तीन हजारांमागे अवघा ‘एकच’ पोलीस कर्मचारी! गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांमध्ये मात्र तब्बल 80 टक्क्यांची झाली वाढ..

श्याम तिवारी, संगमनेर
समाजातील गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण ठेवून लोकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचे महत्त्वाचे काम पोलिसांना करावे लागते. ज्याप्रमाणे सुरक्षित समाज राष्ट्राची प्रगती साधतो, त्याप्रमाणे सशक्त आणि पुरेसे पोलीस बळ असेल तरच समाज सुरक्षित राहू शकतो. संगमनेर तालुका मात्र याला अपवाद ठरला असून तालुक्याच्या लोकसंख्यत मोठी वाढ होवूनही पोलिसांची संख्या वाढत नसल्याने गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सुरक्षित समाजाच्या व्याख्येलाच तडा गेला आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार संगमनेर तालुक्यात चार पोलीस ठाणी असली तरीही प्रत्येक पोलीस ठाण्यात उपलब्ध असलेले बळ तेथील लोकसंख्येच्या तुलनेत अगदीच नगण्य असल्याने तालुक्याच्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. संगमनेरसारख्या प्रगत आणि पुढारलेल्या तालुक्यात प्रत्येक तीन हजार नागरिकांमागे अवघा एक पोलीस कर्मचारी असल्याने खून, दरोडे, घरफोड्या, जबरी चोर्या अशा घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ तब्बल 80 टक्क्यांच्या आसपास आहे.

विस्ताराने मोठ्या असलेल्या संगमनेर तालुक्याची सन 2011 च्या जनगणनेनुसाची लोकसंख्या तब्बल 4 लाख 87 हजार 939 इतकी आहे. त्यात शहरीभागातील 87 हजार 664 नागरिकांचा समावेश आहे. कोविडच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी होणारी जनगणना स्थगित करण्यात आल्याने गेल्या दहा वर्षात वाढलेल्या लोकसंख्येचा नेमका आकडा उपलब्ध नाही. मात्र सरासरी 10 टक्के वाढ गृहीत धरल्यास संगमनेर शहराची घुलेवाडीसह एकत्रित लोकसंख्या लाखाच्या घरात तर तालुक्याची एकूण लोकसंख्या सव्वा पाच लाखांच्याही पुढे गेल्याचा अंदाज आहे. एकीकडे जनसंख्येत सातत्याने मोठी वाढ होत असतांना तुलनेत त्या लोकसंख्येला नियंत्रणात ठेवून समाज सुरक्षित ठेवण्यासह कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणार्या पोलिसांच्या संख्येकडे मात्र सगळ्याच पक्षांच्या सरकारांनी दुर्लक्ष केले आहे, संगमनेर तालुक्याला त्याला अपवाद ठरलेला नाही.

जिल्ह्यातील अन्य तालुक्यांच्या मानाने संगमनेर तालुका विस्ताराने खूप मोठा आहे. तालुक्याची उत्तर-दक्षिण लांबी सुमारे 50 किलोमीटर तर पूर्व-पश्चिम लांबी सुमारे 38 किलोमीटर इतकी विस्तारलेली आहे. संगमनेर तालुक्यातून पुणे-नाशिक या राष्ट्रीय महामार्गासह कोल्हार-घोटी राज्यमार्ग व जिल्हा, तालुका मार्गांचे जाळेही पसरलेले आहे. त्यामुळे समृद्धीसोबतच तालुका गुन्हेगारी घटनांमध्येही सतत चर्चेत असतो. तालुक्यातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी संगमनेर शहर व तालुका पोलीस ठाण्यांशिवाय आश्वी व घारगाव येथे स्वतंत्र पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र या ठाण्यांमध्येही पोलीस बळाची कमतरता असल्याने त्यांची अवस्थाही वेगळी नाही. संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत जवळपास एक लाखांहून अधिक लोकसंख्या आहे. त्यात घुलेवाडीसह अन्य 20 गावांचाही समावेश आहे.

शहर पोलीस ठाण्यासाठी एका पोलीस निरीक्षकांसह तीन कनिष्ठ अधिकारी आणि 107 अंमलदारांचे बळ मंजूर आहे. प्रत्यक्षात मात्र केवळ तीन अधिकार्यांसह अवघे 57 पोलीसबळ उपलब्ध आहे. संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात एका निरीक्षकासह दोन कनिष्ठ अधिकारी आणि 50 अंमलदारांचे बळ मंजूर असताना तेथे एका अतिरिक्त अधिकार्यासह 44 पोलीस उपलब्ध आहेत. आश्वी पोलीस ठाण्यासाठी एका निरीक्षक, दोन उपनिरीक्षक आणि 54 कर्मचार्यांची मंजूरी आहे, प्रत्यक्षात येथे केवळ एक निरीक्षक आणि अवघे 29 कर्मचारी हजर आहेत. तर जवळपास 46 गावांची सुरक्षा सांभाळणार्या घारगाव पोलीस ठाण्यासाठी एका निरीक्षकांसह तीन कनिष्ठ अधिकारी आणि 27 कर्मचारी मंजूर असताना तेथे दोघा अधिकार्यांसह तीन अधिकचे असे 30 कर्मचारी उपलब्ध आहेत. या सर्व पोलीस ठाण्यांना मिळून साधारणतः पाच लाखांच्या लोकसंख्येसाठी एकूण 14 अधिकारी आणि 238 कर्मचार्यांची मंजूरी असताना प्रत्यक्षात मात्र केवळ 10 अधिकारी आणि 160 कर्मचारीच उपलब्ध आहेत.

त्याचा थेट परिणाम घारगाव पोलीस ठाणे वगळता उर्वरीत तिनही पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गंभीर गुन्ह्यांच्या घटना वाढण्यात झाला आहे. गेल्या वर्षी संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून, दरोडे, घरफोड्या, जबरी चोर्या यासारख्या 281 घटनांची नोंद झाली होती. यावर्षी त्यात तब्बल 52 टक्क्यांनी वाढ झाली असून 428 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. दारुबंदीच्या कारवायांमध्येही गेल्यावर्षीच्या तब्बल 75 टक्के वाढ झाली आहे. संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दितही मागील वर्षी 272 गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली होती, तुलनेत यावर्षी त्यात 28 टक्क्याने वाढ होवून अशा घटनांची संख्या 349 झाली आहे. तर दारुबंदीच्या घटनांमध्ये 69 टक्के वाढ होवून दारुबंदी कायद्यान्वये 93 गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

आश्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी वाढीचे प्रमाण वरील दोन्ही पोलीस ठाण्यांच्या नगण्य आहे. या पोलीस ठाण्याच्या हद्दित गेल्यावर्षी 107 गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली होती, यावर्षी त्यात 12 टक्क्यांची भर पडून अशा 120 घटना दाखल झाल्या आहेत. तर दारुबंदीच्या कारवायांमध्ये मात्र 63 टक्क्यांनी वाढ होवून अशा एकूण 38 घटनांची नोंद झाली आहे. या परिस्थितीतही घारगाव पोलीस ठाण्याची स्थिती मात्र काहीशी समाधानकारक असून गेल्या वर्षी या पोलीस ठाण्याच्या हद्दित 206 गंभीर गुन्हे दाखल झालेले असताना यावर्षी त्यात चक्क 12 टक्क्यांची घट झाली असून अवघे 194 गुन्हे दाखल झाले आहेत. ही घट 5.83 टक्के असून दारुबंदीच्या गुन्ह्यात मात्र 45 टक्क्यांची वाढ झाल्याचे दाखल गुन्ह्यांवरुन लक्षात येत आहे. संगमनेर तालुक्यातील या चारही पोलीस ठाण्यात गेल्यावर्षी एकूण 866 गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली होती. यावर्षी त्यात तब्बल 79.38 टक्क्यांची वाढ होवून गंभीर गुन्ह्यांची संख्या 1 हजार 91 झाली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधीक प्रगत तालुक्यांमध्ये संगमनेरचा समावेश आहे. येथील समृद्ध शेती, दुग्ध व्यवसायासह विस्तारलेली बाजारपेठ, उद्योग आणि व्यापारामुळे जिल्ह्यासह आसपासच्या भागातही संगमनेरचा मोठा लौकिक आहे. असे असतांनाही संगमनेर तालुक्यातील जवळपास सव्वापाच लाख लोकांसाठी उपलब्ध असलेले पोलीस बळ अत्यंत तोकडे असल्याने समृद्ध असूनही तालुक्यातील गुन्हेगार आणि गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने मोठी वाढ होत असल्याचे चित्र उपलब्ध आकडेवारीतून अगदी स्पष्ट दिसत आहे. एकीकडे सदृढ समाजाची अपेक्षा ठेवणार्या सरकारांनी या गंभीर गोष्टीकडे तितक्याच गांभीर्याने पाहण्याची गरजही अगदी ठळकपणे दिसून येत आहे.

विस्ताराने प्रचंड मोठा असलेला संगमनेर तालुका जिल्ह्यात अतिशय समृद्ध समजला जातो. येथील उद्योग-व्यवसायासह समृद्ध बाजारपेठेचा मोठा लौकीक आहे. मात्र तालुक्यातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत उपलब्ध असलेले पोलीसबळ अगदीच नगण्य असल्याने प्रत्येकी तीन हजार नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी अवघ्या एका पोलिसाच्या खांद्यावर आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून प्रगतीकडे घोडदौड करणार्या संगमनेर तालुक्यातील गुन्हेगारीही त्याच गतीने वाढली असून मागील वर्षाच्या तुलनेत खून, दरोडे, घरफोड्या, जबरी चोर्या अशा गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यात तब्बल 80 टक्क्यांनी वाढ झाली आहे. समृद्धीच्या यादीत अग्रभागी असलेल्या संगमनेर तालुक्याच्या दृष्टीने ही गोष्ट निश्चितच भूषणावह नसून येथील राजकीय धुरिणांनी याबाबत गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे.

