्याच्या दिशेने वाहनासह पळून गेला. ही घटना घडताच आसपासच्या नागरिकांनी तत्काळ तेथे धाव घेतली, मात्र तत्पूर्वीच दुचाकीवरील तरुणीचा मृत्यू झाल्याचे समोर आले तर तिच्या वडीलांना किरकोळ दुखापत झाली. ऐन रक्षाणबंधनाचा पूर्वसंध्येला आपल्या भावांना प्रेमाचा धागा बांधण्यासाठी पुण्याहून संगमनेरला पोहोचलेल्या एका बहिणीचा अशाप्रकारे अंत झाल्याने संगमनेरातून हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी अज्ञात वाहनचालकविरोधात सदोष मनुष्यवधासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे पसार झालेल्या मालट्रकचा शोध घेतला जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुणे-नाशिक महामार्गावर सक्तीने टोलवसुली सुरु असतानाही प्रवाशांना आवश्यक असलेल्या सुविधा दिल्या जात नाहीत. या महामार्गावर बहुतेक ठिकाणचे पथदिवे बंद असून बुधवारच्या अपघातावेळीही ते बंदच होते. याशिवाय रायतेवाडी फाट्यावर नवीन आणि जुना महामार्ग एकत्र येत असल्याने या ठिकाणी नेहमीच अपघातांची शक्यता असते. मात्र टोल ठेकेदाराने या सर्व गोष्टी गौण ठरवून फक्त वसुलीचे धोरण अवलंबल्याने या ठिकाणी वळण असल्याचे दाखवणारी केसरी लाईट गेल्या अनेक दिवसांपासून बंद असूनही आणि त्या कारणाने येथे अपघाताची कायम शक्यता असल्याचे माहिती असूनही त्यात बदल न केल्याने या अपघाताला त्या वाहनचालकासह टोल वसुली करणारी ठेकेदार कंपनीही जबाबदार आहे. त्यामुळे या कंपनीवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी या अपघातानंतर स्थानिकांनी केली.

संगमनेर शहरातील वाहतुकीचा ताण कमी व्हावा व घाटवळणाच्या रस्त्यावरील अपघांताची संख्या नियंत्रणात यावी यासाठी 2017 मध्ये सुरु झालेला पुणे-नाशिक महामार्ग ठेकेदाराच्या भामटेगिरीमुळे पुन्हा एकदा आपली मृत्यूघंटा ही ओळख निर्माण करु लागला आहे. गेल्या पाच वर्षात या महामार्गावर असंख्य जणांना आपला हकनाक बळी द्यावा लागला असून करोडो रुपयांच्या वाहनांचा चक्काचूर झाला आहे. मात्र एवढं घडूनही ठेकेदाराच्या वागणूकीत कोणतीही सुधारणा नसून वारंवार मागण्या होवूनही ना रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले आहेत, ना बंद असलेले पथदिवे सुरु आहेत. त्यामुळे पोलिसांनी आता माणुसकी दाखवताना या प्रकरणात ठेकेदारालाही सहआरोपी करावे अशी मागणी होत आहे.

Visits: 147 Today: 2 Total: 1416561

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *