संगमनेरचे पुन्हा ‘दोन’ शहरप्रमुखांमध्ये विभाजन! आप्पा केसेकर यांची संगमनेर व अकोले विधानसभेच्या समन्वयकपदी नियुक्ती..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने संगमनेर शहराच्या पक्षीय रचनेत बदल केले असून गेल्या निवडणुकीतील नाट्यमय घडामोडींनंतर कालबाह्य ठरवलेली ‘द्विशहर’ प्रमुखपदाची संकल्पना पुन्हा राबवून शहराचे उत्तर व दक्षिण अशा दोन भागात विभाजन करण्यात आले आहे. आता नव्याने दक्षिणेची जबाबदारी प्रसाद पवार यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तर उत्तरेचे कामकाज विद्यमान शहरप्रमुख अमर कतारी सांभाळणार आहेत. त्यासोबतच ज्येष्ठ शिवसैनिक आप्पा केसेकर यांची संगमनेर व अकोले विधानसभेच्या समन्वयकपदी तर भाऊसाहेब हासे यांची उपजिल्हा प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. खरेतर अहमदनगर शहरप्रमुख दिलीप सातपुते बायोडिझेल घोटाळ्यात अडकल्यानंतर त्यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर नियुक्तीच्या हालचाली सुरू असतांना त्या जागेसह संगमनेरातील सेनेच्या पक्षीय रचनेतही मोठे बदल करण्यात आले आहेत. चुरस निर्माण झालेल्या अहमदनगरच्या शहरप्रमुखपदी संभाजी कदम यांची निवड करण्यात आली आहे.

पुढील महिन्यात मुदत संपणाऱ्या संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कधीकाळी मोठा विरोधी पक्ष ठरलेल्या शिवसेनेत मोठे बदल करण्यात आले आहेत. शिवसेनेच्या परंपरेनुसार आज सामना वृत्तपत्रातून याबाबत अधिकृत नावांची घोषणा करण्यात आली आहे. खरेतर अहमदनगर येथील शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते बायोडिझेल घोटाळ्यात अडकल्यानंतर त्यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर आपली नियुक्ती व्हावी यासाठी अहमदनगर शहरातील अनेक ज्येष्ठ शिवसैनिकांमध्ये रस्सीखेच सुरू होती. जिल्ह्यात आगामी काळात बहुतेक सर्वच नगरपालिकांच्या निवडणुका होणार असल्याने प्रलंबित असलेल्या सर्व नियुक्त्या तातडीने होतील असा अंदाज होता. मात्र सद्यस्थितीत पक्षीय बदलांंबाबत कोणतीही चर्चा नसतानाही संगमनेर शहर शिवसेना पक्षप्रमुखांनी संगमनेरच्या पक्षरचनेत अचानक मोठ्या प्रमाणात बदल केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

यापूर्वी संगमनेर शहरात दक्षिण व उत्तर भागासाठी दोन स्वतंत्र शहर प्रमुखांची संकल्पना राबविण्यात आली होती. उत्तरेत अमर कतारी तर दक्षिणेत संजय फड यांची वर्णी लागली होती. मात्र गेल्या नगरपालिका निवडणुकीत संजय फड यांनी पक्ष संकेत धुडकावून मनमानी कारभार केल्याने त्यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली. तेव्हापासून शहर शिवसेनेची संपूर्ण जबाबदारी अमर कतारी सांभाळीत होते. त्याच दरम्यान ज्येष्ठ शिवसैनिक आप्पा केसेकर यांचेही पक्षीय रचनेत पुनर्वसन करताना त्यांच्यावर उपजिल्हा प्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. आता त्यातही बदल करून त्यांना संगमनेरसह अकोले विधानसभेच्या समन्वयक पदाची धुरा देण्यात आली आहे. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर ज्येष्ठ शिवसैनिक भाऊसाहेब हासे यांची वर्णी लागली आहे. अचानक करण्यात आलेल्या या पक्ष बदलाचा आगामी निवडणुकीत शिवसेनेला फायदा होतो की तोटा हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

Visits: 152 Today: 1 Total: 1098678
