घारगावात चोरट्यांचा धुमाकूळ; दागिने व रोख रक्कम चोरली अहमदनगरच्या श्वान पथक व ठसेतज्ज्ञांना केले पाचारण; नागरिकांत भीतीचे वातावरण

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील घारगाव येथे बुधवारी (ता.14) पहाटे अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून पोबारा केला आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, घारगाव येथील महंमद गफूर शेख यांचे शेतात घर आहे. बुधवारी पहाटे चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि कपाट उचकटून आतमधील सर्व साहित्य खाली फेकून दिले. यावेळी चोरट्यांनी कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून पोबारा केला. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा गावातील माधव पुंजाहारी धात्रक यांच्या घराकडे वळवला. धात्रक यांच्याही घराची कडी तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि कपाट उचकटून आतमधील सर्व साहित्य खाली फेकून दिले. घरातील पत्र्याची पेटीही उचकटून बाहेर फेकली.

समोरच विठाबाई पुंजाहारी धात्रक या झोपलेल्या होत्या. त्यांच्याही गळ्यातील सोन्याचे दागिने चोरट्यांनी ओरबाडले. त्यावेळी विठाबाई झोपेतून जाग्या झाल्या आणि त्यांची चोरट्यांशी झटापट झाली. त्यावेळी त्यांच्या हाताला ओरखडले असून चोरट्यांनी त्यांना ढकलून देऊन धूम ठोकली. या घटनांची माहिती समजताच घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील, उपनिरीक्षक धीरज राऊत, पोलीस नाईक राजेंद्र लांघे, मुख्य हवालदार राजू खेडकर, पोलीस शिपाई विशाल कर्पे आदिंनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यानंतर अहमदनगर येथील श्वान पथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. दरम्यान चोरट्यांच्या दहशतीमुळे घारगावमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी लवकरात घारगाव पोलिसांनी या चोरट्यांचा शोध लावावा अशी मागणी नागरिकांनी केली असून, वृत्त लिहेपर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Visits: 125 Today: 2 Total: 1106684

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *